What is Islam पैगंबर मुहम्मद सल्ल केवळ मुसलमानांचेच आहेत का

 म. मुस्लिम कबीर, लातूर

---------------------------------------

पैगंबर मुहम्मद (स )केवळ मुसलमानांचेच आहेत का?

पैगंबर मुहम्मद (स )केवळ मुसलमानांचेच आहेत का?


-------------------------------------------

जगाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे स्थान एखाद्या एका समाज, प्रदेश, भाषा किंवा कालखंडाच्या मर्यादेत बांधता येत नाही. ती व्यक्तिमत्त्वे संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक चेतनेचा भाग बनतात. हजरत मुहम्मद मुस्तफा (स )हे अशाच महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. आपण निःसंशयपणे मुसलमानांचे पैगंबर, रसूल आणि मार्गदर्शक आहात; परंतु पवित्र कुरआन आपल्या पैगंबरीला केवळ मुसलमान किंवा अरबांपुरती मर्यादित ठेवत नाही. उलट, आपणास संपूर्ण विश्वासाठी ‘रहमत’ अर्थात दया व कृपेचे प्रतीक म्हणून संबोधले आहे.

म्हणूनच हा प्रश्न केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून मानवी इतिहास, नैतिकता, समाज आणि संस्कृतीच्या संदर्भातही अत्यंत महत्त्वाचा आहे—

@हजरत मुहम्मद (स )केवळ मुसलमानांचेच आहेत का?-------

या प्रश्नाचे उत्तर कुरआन, सीरते-नबवी (स )आणि स्वतः रसूलुल्लाह (स )यांच्या आचरणात अत्यंत स्पष्टपणे आढळते.

कुरआनची साक्ष : आपण ‘रहमतुल्लिल् आलमीन’ आहात.पवित्र कुरआनमध्ये अल्लाह तआला म्हणतो:“आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण विश्वासाठी केवळ दया म्हणून पाठविले आहे.”(सूरह अल-अंबिया : 107)

येथे कुरआनने ‘रहमतुल्लिल् मुसलिमीन’ ( मुसलमानांसाठी रहमत)असे म्हटलेले नाही, तर ‘रहमतुल्लिल् आलमीन’(सर्व जगासाठी रहमत)असे म्हटले आहे. ‘आलमीन’ या शब्दामध्ये सर्व जगांचा आणि सर्व सृष्टीचा व्यापक अर्थ समाविष्ट आहे. या कुरआनी अभिव्यक्तीतून रसूलुल्लाह (स )यांच्या पैगंबरीचा(प्रेषितत्व) वैश्विक पैलू स्पष्ट होतो.

आपली दया केवळ त्या लोकांपुरती मर्यादित नव्हती ज्यांनी आपली दावत स्वीकारली होती. आपल्या शिकवणीत गैर-मुस्लिम, दुर्बल, अनाथ, गरीब, शेजारी, स्त्रिया, गुलाम, प्रवासी आणि अगदी प्राण्यांच्या हक्कांचाही उल्लेख करण्यात आला आहे.कुरआनने आपल्याला संपूर्ण मानवजातीचा रसूल(प्रेषित) म्हटले..दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुरआन म्हणतो:“म्हणा : हे मानवांनो! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल म्हणून पाठविला गेलो आहे.”(सूरह अल-आराफ :158)येथे संबोधन ‘या अय्युहन नास’—‘हे मानवांनो!’ असे आहे.

ही अभिव्यक्ती अत्यंत अर्थपूर्ण आहे. जर रसूलुल्लाह (स )यांची दावत (निमंत्रण) केवळ अरबांसाठी किंवा एखाद्या विशिष्ट समाजासाठी असती, तर कुरआनमधील हा वैश्विक संबोध असण्याचे कारणच नव्हते.



कुरआन आणखी स्पष्टपणे म्हणतो:“आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावध करणारा म्हणून पाठविले आहे.”(सूरह सबा : 28)

त्यामुळे इस्लामी श्रद्धेनुसार मुहम्मद (स ) यांची पैगंबरी कोणत्याही विशिष्ट वंश, जमात किंवा भौगोलिक प्रदेशापुरती मर्यादित नसून सार्वत्रिक पैगंबरी आहे.

@‘मुसलमानांचे’ आणि ‘केवळ मुसलमानांचे’ यात फरक:---- 

येथे एक मूलभूत फरक समजून घेणे आवश्यक आहे.

