दुष्काळात बिबट्याचा घाला; चारण्यासाठी नेलेल्या वासराचा मृत्यू, लोखंडवाडी-सोने पठार परिसरात खळबळ

 दुष्काळात बिबट्याचा घाला; चारण्यासाठी नेलेल्या वासराचा मृत्यू, लोखंडवाडी-सोने पठार परिसरात खळबळ



आष्टी (प्रतिनिधी):

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी - सोने पठार परिसरात बिबट्याने हल्ला करून एका वासराचा बळी घेतला आहे. चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गाई व वासरांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून वासराचे प्राण घेतले. या घटनेमुळे शेतकरी राजसाहेब पिंपळे यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले असून, गेल्या वर्षभरात त्यांच्या तीन गायींसह आता वासराचीही शिकार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या परिसरात दुष्काळी स्थिती असल्याने चारा-पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांची भूक भागवण्यासाठी शेतकरी राजसाहेब पिंपळे हे आपल्या गाई व वासरे चारण्यासाठी लोखंडवाडी येथील सोने पठार परिसरात घेऊन गेले होते. जनावरे चरत असतानाच लपून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला आणि त्यात वासराचा जागीच मृत्यू झाला.

दुष्काळ आणि बिबट्याची दुहेरी कोंडी

दुष्काळामुळे आधीच चारा-पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, दुसरीकडे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुपालक हतबल झाले आहेत. गेल्या एका वर्षात बिबट्याने राजसाहेब पिंपळे यांच्या ३ गायी मारल्या असून, आता चारण्यासाठी नेलेल्या वासराचाही बळी गेल्याने पिंपळे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

वनविभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी

चारण्यासाठी शेतात किंवा माळरानावर जनावरे घेऊन जाणे आता धोकादायक ठरत आहे. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर