स्टोन क्रशर चालकांना तहसीलदार कार्यालयाकडून कडक इशारा; परवानगी व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांवर कारवाई
आष्टी | प्रतिनिधी :
आष्टी तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आवश्यक परवाने, कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तसेच विविध परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या स्टोन क्रशरधारकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, बीड तसेच उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्टोन क्रशर परवाना, खदान परवाना, डीएमएफ चलन, एकरकमी रूपांतरित कर भरणा तसेच E-TPAS PASS चा वापर करण्याबाबत संबंधित स्टोन क्रशरधारकांना यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आवश्यक परवानगी व दस्तऐवजांची पूर्तता न करणे, विविध परवान्यांचे नूतनीकरण न करणे आदी कारणांमुळे आष्टी तालुक्यातील काही स्टोन क्रशर मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत सील करण्यात आले आहेत.
सील तोडून क्रशर सुरू केल्यास कडक कारवाई
प्रशासनाने सील केलेले स्टोन क्रशर संबंधित चालक किंवा मालकांकडून पुन्हा सुरू करण्याची शक्यता लक्षात घेता तहसील प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. सील तोडून स्टोन क्रशर सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा सील केलेला क्रशर पुन्हा सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
अशा प्रकरणांमध्ये MLRC नियमानुसार तसेच फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास संपूर्ण जबाबदारी चालकाची
सील केलेल्या क्रशरशी संबंधित कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य कृत्य झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्टोन क्रशर चालकाची राहील, असे तहसीलदार कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने यापूर्वीच आवश्यक परवाने आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या क्रशरधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सील केलेले क्रशर पुन्हा सुरू न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचा कठोर पवित्रा
स्टोन क्रशर व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या, खदान परवाना, डीएमएफ चलन, रूपांतरित कर तसेच E-TPAS PASS आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
परवानगी व कागदपत्रांची पूर्तता न करता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या क्रशरधारकांवर यापुढेही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांची पूर्तता करूनच स्टोन क्रशर सुरू करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.

stay connected