Ahilyanagar News live सुधारित मोजणी नकाशातून सावेडीतील नैसर्गिक नाले गायब ४५ मीटर उंच इमारत वादात; उपअधीक्षक भिंगारदिवेंच्या चौकशीचे आदेश

 सुधारित मोजणी नकाशातून सावेडीतील नैसर्गिक नाले गायब

४५ मीटर उंच इमारत वादात; उपअधीक्षक भिंगारदिवेंच्या चौकशीचे आदेश





अहिल्यानगर : सावेडीतील पत्रकार चौकात सारडा महाविद्यालयालगतच्या अंतिम भूखंड क्रमांक ४३-अच्या सुधारित मोजणी नकाशातून दोन्ही बाजूंचे नैसर्गिक नाले गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, नगर भूमापन कार्यालयाचे उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून स्पष्ट निष्कर्षांसह अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी अभिलेख उपसंचालक, नाशिक प्रदेश यांना देण्यात आले आहेत.

मौजे सावेडीच्या मूळ गाव नकाशामध्ये जुना सर्वे क्रमांक १६१मधील अंतिम भूखंड क्रमांक ४३-अच्या दोन्ही बाजूंनी नैसर्गिक नाले स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘विद्यमान जमीन वापर नकाशात’देखील संबंधित परिसरातील नाले आणि नैसर्गिक जलप्रवाह दाखविण्यात आले आहेत.

हा नकाशा अंतिम विकास आराखड्याचा नसून, प्रारूप विकास आराखड्याच्या प्रक्रियेत शहरातील विद्यमान जमीन वापर आणि भौगोलिक स्थिती दर्शविणारा नकाशा आहे. मात्र, नगर भूमापन कार्यालयाने अंतिम भूखंड क्रमांक ४३-असाठी तयार केलेल्या सुधारित मोजणी नकाशामध्ये भूखंडाच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्यांचा स्पष्ट उल्लेख अथवा सीमांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मूळ गाव नकाशा आणि विद्यमान जमीन वापर नकाशात दिसणारे नाले सुधारित मोजणी नकाशातून नेमके कसे गायब झाले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित भूखंडावर सध्या सुमारे ४५ मीटर उंचीच्या विशेष इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुधारित मोजणी नकाशामध्ये दोन्ही बाजूंच्या नाल्यांची नोंद न केल्यामुळे प्रत्येक नाल्यापासून नियमानुसार आवश्यक असलेले नऊ-नऊ मीटर अंतर न सोडताच बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप शेख यांनी तक्रारीत केला आहे.



यापूर्वी प्रत्यक्ष जागेवरील नैसर्गिक नाला रुंद स्वरूपात वाहत होता. मात्र, इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या नैसर्गिक नाल्याला अरुंद नालीचे स्वरूप देऊन त्याच्या बाजूने काँक्रीटची भिंत उभी केली असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे नाल्याची मूळ रुंदी, नैसर्गिक हद्द आणि पाण्याचा प्रवाह गंभीररीत्या बाधित झाल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक स्नेहल यादव यांनी अंतिम भूखंड क्रमांक ४३-अची चतुःसीमा, पोटहिस्स्याचे मोजणीपत्रक, गाव नकाशा, खाडाखोडी उतारा तसेच प्रत्यक्ष जागेवरील नैसर्गिक नाल्याची अधिकृत नोंद मिळण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता. उपलब्ध मोजणी नकाशात लगतच्या सीमा स्पष्ट नसल्याचे तसेच विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये संबंधित भूखंडाच्या परिसरातून नैसर्गिक प्रवाह जात असल्याचेही त्यांनी लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.

तरीही दोन्ही नाल्यांची स्पष्ट नोंद आणि सीमांकन असलेला अचूक सुधारित मोजणी नकाशा मुदतीत उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी, नाल्यांपासून आवश्यक नऊ-नऊ मीटर अंतर न सोडताच बांधकाम परवानगीची प्रक्रिया पुढे गेली आणि प्रत्यक्ष बांधकामही सुरू झाले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रुंद नैसर्गिक नाल्याला अरुंद नालीचे स्वरूप देऊन काँक्रीटची भिंत उभारल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये आणि मालमत्तांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ नकाशातील त्रुटीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशीही थेट संबंधित असल्याचे शेख यांनी निदर्शनास आणून दिले आहे.



मूळ गाव नकाशा, प्रारूप विकास आराखड्यासोबत प्रसिद्ध केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा, सुधारित मोजणी नकाशा आणि प्रत्यक्ष जागेवरील सद्यस्थिती यांची भूमी अभिलेख व महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी; नाल्यांची मूळ हद्द, रुंदी आणि नैसर्गिक प्रवाह निश्चित करून उभारण्यात आलेल्या काँक्रीट भिंतीची वैधता तपासावी तसेच बाधित जलप्रवाह तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीमध्ये नाल्यांची नोंद जाणीवपूर्वक वगळल्याचे, अचूक सुधारित मोजणी नकाशा मुदतीत उपलब्ध करून न दिल्याचे किंवा वस्तुस्थिती लपविल्याचे निष्पन्न झाल्यास भिंगारदिवे यांच्यावर कठोर विभागीय कारवाई करावी. त्याचबरोबर नैसर्गिक नाला अरुंद करून त्याला नालीचे स्वरूप देणे आणि काँक्रीटची भिंत उभारणे नियमबाह्य असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी  शेख यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर