पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद बारामतीतील तिघांना अटक; 92.09 लाखांच्या बनावट नोटांसह 1.03 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद

बारामतीतील तिघांना अटक; 92.09 लाखांच्या बनावट नोटांसह 1.03 कोटींचा मुद्देमाल जप्त




अहिल्यानगर / प्रतिनिधी : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 500 रुपयांच्या दराच्या 18 हजार 419 बनावट नोटा, पाच मोबाईल व एक व्हॉक्सवॅगन कार असा एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बनावट नोटांची दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रुपये आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे व पथकातील अंमलदारांनी कारवाई सुरू केली होती.

29 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना गणेश दिलीप शेवाळे हा वडगाव रोड येथील विनायक कॉलनीत राहत असून, त्याच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत गणेश शेवाळे याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरातील जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीमध्ये 500 रुपयांच्या 18,419 बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदाचे बंडल आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी
1) गणेश दिलीप शेवाळे (वय 33, रा. कोर्टाजवळ, अशोकनगर, बारामती),
2) सुमित विकास चंदनशिवे (वय 25, रा. तांदुळवाडी, गुलमोहर सोसायटी, बारामती) आणि
3) सुरज वसंत कांबळे (वय 27, रा. झारगडवाडी, जिल्हा परिषद शाळेजवळ, बारामती)

यांना ताब्यात घेतले.

1 कोटी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत पोलिसांनी 500 रुपयांच्या 18,419 बनावट नोटा, पाच मोबाईल फोन आणि एमएच-14-डीएफ-0365 क्रमांकाची व्हॉक्सवॅगन कंपनीची कार, असा एकूण 1,03,74,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बनावट नोटा कुठून आणल्या?

पोलिसांनी ताब्यातील आरोपींची अधिक चौकशी केली असता, गणेश शेवाळे याने जप्त केलेल्या बनावट नोटा त्याचे साथीदार प्रताप धुमाळ (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, रा. बोल्हेगाव, ता. अहिल्यानगर), अशोक भिमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, ता. अहिल्यानगर) आणि अम्मु (पूर्ण नाव माहित नाही, रा. मालेगाव, जि. नाशिक) यांच्या माध्यमातून मिळाल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांचा शोध सुरू असून ते फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी यापूर्वी नागरिकांना ‘पैशाचा पाऊस पाडतो’ असे सांगून त्यांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण केली. त्यांचा विश्वास संपादन करून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 790/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 179, 180, 318(4), 3(5) तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदिप पवार, विष्णु भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर