आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही एकीची वैद्यकीय तर दुसरीची अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड* -------------------- *मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या पाठबळाला यश; मुस्लिम कुटुंबातील दोन्ही मुलींची उल्लेखनीय कामगिरी*

 *आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही एकीची वैद्यकीय तर दुसरीची अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड*
--------------------
*मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या पाठबळाला यश; मुस्लिम कुटुंबातील दोन्ही मुलींची उल्लेखनीय कामगिरी*



-----------------------


आष्टी (प्रतिनिधी) : अत्यंत सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती नाजूक आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत आष्टी शहरातील रिक्षाचालक खलील शेख यांच्या दोन्ही मुलींनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोठी मुलगी तहेरीन याची वैद्यकीय शिक्षणासाठी राज्य कोठ्यातून आष्टी येथील महेश आयुर्वेदिक महाविद्यालय येथे निवड झाली असून लहान मुलगी जरीन शेख हिची गव्हर्मेंट पॉलिटेक्निकल कॉलेज पुणे येथे पहिल्याच फेरीत निवड झाली आहे. दोन्ही बहिणींच्या या शैक्षणिक यशामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        खलील शेख हे शहरात मालवाहतूक रिक्षा चालवतात. घरची परिस्थिती हलाकीची आणि आर्थिक अडचणी असतानाही त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. शेख यांच्या दोन्ही मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता मिळवली. डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सातत्याने अभ्यास केला.  परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्धार या दोन्ही बहिणींनी कायम ठेवला. 

        कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च भागवताना कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या अडचणींना न डगमगता दोन्ही बहिणींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मेहनतीला अखेर यश मिळाले असून पुढील शिक्षणाच्या दिशेने त्यांचे पहिले महत्त्वाचे पाऊल पडले आहे. दोन्ही मुलींच्या या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे त्याग, प्रोत्साहन आणि मुलींवर असलेला विश्वास महत्त्वाचा ठरला. आर्थिक परिस्थिती अनुकूल नसतानाही मुलींनी मोठे स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्यक पाठबळ द्यावे, याचे हे कुटुंब प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

            तहेरीन आणि जरीन यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला असून, “परिस्थिती अडथळा ठरू शकते; मात्र जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर यश मिळवता येते,” असा संदेश या दोन्ही बहिणींच्या यशातून मिळत आहे. तहेरीन शेख आणि जरीन शेख या दोघी बहिणींनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षक, सामाजिक, राजकीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.




---------

*ऑनलाईन क्लास करून मिळवले यश*

------------

एकीकडे सर्वच पालक आपल्या पाल्यांना निट (NEET) परीक्षेच्या तयारीसाठी लातूर, पुणे व इतरत्र पाठवत असताना तहेरीन शेख हिने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ओळखून घरातच राहूनच ऑनलाईन क्लास केले आणि 720 पैकी 412 गुण घेऊन आज तिला तिच्या शहरातच वैद्यकीय शिक्षण हे मोफत मिळाले आहे.


----------

*दोघी बहिणी कन्या प्रशाला जि.प. शाळेच्या विद्यार्थिनी*

------------

शहरातील पीएमश्री पुरस्कार प्राप्त कन्या प्रशाला या जिल्हा परिषद शाळेत तहेरीन आणि जरीन यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कन्या प्रशालेची आजपर्यंतची शैक्षणिक वाटचाल यशस्वी राहिली असून शाळेतून अनेक विद्यार्थिनी मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर