शब्दगंध संमेलनाची बैठक संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी):
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या आगामी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत संमेलन अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नवोदित कवी-लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या संमेलनात गझल संमेलन व दोन स्वतंत्र काव्यसत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली. मान्यवर आणि नवोदित यांचा सुरेख मेळ घालून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला संस्थापक सचिव सुनील गोसावी, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र चोभे, नवजीवन संस्थेचे राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संमेलनाच्या विविध अंगांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यामध्ये ‘शब्दगंध कार्य गौरव पुरस्कार’, ‘जीवन गौरव पुरस्कार’, ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’, ‘कवी कट्टा’, ‘संयोजन समितीची रचना’, ‘प्रमुख पाहुण्यांची निवड’, तसेच ‘असा मी घडलो’ या विशेष उपक्रमाचा समावेश आहे. काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अहिल्यानगरचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप, तसेच १६ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नगरसेवक संपत दादा बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या स्वागताध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यंदाच्या संमेलनात एकूण सोळा विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून साहित्याच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा आगळावेगळा सोहळा ठरणार आहे.
बैठकीत मकरंद घोडके, बबनराव गिरी, शर्मिला गोसावी, प्रा. डॉ. अनिल गर्जे, सुरेखा आडम, विनय पिंपरकर, अर्चना तुपे, उमादेवी राऊत, वर्षा घुले, हर्षल आगळे, सुरेखा घोलप, संदीप गोसावी, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, स्वाती अहिरे, प्रशांत सूर्यवंशी, हौशीनाथ बोर्डे, हर्षली गिरी, गोविंद आडम आदी उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर आपापले मत मांडत संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना केल्या.
बैठकीच्या प्रारंभी सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक करून संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला, तर भगवान राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेवटी प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी आभार प्रदर्शन केले.


stay connected