हे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे की हजरत मुहम्मद (स )हे मुसलमानांचे पैगंबर आहेत. मुसलमान त्यांना अंतिम पैगंबर मानतात, त्यांच्यावर प्रेम करणे हे ईमानाचा भाग मानतात आणि त्यांच्या सुन्नतीला (आचरण)आपल्या जीवनाचा आदर्श मानतात.परंतु हे म्हणणे की “ते केवळ मुसलमानांचे आहेत”, हे कुरआनच्या त्या वैश्विक संकल्पनेशी सुसंगत नाही, ज्यामध्ये त्यांना संपूर्ण मानवजातीचा रसूल आणि संपूर्ण विश्वासाठी दया म्हणून संबोधले आहे.

रसूलुल्लाह (स )मुसलमानांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाचे केंद्र आहेत; परंतु त्यांचा नैतिक वारसा संपूर्ण मानवजातीसाठी एक महान ऐतिहासिक ठेवा देखील आहे.

आपल्या सीरतीत मानवतेचा सन्मान

रसूलुल्लाह (स )यांनी माणसाला त्याच्या मूलभूत मानवी अस्तित्वाच्या आधारे सन्मान दिला.

एका प्रसंगी एका यहुदी व्यक्तीची अंत्ययात्रा जात असताना रसूलुल्लाह (स )आदराने उभे राहिले. सहकाऱ्यांनी सांगितले की, “हे तर यहुदीचे जनाजे आहे.” त्यावर आपण (स ) म्हणाले:“तो एक जीव नाही काय?”

हे छोटेसे वाक्य मानवी सन्मानाच्या एका महान तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते.

धर्मातील मतभेद एका बाजूला; परंतु मनुष्य असल्यामुळे मनुष्याची प्रतिष्ठा आणि जीवनाची पवित्रता दुसऱ्या बाजूला.

हीच नैतिक व्यापकता सीरते-मुहम्मदी (स ) पैगंबरांच्या जीवनाला केवळ धार्मिक इतिहास न ठेवता मानवी नैतिकतेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय बनवते.

@मदीन्याचा समाज : धार्मिक विविधतेसह सहअस्तित्व:----

हिजरत (मक्याकेहुन मदिनेला प्रयाण)नंतर मदिना मुनव्वरामध्ये रसूलुल्लाह (स )यांनी अशी सामाजिक आणि सामूहिक व्यवस्था निर्माण केली, ज्यामध्ये विविध जमाती आणि धार्मिक समूह अस्तित्वात होते.

मिसाक-ए-मदिना अर्थात मदिन्याचा करार, आधुनिक ऐतिहासिक चर्चेतही एक महत्त्वपूर्ण प्रारंभिक दस्तऐवज मानला जातो. त्यामध्ये मदिन्यातील विविध समूहांचे परस्पर अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या समाजात मुसलमान होते, यहुदी जमाती होत्या आणि विविध आदिवासी व सामाजिक समूहही होते. रसूलुल्लाह (स )यांनी सामाजिक व्यवस्था, करार, न्याय आणि परस्पर जबाबदारी यांना महत्त्व दिले.

सीरती(जीवनाचा)चा हा अध्याय आपल्याला शिकवतो की मतभेद असतानाही न्याय, करार आणि परस्पर सन्मानाच्या आधारावर एकत्र समाजजीवन जगता येते.

@मक्का विजय : सामर्थ्य असूनही क्षमा---- 

रसूलुल्लाह (स )यांच्या जीवनातील सर्वांत तेजस्वी पैलूंपैकी एक म्हणजे ,सत्ता आणि सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी सूडाला आपल्या राजकारणाचा मूलभूत सिद्धांत बनविले नाही.

ज्या मक्कावासीयांनी वर्षानुवर्षे आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना त्रास दिला, मुसलमानांना मक्का सोडण्यास भाग पाडले आणि त्यांच्याशी युद्धे केली, तेच लोक मक्का विजयाच्या वेळी आपल्या समोर असहाय्य उभे होते.इतिहासाने त्या क्षणी सूडाऐवजी क्षमाशीलतेचे आणि उदारतेचे दर्शन घडविले.

ही घटना दाखवून देते की रसूलुल्लाह (स ) यांच्या नेतृत्वाचा उद्देश केवळ शत्रूचा पराभव करणे नव्हता; तर समाजाला सूडाच्या अंतहीन चक्रातून बाहेर काढणेही होता.

मानवी समानतेची महान घोषणा

हज्जतुल्-विदाच्या प्रसंगी रसूलुल्लाह (स ) यांनी मानवी समानतेची अशी तत्त्वे मांडली, ज्यांचे महत्त्व आजही कायम आहे.

आपण अज्ञानकालीन जातीय अहंकार, वंशश्रेष्ठत्व आणि कबिलाई अभिमानाच्या संकल्पनांना नाकारले.

