कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात CCTV फुटेज विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या ताब्यात; पाच जणांच्या निलंबनासाठी २८ सप्टेंबरला नाशिकमध्ये उपोषण

 कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात
CCTV फुटेज विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या ताब्यात; पाच जणांच्या निलंबनासाठी २८ सप्टेंबरला नाशिकमध्ये उपोषण



अहिल्यानगर : महानगरपालिका कार्यालयाजवळील एका इमारतीत बाहेरून आणलेली संशयास्पद पिशवी ठेवून विशाल भिकाजी पारखे यांच्याविरुद्ध खोटी गांजाची केस तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६५९/२०२६ प्रकरणातील CCTV फुटेज आणि पोलिसांच्या अधिकृत कागदपत्रांतील वेळांमध्ये गंभीर तफावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.



शेख यांनी २२ सप्टेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची समक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. कथित कारवाईचे वेळनिहाय CCTV फुटेज त्यांना दाखवून त्याची प्रतही त्यांच्या ताब्यात देण्यात आली. येनपुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश देऊन दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शेख यांनी दिली.


या प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख तसेच पोलीस कर्मचारी रोहिणी दरंदले, दीपक रोकले, अतुल काजोळ आणि पल्लवी रोकले यांना निलंबित करून स्वतंत्र फौजदारी चौकशी करावी; अन्यथा २८ सप्टेंबरपासून नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार, असा इशारा शेख यांनी दिला आहे.


छाप्याच्या दोन तास आधी पिशवी घरात?


शेख यांनी २ सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार केली होती. त्यामध्ये CCTV फुटेजमधील घटनाक्रम आणि पोलिसांच्या अधिकृत नोंदींतील वेळांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.


१० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.४२ वाजल्यापासून पोलीस कर्मचारी दीपक रोकले आणि रोहिणी दरंदले हे महानगरपालिका कार्यालयाजवळील कथित घटनास्थळी उपस्थित होते. दोघेही संबंधित घराकडे जाणाऱ्या गल्लीत गेल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे.


त्यानंतर पोलीस कर्मचारी अतुल काजोळ यांनी निळ्या रंगाची पिशवी घटनास्थळी आणली. त्या पिशवीतील पदार्थ दुसऱ्या पिशवीमध्ये टाकण्यात आला आणि सायंकाळी सुमारे ७.२३ वाजता संबंधित पिशवी घरामध्ये ठेवण्यात आल्याचा घटनाक्रम CCTV फुटेजमध्ये कैद झाल्याचा दावा शेख यांनी केला आहे.


रात्री सुमारे आठ वाजता पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख दुचाकीवरून घटनास्थळी आले. त्यांनी दुचाकी मुख्य रस्त्यावर उभी करून इमारतीत प्रवेश केला. त्या वेळी पोलीस कर्मचारी रोहिणी दरंदले आणि पल्लवी रोकले या प्रवेशद्वाराजवळील जिन्यावर उपस्थित असल्याचे तसेच देशमुख यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


गुप्त माहितीपूर्वी पोलीस घटनास्थळी कसे?


पोलिसांच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, रात्री आठ वाजता गांजाबाबत गुप्त माहिती मिळाल्याचे नमूद आहे. स्टेशन डायरीमध्ये रात्री ८.१६ आणि ९.०२ वाजता नोंदी करण्यात आल्या, तर रात्री ९.१० वाजता छापा टाकून गांजा जप्त केल्याचे दाखविण्यात आले आहे.


मात्र, गुप्त माहिती मिळाल्याचे दाखविण्यापूर्वीच संबंधित पोलीस सायंकाळी ६.४२ वाजल्यापासून घटनास्थळी उपस्थित होते. कथित गांजा असलेली संशयास्पद पिशवीही अधिकृत छाप्याच्या जवळपास दोन तास आधी, म्हणजे सायंकाळी ७.२३ वाजता घरात ठेवण्यात आल्याचे फुटेजमध्ये प्रथमदर्शनी दिसत असल्याचा आरोप आहे.


त्यामुळे गुप्त माहिती मिळण्यापूर्वी पोलिसांना संबंधित घराची माहिती कशी मिळाली, ते कोणाच्या आदेशाने घटनास्थळी पोहोचले, निळी पिशवी कोठून आणण्यात आली, तिच्यातील पदार्थ दुसऱ्या पिशवीत का टाकण्यात आला आणि अधिकृत छाप्यापूर्वी ती पिशवी घरात का ठेवली गेली, असे गंभीर प्रश्न शेख यांनी उपस्थित केले आहेत.


हा केवळ वेळेतील किरकोळ फरक नसून, आधी पिशवी घरात ठेवून त्यानंतर गुप्त माहिती, स्टेशन डायरी, छापा आणि जप्तीचा अधिकृत घटनाक्रम तयार करण्यात आला काय, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


घटनास्थळ आणि मुद्देमालाची चौकशी करा


प्रत्यक्ष कारवाई कोणत्या घरात करण्यात आली, कथित गांजा नेमका कोठून मिळाला, त्या जागेचा मालक व ताबेदार कोण होता आणि पंच साक्षीदार कोणत्या ठिकाणी उपस्थित होते, याची स्वतंत्र स्थळपडताळणी करावी, अशी मागणी आहे.


कथित गांजाची पिशवी कोठून आणली, ती सर्वप्रथम कोणाच्या ताब्यात होती, तिची हाताळणी कोणी केली, वजन व पॅकिंग कोठे झाले आणि मुद्देमालाची अखंड साखळी राखण्यात आली किंवा नाही, याचीही स्वतंत्र चौकशी करावी. घटनास्थळाचे CCTV फुटेज, कोतवाली पोलीस ठाण्यातील CCTV, स्टेशन डायरी, गुप्त माहितीची मूळ नोंद, ई-साक्ष्य अभिलेख, जप्तीची कागदपत्रे, ड्युटी चार्ट, शासकीय वाहनांचे GPS आणि वायरलेस लॉग तातडीने सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.


संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे १० जुलै रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा या कालावधीतील CDR, SDR, मोबाईल आणि टॉवर लोकेशनची CCTV फुटेजशी पडताळणी केल्यास प्रत्यक्ष घटनाक्रम स्पष्ट होऊ शकतो, असे शेख यांनी म्हटले आहे.


पाच जणांच्या निलंबनाची मागणी


या प्रकरणाची चौकशी कोतवाली पोलीस ठाणे किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडे न देता परिक्षेत्राबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाकडे सोपवावी. पुरावे आणि साक्षीदारांवर प्रभाव पडू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख तसेच पोलीस कर्मचारी रोहिणी दरंदले, दीपक रोकले, अतुल काजोळ आणि पल्लवी रोकले यांना तात्काळ निलंबित करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.


चौकशीत बाहेरून अमली पदार्थ आणणे, तो घटनास्थळी ठेवणे, खोटा पुरावा निर्माण करणे, अभिलेखांत फेरफार करणे किंवा एखाद्या व्यक्तीला खोट्या गांजाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही शेख यांनी म्हटले आहे.


२७ सप्टेंबरपर्यंत पाचही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनासह ठोस आणि लेखी कार्यवाही न झाल्यास २८ सप्टेंबरपासून नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर