अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीची २० वर्षांची शिक्षा कायम; उच्च न्यायालयाने अपील फेटाळले
पीडितेची विश्वासार्ह साक्ष आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला
छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अहमदनगर येथील विशेष न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कायम ठेवला आहे. आरोपीने शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले.
या प्रकरणातील पीडिता घटनेच्या वेळी केवळ १४ वर्षे ९ महिन्यांची होती. आरोपीने तिला फूस लावून सोबत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देत आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यामध्ये पीडितेच्या वयाबाबत तसेच अभियोजन पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांबाबत आक्षेप घेण्यात आले होते.
मात्र, उच्च न्यायालयाने पीडितेची साक्ष विश्वासार्ह असल्याचे निरीक्षण नोंदवले. तिच्या साक्षीला वैद्यकीय पुराव्यांची पुष्टी मिळत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. अभिलेखावरील पुराव्यांवरून पीडिता अल्पवयीन असल्याचे सिद्ध होत असल्याने आरोपीचे आक्षेप ग्राह्य धरता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यांचे योग्य मूल्यमापन करून दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने आरोपीचे अपील फेटाळले. त्यामुळे आरोपीची २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा कायम राहिली.
या प्रकरणात पीडितेच्या वतीने अॅड. विनायक नरवडे आणि अॅड. मंजुश्री नरवडे यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय दिला.

stay connected