प्रश्नासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन माजी आ. भीमराव धाेंडे
समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून मराठवाड्याला प्राधान्य देण्याचा आग्रह
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदन
बीड
मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे २४०० टीएमसी पाणी अडवून त्यात पाटोदा, शिरूर व आष्टी भागाचा प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. या प्रश्नासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही माजी आमदार भीमराव धोंडे दिला.
बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथून काढण्यात आला. या माेर्चात बैलगाडी मध्ये माजी आमदार भीमराव धाेंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह इतर शेतकरी अन्य बैलगाडीमध्ये हाेते हे वैशिष्ट्य हाेते. नगर राेड मार्गे हा माेर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी दाेन्ही अामदारांनी अभिवादन करुन माेर्चा पुन्हा नगर राेड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. माेर्चाचे रुपांतर नंतर सभेत झाले. यावेळी शेतकऱ्यांनी माजी आमदार धाेंडे यांनी संबाेधीत केले.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब आजबे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, विश्वस नागरगाेजे, दीपक घुमरे, वनवे दादा, भाऊसाहेब लटपटे, संताेष जाधव, नियामत बेग, सतिष झगडे, भाऊसाहेब भराटे, गुलाबराव घुमरे, अशाेकराव साळवे, रेश्मा पवळ, वैभव बडे, अशाेकराव दहिफळे, विष्णुपंत घाेलप, संताेष चव्हाण, शामराव हुले उपस्थित हाेते.
माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले, टँकरचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देण्याऐवजी थेट ग्रामपंचायतींच्या स्वाधीन करावे, रोजगार हमी योजनेतील मजुरी ही कामगारांचा हक्क असून दुष्काळाच्या काळात तातडीने हाताला काम उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली. फळबाग अनुदानासाठी हेक्टरीऐवजी एकरी निकष निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
-----
सत्तेत असूनही जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चा का?
"आम्ही सत्तेमध्ये आहोत. त्यामुळे हा मोर्चा सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात नाही. जनतेच्या न्याय मागण्या वेळेत पूर्ण व्हाव्यात आणि प्रशासनाने प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, यासाठी हा मोर्चा आहे," असे भीमराव धोंडे यांनी स्पष्ट केले. पाणीप्रश्न हा राजकीय संघर्षाचा विषय नसून पाटोदा, शिरूर आणि आष्टीतील नागरिकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
----
आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर
मोर्च्यात सहभागी न होण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर धोंडे यांनी टीका केली. "चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय आहे. या निर्णयाचे स्वागत करून मोर्च्यात सहभागी व्हायला हवे होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची केवळ प्रत प्रसिद्ध केली आहे; प्रत्यक्ष मंजुरी कुठे आहे?" असा सवाल त्यांनी केला. वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत अद्याप कोणताही डिटेल सर्व्हे झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
------
एक ते दोन वर्षांचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला : आजबे
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील हक्काच्या पाण्यासह दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आयोजित मोर्चात माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रलंबित पाणीप्रश्नांवरून सरकार आणि विद्यमान लोकप्रतिनिधींवर टीका केली. मतदारसंघाला हक्काचे पाणी मिळेपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला. उजनी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे आष्टी तालुक्याला पाणी देण्याच्या योजनेला आपण आमदार असताना मंजुरी मिळवून टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, सत्ता बदलाच्या काळात विद्यमान आमदारांनी तक्रार केल्याने काम रखडले. त्यामुळे एक ते दोन वर्षांचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला आणि मतदारसंघाला हक्काचे पाणी मिळण्यास विलंब झाला, असा आरोप आजबे यांनी केला.
------
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या
दुष्काळ जाहीर झालेल्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. शेतीचे नुकसान आणि निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रति हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी भूमिका मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली. समुद्राला वाहून जाणारे २० टीएमसी पाणी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील दुष्काळी भागासाठी वळविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. हक्काचे पाणी मिळविण्यासाठी हा लढा असून, या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका वक्त्यांनी मांडली.
-----------------
या मोर्चाची वैशिष्ट्ये
भर उन्हात शेतकरी रस्त्यावर
कडक उन्हाची पर्वा न करता आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. हक्काच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा निर्धार यावेळी दिसून आला.
---
बैलगाड्यांनी वेधले लक्ष
मोर्चामध्ये बैलगाड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक शेतीचे प्रतीक असलेल्या बैलगाड्यांमधून शेतकरी मोर्चात सहभागी झाले.
---
दोन्ही माजी आमदारांची बैलगाडीतून सहभागाची उपस्थिती
माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाचा संदेश देत शेतकरी बैलगाड्यांमधून मोर्चात सहभागी झाले.
---
हक्काच्या पाण्यासाठी टाहो
‘हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे’, ‘२० टीएमसी पाणी द्या’ अशा घोषणांनी मोर्चाचा परिसर दणाणून गेला. दुष्काळी भागासाठी पाण्याची मागणी आक्रमकपणे मांडण्यात आली.
---
शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक
मोर्चामध्ये विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकरी सहभागी झाले. हेक्टरी ५० हजार रुपये मदत, चारा छावण्या आणि पाण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.
---
महिलांचीही लक्षणीय उपस्थिती
शेतकऱ्यांसोबत महिला सहभागी झाल्याने मोर्चाला व्यापक स्वरूप आले. दुष्काळाचा थेट परिणाम कुटुंबांवर होत असल्याचा संदेश यातून देण्यात आला.
---
दुष्काळी जनजीवनाचे चित्रण
मोर्चातून शेती, पाणी आणि पशुधनाशी संबंधित प्रश्न प्रकर्षाने मांडण्यात आले. पाण्याअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे वास्तव या आंदोलनातून पुढे आले.
---
एकजुटीचे दर्शन
विविध गावांमधून आलेले शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र सहभागी झाल्याने दुष्काळी प्रश्नावर व्यापक एकजुटीचे चित्र दिसून आले.
---
मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचविण्याचा निर्धार
मोर्चातील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---
दोन्ही आमदारांसह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची केली मागणी.



stay connected