15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा; “हे न्याय देणं नाही” — मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात

 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा; “हे न्याय देणं नाही” — मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात



अंतरवाली सराटी | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. सरकारने मराठा समाजाच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे याला न्याय देणे म्हणता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

“तुम्ही गरीबांचं वाटोळं केलं. देऊन मराठा समाजाला पश्चात्ताप करण्याच्या उंबरठ्यावर आणलं. तुम्हाला माहिती नाही, मराठा समाज बाप आहे. समाजाला माहिती आहे की तुम्ही समाजाची पिळवणूक केली,” अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारवर टीका केली.

शिष्टमंडळासमोर एक भूमिका, गाडीत आणि हॉटेलमध्ये दुसरी भूमिका?

सरकारच्या शिष्टमंडळावरही जरांगे यांनी गंभीर आरोप केले. शिष्टमंडळ म्हणून आल्यानंतर वेगळी भाषा आणि गाडीत बसल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगळी भूमिका घेतली जाते, असा दावा त्यांनी केला. “तुम्ही काही मान्य केलं नाही,” असेही ते म्हणाले.

उदय सामंत यांच्यावर थेट निशाणा

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. “चुकीच्याला चुकीचं म्हणू नको का? तुम्ही आम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवलं आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

तसेच, “तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे. शिंदेंनी चूक केली ती कबूल करा,” असे म्हणत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. शिरसाट यांच्या म्हणण्यावरून मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द का करण्यात आली, असा सवालही त्यांनी केला.

फडणवीसांना 12 तारखेपर्यंत थांबण्याचा इशारा

मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारला 12 तारखेपर्यंत थांबण्याचे आवाहन केले. “तुम्ही म्हणता तेच मागतो आम्ही. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. तुम्ही 12 तारखेपर्यंत थांबा,” असे ते म्हणाले.

सरकारने आरक्षण देण्याच्या नावाखाली मराठा समाजाचे नुकसान केले असल्याची टीकाही त्यांनी केली.

विखे पाटलांवरही जरांगेंचा हल्लाबोल

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. “मराठ्यांना याने अर्धवट फासावर सोडून दिलं. हा फक्त आंदोलन कसं मोडलं पाहिजे, हेच बघतो,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला केला जातोय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी सत्य बोललो. मी घराणे सांगितले आणि त्यांचे वाटोळे भाजपने कसे केले ते सांगितले आहे.”

भाजपमध्ये मोठा कलह आणि अंतर्गत स्पर्धा असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील संबंधांवरही त्यांनी भाष्य केले. “शिंदेंना भाजप सांगेल तेच करायचं आहे,” असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेत पूर्वी अंगावर जाणाऱ्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र आता भाजपकडून शिंदे गटावर नियंत्रण ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या नेतृत्वावर गंभीर आरोप

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभा केला; मात्र त्यानंतर अनेक राजकीय घराणी संपवण्यात आली, असा आरोप जरांगे यांनी केला. राम शिंदे, निलंगेकर आणि अशोक चव्हाण यांच्या राजकीय घराण्यांचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर टीका केली.

तसेच गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “गुलाबराव पाटील यांना बोलण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवाल करत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

नाशिकच्या मराठा बैठकीवर बोलण्यास जरांगेंचा नकार

नाशिकमध्ये झालेल्या मराठा बैठकीबाबत विचारले असता जरांगे पाटील यांनी सावध भूमिका घेतली. “चांगलं आहे. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. ते माझ्याबद्दल बोलल्यानंतर बघू,” असे ते म्हणाले.

विखे यांचा त्यांना आसरा असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मात्र संबंधित लोकांनी आपल्या विरोधात वक्तव्य केलेले नसल्याने आपणही त्यांच्यावर बोललो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरत गोगावले यांना थेट इशारा

भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरही जरांगे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. “मी तयार आहे, कधीही आहे, सज्ज आहे. तुम्ही दुसऱ्या शेठ आहात. माझ्या नादाला लागू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

आपल्याकडे पुरावे असून ते योग्य वेळी माध्यमांसमोर मांडणार असल्याचेही जरांगे म्हणाले. “मी शिंदेंवर बोलणार आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मराठा समाजाच्या संसाराचे नुकसान करणाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेऊ नका, असे आवाहन केले.

“आरक्षण द्यायचं नसेल तर अंतरवालीत येऊ नका”

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

“तुम्हाला आरक्षण द्यायचा कंटाळा आला असेल आणि यावर त्यावर बोलू नका, असं म्हणायचं असेल, तुम्ही फक्त कारण देत असाल तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये,” असे ते म्हणाले.

आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत कोणत्या नेत्यावर बोलू नका, कोणाच्या विरोधात भूमिका घेऊ नका, अशा सूचना देणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“तुम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे नसतील तर अंतरवालीत येऊ नका. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करून संपून जाणार आहात. तुम्ही काय करता, तेही आम्ही बघू,” असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकार आणि संबंधित नेत्यांना दिला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या या पत्रकार परिषदेतील आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला तरी, महत्त्वाच्या मागण्यांबाबत समाधान झालेले नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि मराठा आंदोलन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर