कडा–लिंबोडी रस्त्यावर भीषण अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सांगवी पाटण गावावर शोककळा

 कडा–लिंबोडी रस्त्यावर भीषण अपघात
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सांगवी पाटण गावावर शोककळा



प्रतिनिधी / अनिस मोमिन - 

आष्टी तालुक्यातील कडा–लिंबोडी रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अनिल मोहन खिलारे (वय ४५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल खिलारे हे सोमवारी दुपारी कडा शहरातून आपल्या गावाकडे दुचाकीने (क्रमांक MH 23 AK 1133) जात होते. कडा–लिंबोडी मार्गावरील पाचेवस्ती परिसरात आले असता त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाला की दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते कोसळले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, अपघात इतका गंभीर होता की अनिल खिलारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर, नंदकिशोर सवासे व अमोल नवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कडा पोलीस करत आहेत.

अनिल खिलारे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या अनिल यांच्या अकस्मात जाण्याने खिलारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सांगवी पाटण गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने कडा–लिंबोडी रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा व सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.