महेश साखर कारखान्यातील कोट्यवधींची मशिनरी चोरीला
माजी आ.भीमराव धोंडे यांचा मोठा गौप्यस्फोट
------------------
संशयितांची नावे निष्पन्न,लवकरच गुन्हे दाखल होणार
------------------
------------------
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्याची 'कामधेनू' असा लौकिक असलेला आणि अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र,शेतकऱ्यांच्या या आशादायी चित्राला गालबोट लावणारी एक अत्यंत धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कारखान्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, आवारातून तब्बल कोट्यवधी रुपयांच्या मशिनरीची चोरी झाली आहे.या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच याप्रकरणी पोलिसांत रीतसर गुन्हे दाखल केले जातील असा मोठा गौप्यस्फोट माजी आ.भीमराव धोंडे यांनी केला आहे.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात बुधवारी दि.१ एप्रिल आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अशोक साळवे उपस्थित होते.
माजी आ.धोंडे यांनी महेश कारखान्याच्या उभारणीचा, आतापर्यंत आलेल्या संकटांचा आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा पत्रकारांसमोर दिला.अडचणींचा डोंगर पार करत कारखाना अंतिम टप्प्यात माजी आ. धोंडे यांनी माहिती देताना सांगितले की,आष्टी आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी महेश सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या संपूर्ण प्रवासात अनेक मोठी आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक संकटे उभी राहिली.परंतु, या सर्व अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करून आता कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या गाळप हंगामात कारखान्याचे धुराडे पेटलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या प्रकल्पामुळे केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर वाहतूकदार, पूरक उद्योग (Ancillary) आणि स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प तालुक्याच्या अर्थचक्राला मोठी गती देईल, असेही ते म्हणाले.
कोट्यवधींच्या चोरीने खळबळ; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
कारखान्याचे काम अत्यंत वेगात आणि सकारात्मक वातावरणात सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या महागड्या मशिनरीवर डल्ला मारल्याची गंभीर बाब माजी आ. धोंडे यांनी उघड केली. ही चोरी काही हजारांची नसून थेट कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.विशेष म्हणजे, या चोरीतील संशयितांची नावे आता समोर आली आहेत. त्यांच्यावर लवकरच पोलिसांत कठोर कारवाईसाठी अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.
या मोठ्या चोरीमुळे कारखान्याच्या उभारणीच्या गतीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता असली,तरी नियोजित वेळेतच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे माजी आ. धोंडे यांनी स्पष्ट केले.दरम्यान,
एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत जड असलेली मशिनरी चोरीला गेल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संचालक मंडळ, शेतकरी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
------------------
चोरी झाली तरी 'कारखाना सुरू होणारच'
----माजी आ.धोंडे यांचा निर्धार
------------------
महेश सहकारी साखर कारखाना ही या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही आतापर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. आता या चोरीच्या प्रकाराने आम्ही अजिबात खचणार नाही.आमचा निर्धार पक्का असून, कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या हंगामात गाळप सुरू करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करूच असा विश्वास माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला आहे.
-----------------


stay connected