खाकीचा धडाका; अवैध धंद्यांवर हिंगे यांचा करारी घाव!
------------------
अंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच धडक मोहीम; आठ दिवसांत १२ गुन्हे दाखल, ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त; दारू, हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर सलग छापे
----------------
राजेंद्र जैन | कडा
------------------
तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सपोनि विक्रांत हिंगे यांनी अवैध धंद्यांविरोधात रणशिंग फुंकत धडक कारवाईची मालिका सुरू केली आहे. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत देशी- विदेशी दारू विक्री, गावठी हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर बेधडक छापे टाकून पोलिसांनी तब्बल ४ लाख ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, खाकीचा दरारा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गावांमध्ये हॉटेल, धाबे तसेच इतर ठिकाणी सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्री, गावठी दारू निर्मिती आणि जुगार अड्ड्यांवर सपोनि विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सडेतोड कारवाई केली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच अवैध व्यवसायिकांवर कायद्याचा बडगा उगारत पोलिसांनी सलग धाडसत्र राबविले.
या मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री व हातभट्टी प्रकरणी १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये २ गुन्हे दाखल करून १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सपोनि विक्रांत हिंगे आणि त्यांच्या पथकाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा निर्धार अधिक ठाम झाल्याचे दिसून येत आहे.
अवैध धंद्यांविरोधातील या कठोर भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, अंभोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. "गुन्हेगारीला आळा आणि कायद्याला बळ" देणाऱ्या या मोहिमेची तालुकाभर चर्चा रंगू लागली आहे.
-------%-------
"अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. दारू विक्री, हातभट्टी, जुगार यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आमचे प्राधान्य असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून गुन्हेगारीमुक्त परिसर घडविण्यास हातभार लावावा."
-सपोनि विक्रांत हिंगे, अंभोरा
-------%-----



stay connected