विजयकुमारजी देसले यांचा ‘ज्ञानवेध’ हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला पंख देणारे आणि ज्ञानाच्या क्षितिजाला नवी दिशा देणारे अनोखे शैक्षणिक दालन आहे.

 विजयकुमारजी  देसले यांचा ‘ज्ञानवेध’ हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला पंख देणारे आणि ज्ञानाच्या क्षितिजाला नवी दिशा देणारे अनोखे शैक्षणिक दालन आहे.





( पुस्तक परिक्षण :- नवनाथजी आनंदा रणखांबे) 


  ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा संचय नव्हे,  तर प्राप्त झालेल्या माहितीचे आकलन करून त्यातून विवेकाची निर्मिती करणे होय. ज्ञान माणसाला विचार करायला शिकवते, संस्कार त्याला माणूस म्हणून घडवतात आणि शिक्षण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला प्रगल्भतेच्या दिशेने घेऊन जाते. ज्या शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासेची बीजे रुजतात, विचारांचे अंकुर फुटतात आणि सामाजिक जाणिवांचे वटवृक्ष बहरतात, तेच शिक्षण खऱ्या अर्थाने जीवनाभिमुख ठरते. अशाच ज्ञानाभिमुख, संस्कारक्षम आणि अनुभवसमृद्ध शिक्षणाचा सुंदर आविष्कार म्हणजे महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त शिक्षक, साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षणतज्ज्ञ विजयकुमार राजाराम देसले यांचे ‘ज्ञानवेध’ हे पुस्तक!


   'ज्ञानवेध' हे नावच आपल्या आशयाची दिशा स्पष्ट करते. ज्ञानाचा वेध घेणे म्हणजे केवळ ज्ञात गोष्टींची उजळणी करणे नव्हे, तर अज्ञाताच्या प्रदेशात जिज्ञासेची मशाल घेऊन प्रवेश करणे होय. या पुस्तकातून लेखकाने वर्षभरातील महत्त्वाचे दिवस, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष, सण-उत्सव, महापुरुषांचे जीवनकार्य, सामाजिक परिवर्तन, भारतीय संस्कृती, शिक्षण, योग, वाचनसंस्कृती आणि राष्ट्रीय मूल्ये अशा विविध विषयांचा व्यापक पट वाचकांसमोर उलगडला आहे. खऱ्या अर्थाने हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला आकार देणारी एक वैचारिक ज्ञानयात्रा आहे. शाळेच्या चार भिंतींमध्ये मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणाला जीवनातील अनुभवांची, इतिहासाची, संस्कृतीची आणि सामाजिक जाणिवांची जोड देण्याचा लेखकाचा प्रयत्न या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून जाणवतो. विजयकुमारजी  देसले यांच्या ‘ज्ञानवेध’ या पुस्तकाचा पुढील ११ मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात आढावा घेऊया….. 


१) शिक्षकाच्या अंतःकरणातून साकारलेले ज्ञानमंदिर :- 


     विजयकुमार देसले यांचे व्यक्तिमत्त्व हे शिक्षकापुरते मर्यादित नाही. ते शिक्षक, कवी, लेखक, व्याख्याते, निवेदक, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक आणि सामाजिक प्रबोधनकार अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. जव्हार आणि शहापूर तालुक्यातील दुर्गम भागांत तब्बल २८ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी न मानता जीवनध्येय म्हणून स्वीकारले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या निष्ठेची आणि उपक्रमशीलतेची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि २०१७-१८ मध्ये त्यांना राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. सेवेच्या विसाव्या वर्षी मिळालेला हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करणारा आहे. एखादा शिक्षक वर्गात धडे शिकवतो; परंतु खरा शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ शिकवतो. पुस्तकातील अक्षरांची ओळख करून देणे ही अध्यापनाची सुरुवात असते, तर त्या अक्षरांमधून विचारांची दृष्टी निर्माण करणे ही शिक्षकाच्या कार्याची खरी परिपूर्ती असते. देसले सरांच्या लेखनातून ही दुसरी भूमिका ठळकपणे जाणवते. त्यांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी असलेली आंतरिक तळमळ, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची ऊर्मी यांचा संगम म्हणजे ‘ज्ञानवेध’ होय. म्हणूनच या पुस्तकाकडे केवळ एका लेखकाची साहित्यनिर्मिती म्हणून न पाहता, एका समर्पित शिक्षकाने आपल्या अनुभवांची समाजाला दिलेली ज्ञानशिदोरी म्हणून पाहायला हवे.


२) दिनविशेषांचे निमित्त, ज्ञानप्रबोधनाचा व्यापक हेतू :- 


   वर्षातील प्रत्येक दिवसाला काही ना काही ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा वैज्ञानिक महत्त्व असते. मात्र दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अनेकदा या दिवसांचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दिनविशेष हे केवळ प्रार्थनेच्या वेळी सांगितले जाणारे दोन-चार वाक्यांचे माहितीपर विषय ठरतात. लेखकाने हीच मर्यादा ओळखून दिनविशेषांना ज्ञानप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवले आहे. आंतरराष्ट्रीय योगदिन, गुरुपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, शिक्षकदिन, वाचन प्रेरणा दिन, बालदिन, दिव्यांगोत्सव, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक महिला दिन, गुढीपाडवा अशा विविध दिवसांचे महत्त्व सांगताना लेखक केवळ घटनांची नोंद करत नाही, तर त्या दिवसामागील विचार, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सामाजिक संदेश यांचाही वेध घेतो. दिनदर्शिकेतील तारीख जेव्हा इतिहासाशी संवाद साधते, तेव्हा ती केवळ तारीख राहत नाही, तर ती स्मृतीचा उत्सव बनते. एखादा दिवस का साजरा केला जातो, त्यामागील इतिहास काय आहे, त्या दिवसातून कोणती प्रेरणा घ्यायची आणि वर्तमान जीवनात त्याचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो. या अर्थाने ‘ज्ञानवेध’ हे दिनविशेषांचे पुस्तक नसून दिनविशेषांच्या माध्यमातून जीवनविशेष समजावून सांगणारे पुस्तक आहे.


३) इतिहास, संस्कृती आणि महापुरुषांच्या विचारांचा ज्ञानदीप :- 


    भारतीय संस्कृतीची समृद्धी ही तिच्या विविधतेत, विचारपरंपरेत आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात सामावलेली आहे. या संस्कृतीचा परिचय नव्या पिढीला करून देताना केवळ गौरवगाथा सांगणे पुरेसे नसते, तर त्या इतिहासातील संघर्ष, परिवर्तन आणि मानवी मूल्ये समजावून सांगणेही आवश्यक असते. ‘ज्ञानवेध’मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, समाजसुधारकांचे योगदान, सण-उत्सव आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा समावेश पुस्तकाच्या आशयाला व्यापकता प्रदान करतो. महापुरुषांचे जीवन हे केवळ चरित्रवाचनापुरते मर्यादित नसते. त्यांच्या संघर्षातून प्रेरणा, त्यांच्या विचारांतून विवेक आणि त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सामर्थ्य शिकवते. महात्मा फुले यांचे कार्य सामाजिक समतेचा विचार देते. सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.  तर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वंचितांच्या जगण्याला शब्द देते. अशा विविध व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना झाला, तर त्यांच्या मनात इतिहासाविषयी आदर निर्माण होण्याबरोबरच वर्तमानातील सामाजिक जबाबदारीचे भानही विकसित होऊ शकते..लेखकाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा आधार घेत भारतीय संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांचा संबंध स्पष्ट करण्याचा केलेला प्रयत्न विशेष महत्त्वाचा आहे. ‘एक व्यक्ती, एक न्याय, एक मत’ या लोकशाही मूल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही या पुस्तकाची वैचारिक जमेची बाजू आहे.


४) शिक्षण म्हणजे पाठांतर नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण जडणघडण :-


    आजच्या शिक्षणव्यवस्थेसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना माहितीच्या महासागरात पोहताना ज्ञानाचा मोती शोधायला शिकवणे. इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल माध्यमांमुळे माहिती सहज उपलब्ध झाली आहे; परंतु त्या माहितीचे चिकित्सक आकलन करण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानवेध’चे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे, परीक्षा आणि गुणांच्या चौकटीत बंदिस्त राहू नये, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि नैतिक विकासाला चालना देणारे असावे, ही भूमिका पुस्तकातून प्रभावीपणे व्यक्त होते..योगदिनाच्या निमित्ताने शरीर आणि मनाचे आरोग्य, गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून गुरु-शिष्य नाते, वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून ज्ञानाची आवड, शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षकांचे योगदान आणि दिव्यांग दिनाच्या माध्यमातून संवेदनशीलता अशा विविध अंगांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार केला आहे.