पवित्र कुरआन म्हणतो-- “हे मानवांनो! आम्ही तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आणि तुम्हाला विविध समाज व जमाती बनविले, जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. निःसंशय, अल्लाहच्या दृष्टीने तुमच्यात सर्वांत प्रतिष्ठित तो आहे जो सर्वांत अधिक तक्वाधारक आहे.”(सूरह अल-हुजुरात : 13)

ही आयत मानवी विविधता नष्ट करण्याऐवजी तिला परस्पर परिचय आणि समजुतीचे साधन मानते.

आपल्या दयेचा विस्तार शत्रूंपर्यंतही

रसूलुल्लाह (स )यांच्या सीरतीमध्ये असे अनेक प्रसंग आढळतात, ज्यामध्ये आपण वैयक्तिक सूडाऐवजी दया, क्षमा आणि सुधारणा यांना प्राधान्य दिले.

ताइफचा प्रसंग याचे विशेष उदाहरण आहे. ताइफच्या लोकांनी आपल्याला अत्यंत त्रास दिला. तरीही आपण त्यांच्या विनाशाची इच्छा केली नाही. उलट, त्यांच्या पुढील पिढ्यांकडून ईमान आणि सदाचाराची आशा व्यक्त केली.

हा दृष्टिकोन स्पष्ट करतो की खरी सुधारणा माणसाचा नाश करण्यात नसून माणसाला घडविण्यात आहे.

@स्त्री, अनाथ, गुलाम आणि दुर्बल : नव्या समाजाच्या केंद्रस्थानी---- 

रसूलुल्लाह (स )यांच्या आगमनापूर्वी अरब समाजात स्त्रिया, गुलाम, अनाथ आणि दुर्बल वर्ग विविध प्रकारच्या अन्यायाला सामोरे जात होते.रसूलुल्लाह (स )यांनी या वर्गांच्या अधिकारांवर विशेष भर दिला.कुरआनने अनाथांच्या संपत्तीचे संरक्षण, गरीबांचा अधिकार, स्त्रियांचा वारसाहक्क आणि गुलामांशी सद्वर्तन याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले.

आपण (स )यांनी सांगितले:“तुमच्यापैकी सर्वांत उत्तम तो आहे जो आपल्या कुटुंबीयांसाठी सर्वांत उत्तम आहे.”

ही शिकवण कुटुंबाला केवळ अधिकाराचे क्षेत्र न मानता दया, जबाबदारी आणि सद्वर्तनाचे केंद्र बनवते.

शेजारी कोणत्याही धर्माचा असो

इस्लामने शेजाऱ्याच्या अधिकाराला असामान्य महत्त्व दिले आहे.रसूलुल्लाह (स ) यांनी शेजाऱ्यांशी चांगले वर्तन करण्याची सातत्याने ताकीद केली.

येथे सीरतीचे (जीवन चरित्राचे)एक मूलभूत तत्त्व समोर येते:उपासना (इबादत ) माणसाला माणसापासून दूर करण्यासाठी नसते; उलट ती माणसांचे अधिकार पूर्ण करण्यास तयार करण्यासाठी असते.

म्हणूनच मुसलमानाची धार्मिकता केवळ मशिदीतील उपस्थितीत दिसत नाही; तर त्याच्या नैतिकतेत, व्यवहारात आणि शेजाऱ्यांशी असलेल्या वर्तनातही दिसली पाहिजे.

@गैर-मुस्लिम व्यक्ती रसूलुल्लाह (स ) यांच्यावर प्रेम करू शकते का?-----

हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

गैर-मुस्लिम व्यक्तीने मुहम्मद (स )यांना पैगंबर म्हणून स्वीकारणे हे इस्लामी श्रद्धेनुसार ईमानाची अपेक्षा आहे. परंतु एखादी गैर-मुस्लिम व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नैतिक, मानवी, ऐतिहासिक किंवा नेतृत्वगुणांनी प्रभावित होऊ शकते.

जगातील विविध संस्कृती आणि धर्मांशी संबंधित अनेक अभ्यासकांनी मुहम्मद (स ) यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा, नेतृत्वाचा, कायदेव्यवस्थेतील योगदानाचा, नैतिक सुधारणांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास केला आहे.

म्हणूनच रसूलुल्लाह (स )यांना समजून घेण्यासाठी मुसलमान असणे आवश्यक नाही; मात्र त्यांना अल्लाहचा अंतिम पैगंबर मानणे हा इस्लामी ईमानाचा मूलभूत भाग आहे.

@हजरत मुहम्मद (स )यांची शिकवण आणि आजचा भारत-----

भारत हा बहुधार्मिक, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे. येथे हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी आणि इतर अनेक धार्मिक व सांस्कृतिक समुदाय शतकानुशतके एकत्र राहिले आहेत.

अशा समाजात सीरते-मुहम्मदी(पैगंबरांचे जीवन चरित्र) (स )चा अभ्यास आपल्याला परस्पर सन्मान, न्याय, मानवी प्रतिष्ठा, कराराचे पालन आणि मतभेद असूनही शांततापूर्ण सहअस्तित्व यांचे धडे देतो.

जर मुसलमान खरोखरच रसूलुल्लाह (स ) यांना ‘रहमतुल्लिल् आलमीन’ मानत असतील, तर त्यांच्या भाषा, आचरण आणि सामाजिक वर्तनातही त्या दयेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.

रसूलुल्लाह (स )यांच्यावर प्रेम करण्याचा अर्थ केवळ त्यांच्या नावाचा आदर करणे एवढाच नाही; तर त्यांच्या महान नैतिकतेला आपल्या जीवनात स्थान देणे हाही त्याचा आवश्यक भाग आहे.

@मुहम्मद पैगंबर (स )वर प्रेमाचा खरा अर्थ------

आज जगाला मुहम्मद (स )यांच्या (चरित्र)सीरतीतील ज्या पैलूची सर्वाधिक गरज आहे, तो म्हणजे मुहम्मद (स ) ची नैतिकता.

रागाच्या बदल्यात संयम, द्वेषाच्या बदल्यात सद्भावना, अन्यायाच्या बदल्यात न्याय, सूडाच्या बदल्यात क्षमा, अहंकाराच्या बदल्यात नम्रता आणि दुर्बलांच्या बाबतीत करुणा—हे सर्व मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचे, सीरते-नबवी (स )चे उज्ज्वल अध्याय आहेत.

कुरआनने रसूलुल्लाह (स )यांच्या नैतिक व्यक्तिमत्त्वाचे वर्णन अत्यंत संक्षिप्त आणि व्यापक शब्दांत केले आहे:“आणि निःसंशय, तुम्ही महान नैतिकतेवर आहात.”(सूरह अल-क़लम : 4)

याच ठिकाणी रसूलुल्लाह (स )यांचे व्यक्तिमत्त्व मुसलमानांसाठी ईमानाचे केंद्र आणि संपूर्ण मानवतेसाठी नैतिक आदर्श बनते.

@मग या प्रश्नाचे उत्तर काय?---- 

हजरत मुहम्मद (स )हे मुसलमानांचे पैगंबर आहेत; परंतु ते केवळ मुसलमानांसाठी नाहीत.इस्लामी श्रद्धेनुसार आपण खातमुन्-नबिय्यीन, म्हणजेच अंतिम पैगंबर आहात. आपली पैगंबरी संपूर्ण मानवजातीसाठी आहे आणि आपण ‘रहमतुल्लिल् आलमीन’ आहात.मुसलमानांचे कर्तव्य आहे की त्यांनी रसूलुल्लाह (स )यांच्यावर सर्वाधिक प्रेम करावे, त्यांच्या सुन्नतीचे पालन करावे आणि त्यांच्या पैगंबरीच्या स्थानाचा पूर्ण आदर राखावा.

परंतु त्याचबरोबर हेही आवश्यक आहे की जगासमोर रसूलुल्लाह (स )यांची सीरत दया, न्याय, मानवी समानता, सहिष्णुता आणि उच्च नैतिकतेच्या आरशातून मांडली जावी.

मुहम्मद (स )कोणत्याही एका वंशाचे नाहीत; कोणत्याही एका प्रदेशाचे नाहीत; कोणत्याही एका भाषेचे नाहीत.

कुरआनच्या शब्दांत आपल्या पैगंबरीचा संदेश ‘काफ्फतन लिन्नास’ म्हणजे संपूर्ण मानवजातीसाठी आहे आणि आपली दया ‘लिल् आलमीन’ म्हणजे संपूर्ण विश्वासाठी आहे.

म्हणूनच रसूलुल्लाह (स )यांच्यावरील प्रेमाची सर्वांत सुंदर अभिव्यक्ती ही आहे की आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात, आपल्या घरात, आपल्या समाजात आणि आपल्या व्यवहारात त्यांनी शिकविलेली नैतिकता निर्माण करावी.हजरत मुहम्मद (स )यांच्याशी निष्ठा म्हणजे त्यांच्या महान नैतिकतेला आपल्या जीवनाचा आरसा बनवणे.

आणि कदाचित आजच्या विखुरलेल्या, संघर्षग्रस्त आणि द्वेषाने विभागलेल्या मानवजातीला सर्वाधिक गरज याच संदेशाची आहे—दया, न्याय, मानवता आणि सदाचार यांच्यासह जीवन जगले, तर या जगातही आणि परलोकातही कल्याण प्राप्त होईल.

--------------------------------------------



कबीर वाणी
म. मुस्लिम कबीर, लातूर
8208435414

---------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर