लोखंडवाडीत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार; २०० मीटर ओढत नेले
हल्ला नेमका वाघाने केला की बिबट्याने? वनविभागाकडून शोध सुरू; परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले
आष्टी | तेजवार्ता न्यूज नेटवर्क
आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात ठार झालेल्या गायीला वन्यप्राण्याने तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्याने हा हल्ला वाघाने केला की बिबट्याने, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लोखंडवाडी येथील शेतकरी रावसाहेब साधू पिंपळे हे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरापासून काही अंतरावरील गायरान क्षेत्रातील सर्वे क्रमांक २७ मध्ये जनावरे चारत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने अचानक गायीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर गायीला सुमारे २०० मीटर अंतरावर ओढत नेऊन ठार केले.
घटनेची माहिती मिळताच आष्टी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला. वन्यप्राण्याची ओळख निश्चित करण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच वनविभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी हल्ला नेमका कोणत्या वन्यप्राण्याने केला, याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगितले. वन्यप्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
वनपाल लक्ष्मण तागड, वनरक्षक कल्पना विधाते, बन्सी तांदळे, गौरव पवार, दत्तू भूकन आणि जयसिंग मोहिते यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या घटनेनंतर लोखंडवाडी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, जनावरे चारताना आणि शेतात काम करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

stay connected