या पुस्तकातील प्रत्येक विषय विद्यार्थ्यांच्या मनात एखादे नवे प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि त्या प्रश्नातून ज्ञानाचा नवा मार्ग खुला करतो. शिक्षणाची खरी ताकद ही विद्यार्थ्यांना उत्तरे पाठ करून देण्यात नसून त्यांना प्रश्न विचारण्याची प्रेरणा देण्यात आहे. या दृष्टीने ‘ज्ञानवेध’ हे शिक्षकांसाठीही मार्गदर्शक ठरते.


५) वाचनसंस्कृती : ज्ञानसमृद्ध समाजाच्या निर्मितीचा पाया :- 


   वाचन ही केवळ छंदाची बाब नाही, तर ती व्यक्तिमत्त्व विकासाची आणि वैचारिक प्रगल्भतेची मूलभूत गरज आहे. पुस्तकांच्या सहवासात वाढणारे मूल विचारशील बनते, त्याची कल्पनाशक्ती विकसित होते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. लेखकाने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, पुस्तकांशी मैत्री करावी आणि मिळवलेले ज्ञान आपल्या जीवनात उपयोगात आणावे, हा या पुस्तकामागील महत्त्वाचा हेतू आहे. लेखकाने आपल्या मनोगतात मांडलेली एक भूमिका विशेष लक्षवेधी आहे. पुस्तक वाचून झाल्यावर ते स्वतःजवळ न ठेवता इतरांनाही वाचण्यासाठी द्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.


६) किती साधा, पण किती उदात्त विचार! :- 


      ज्ञान हे बंद तिजोरीतील धन नसून प्रवाही नदीसारखे असावे. ते एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे प्रवाहित झाले पाहिजे. पुस्तकाचे पान उलटताना केवळ अक्षरे वाचली जाऊ नयेत, तर विचारांची कवाडे उघडली जावीत, हीच वाचनसंस्कृतीची खरी फलश्रुती आहे. ‘ज्ञानवेध’ हे पुस्तक या वाचनसंस्कृतीला चालना देणारे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील ज्ञानसेतू आहे

शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नाही. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांच्या सहभागातून शिक्षणाची प्रक्रिया अधिक समृद्ध होत असते.

‘ज्ञानवेध’ या तिन्ही घटकांना एकत्र जोडणारा ज्ञानसेतू म्हणून समोर येते. विद्यार्थ्यांना वर्षभरातील महत्त्वाच्या दिवसांची माहिती मिळते. शिक्षकांना शालेय आणि सहशालेय उपक्रमांची पार्श्वभूमी समजते. पालकांना मुलांच्या ज्ञानविकासासाठी उपयुक्त संदर्भ उपलब्ध होतात.


६) विशेषतः-


   शालेय स्तरावर परिपाठ, विशेष दिनांचे आयोजन, वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवताना या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या दिवसाचे महत्त्व समजून घेऊन त्यानुसार उपक्रम आखण्याची दिशा शिक्षकांना यातून मिळू शकते. म्हणूनच हे पुस्तक शालेय ग्रंथालयात असावे, शिक्षकांच्या संदर्भसाहित्यात स्थान मिळावे आणि विद्यार्थ्यांच्या वाचनविश्वात प्रवेश करावा, अशी अपेक्षा रास्त वाटते.


७) ज्ञानाच्या प्रवासामागील साधना : लेखकाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व :- 


    विजयकुमार देसले यांच्या लेखनाचा विचार करताना त्यांच्या साहित्यिक प्रवासाची दखल घेणे अपरिहार्य आहे. आतापर्यंत त्यांनी पंधरा पुस्तके प्रकाशित केली आहेत. बी.एड. अभ्यासक्रमावर आधारित नऊ पुस्तकांची अभ्यासमाला, 'गंमतगाणी', 'विचारमंथन', 'पाऊलखुणा', 'गंध फुलांचा' आणि 'चंदेरी दुनिया' यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले आहेत. 'चंदेरी दुनिया' या बालकवितासंग्रहाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून प्रकाशनासाठी निवड होणे ही त्यांच्या बालसाहित्यिक कार्याची विशेष दखल आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्ससह विविध वृत्तपत्रे, शैक्षणिक मासिके, दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधील त्यांचे लेखन त्यांच्या सातत्यपूर्ण लेखनसाधनेची साक्ष देते. ७८ हून अधिक व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक प्रबोधनाचे कार्य केले आहे. राज्यस्तरीय परिषदांमध्ये संशोधनपर लेखांचे सादरीकरण आणि शैक्षणिक जर्नल्समधील लेखन यामुळे त्यांच्या कार्याला अभ्यासपूर्ण परिमाण प्राप्त झाले आहे.

शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेला समन्वय उल्लेखनीय आहे. १५० हून अधिक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला असला, तरी या सन्मानांच्या पलीकडे जाऊन ज्ञानदानाची अखंड साधना करणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. त्यांच्या लेखणीला अध्यापनाचा अनुभव आहे, चिंतनाची खोली आहे, निरीक्षणाची सूक्ष्मता आहे आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनात केवळ माहितीचा पसारा नसून अनुभवांची समृद्ध शिदोरी जाणवते.


८) मान्यवरांचे शुभाशीर्वाद आणि पुस्तकाचे वैचारिक अधिष्ठान :- 


   ‘ज्ञानवेध’ या पुस्तकाला लाभलेले मान्यवरांचे आशीर्वाद, अभिप्राय आणि प्रस्तावना हे पुस्तकाच्या महत्त्वात भर घालणारे आहेत. प्रसिद्ध साहित्यिका आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी पुस्तकाचे कौतुक करताना त्यातील सहजता, स्पष्टता, सरलता, लाघवीपणा आणि प्रवाहीपणा या गुणांचा गौरव केला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल आणि शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी त्यांची अपेक्षा विशेष महत्त्वाची आहे..ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी ‘ज्ञानवेध’ला केवळ पुस्तक न मानता एक उपक्रम पुस्तिका म्हणून गौरविले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जाणीव, अनुभवाधारित शिक्षणाची दिशा आणि शिक्षकांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार या अंगांनी त्यांनी पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. लोककवी प्रशांत मोरे यांनी व्यक्त केलेला 'मी शब्दात अडकलो आहे' हा भावपूर्ण अभिप्राय लेखकाच्या शब्दसाधनेला दिलेली काव्यात्मक दाद आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती, समाजसुधारकांचे योगदान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला शैक्षणिक अधिष्ठान प्राप्त करून देते. त्यांनी लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा, विषयवैविध्याचा आणि अनुभवाधारित मांडणीचा गौरव केला आहे. या मान्यवरांच्या अभिप्रायांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, ‘ज्ञानवेध’चे महत्त्व केवळ पुस्तकाच्या पानांपुरते मर्यादित नाही; तर त्याचा संबंध शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि समाजाची ज्ञानसमृद्धी यांच्याशी आहे.


९) भाषा, शैली आणि आशयाची वैशिष्ट्यपूर्ण वीण :- 


   ‘ज्ञानवेध’च्या लेखनशैलीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विषयानुरूप सहजता आणि माहितीची सुबोध मांडणी. विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा वापरणे आणि त्याच वेळी विषयाचे गांभीर्य टिकवून ठेवणे हे लेखकासमोरील आव्हान असते. देसले सरांनी या दोन्ही बाबींचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनात माहितीपरता आणि प्रेरणादायीपणा यांचा संगम दिसतो. इतिहास, संस्कृती, समाज आणि शिक्षण यांसारख्या विषयांची मांडणी करताना ते वाचकाला विषयाशी जोडून ठेवतात. या पुस्तकाच्या शीर्षकातच एक सुंदर रूपक दडलेले आहे. 'ज्ञान' ही प्रकाशाची ज्योत मानली, तर 'वेध' हा त्या प्रकाशाच्या दिशेने जाणारा शोधप्रवास आहे. पुस्तकातील विविध विषय म्हणजे या प्रवासातील ज्ञानदीप आहेत. विद्यार्थी हा त्या प्रकाशाचा शोध घेणारा प्रवासी आहे, तर शिक्षक हा त्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. अशा प्रकारे पुस्तकाचे नाव, त्याचा आशय आणि त्यामागील शैक्षणिक उद्देश यांची सुंदर सांगड घातली गेली आहे.


१०) काही अपेक्षा आणि चिकित्सक निरीक्षण :- 


   या पुस्तकाची उपयुक्तता अधिक व्यापक व्हावी, या दृष्टीने दिनविशेषांच्या माहितीबरोबरच प्रत्येक विषयाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय प्रश्न, चिंतनपर प्रश्न, कृतीआधारित उपक्रम, प्रश्नमंजुषा आणि संदर्भवाचनाची माहिती दिल्यास पुस्तकाचा उपयोग अधिक परिणामकारक होऊ शकतो. असे माझे मत आहे. विषयांच्या स्वरूपानुसार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांसाठी स्वतंत्र उपयोजनात्मक सूचना दिल्यास शिक्षकांना अध्यापन आणि उपक्रम नियोजनासाठी अधिक मदत मिळेल. तसेच महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांसाठी संदर्भग्रंथ आणि विश्वासार्ह माहितीचे स्रोत नमूद केल्यास पुस्तकाचे संदर्भमूल्य अधिक दृढ होईल. पुढील आवृत्तीला अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने याचा विचार व्हावा ही अपेक्षा आहे.


११) समारोप :- 


  ज्ञानाच्या आकाशात उंच भरारी घेण्याची प्रेरणा आजच्या काळात शिक्षणासमोर अनेक आव्हाने आहेत. माहितीचा स्फोट झाला आहे; पण विचारांची खोली वाढवण्याची गरज आहे. स्पर्धा वाढली आहे; पण संस्कारांची जपणूकही तितकीच आवश्यक आहे. गुणांच्या शर्यतीत विद्यार्थी पुढे जात आहेत; मात्र त्याचबरोबर त्यांच्यात माणुसकी, संवेदनशीलता, विवेक आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित होणेही गरजेचे आहे..या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानवेध’ हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करते. ते विद्यार्थ्यांच्या हातात माहितीचे साधन देते, मनात जिज्ञासेची ज्योत पेटवते आणि विचारांना व्यापक आकाश उपलब्ध करून देते. एका शिक्षकाने आपल्या प्रदीर्घ अध्यापन अनुभवातून, वाचनातून, चिंतनातून आणि निरीक्षणातून जमा केलेले ज्ञान समाजाच्या पुढील पिढीला समर्पित करणे ही अत्यंत मोलाची साहित्यिक आणि शैक्षणिक कृती आहे. 


    विजयकुमारजी  देसले यांचे वैशिष्ट्य असे की, ते वर्गखोलीत विद्यार्थ्यांना शिकवतात आणि लेखणीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला शिकण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या हातातील लेखणी ही केवळ अक्षरे उमटवणारी लेखणी नाही, तर ती नव्या पिढीच्या भविष्याची पायाभरणी करणारी ज्ञानकुदळ आहे. त्यांच्या विचारांची शिदोरी ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी आहे..खऱ्या अर्थाने ‘ज्ञानवेध’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या अथांग सागरात डोकावण्यासाठी दिलेली एक छोटीशी नौका आहे. 

ही नौका घेऊन विद्यार्थी निश्चितच यशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतील. पुस्तक म्हणजे माणसाच्या हातातील ज्ञानाची चावी, शिक्षक म्हणजे भविष्याच्या दाराची किल्ली आणि विद्यार्थी म्हणजे उद्याच्या समाजाचा आश्वासक चेहरा. या तिन्ही घटकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘ज्ञानवेध’ करतो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, ज्ञानाची गंगा केवळ एका पिढीपुरती मर्यादित राहू नये, तर तिचे प्रवाह पुढील पिढ्यांच्या मनामनांतून वाहत राहावेत. त्या ज्ञानप्रवाहाला शब्दांचे पात्र देणारे विजयकुमार देसले यांचे हे पुस्तक निश्चितच स्वागतार्ह आहे. ‘ज्ञानवेध’ हे पुस्तक ज्ञानाकडून प्रज्ञानाकडे, माहितीपासून आकलनाकडे आणि शिक्षणाकडून जीवनसंस्कारांकडे घेऊन जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.  लेखकाचे योगदान निश्चितच अभिनंदनीय आहे. शाळा, ग्रंथालये, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.

लेखक विजयकुमार देसले यांच्या ज्ञानसाधनेला, साहित्यनिर्मितीला आणि शैक्षणिक कार्याला मनःपूर्वक सलाम आणि शुभेच्छा! ज्ञानाचा वेध घेऊया, वाचनाचा वारसा जपूया आणि सुजाण, संवेदनशील व विवेकशील पिढी घडवूया!

—------------------

पुस्तक :-  ज्ञानवेध
लेखक :- विजयकुमारजी राजाराम देसले
एकूण पाने : -९६ 
किंमत :- २००/- 
प्रकाशन : रामा क्रिएटिव्ह पब्लिकेशन, पुणे
पुस्तक परीक्षण :-  नवनाथजी आनंदा रणखांबे 
( लेखक हे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने सन्मानित असून  आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विविध बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक आहेत.) 

—-----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर