ASHTI | पिंपळा गावच्या अरशान सय्यदचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण झेंडा! 🥇
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १४ वर्षीय अरशान तौफीक सय्यद या होतकरू विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत इंटरनॅशनल रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल जिंकले आहे. थायलंड येथे मंगळवार दि. ५ मे रोजी झालेल्या या स्पर्धेत त्याने आपल्या अचूक नेमबाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत भारताचा झेंडा उंचावला.
अरशान हा कडा येथील लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा इयत्ता ७ वीतील विद्यार्थी असून, लहान वयातच त्याने रायफल शूटिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १४ वर्षे वयोगटातून त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यापूर्वी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही अरशानने उत्कृष्ट कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले होते. त्या यशाच्या जोरावरच त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने थेट गोल्ड मेडल मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले.
अरशानच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक अहेमद पठाण यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अरशानने नेमबाजीतील कौशल्य अधिक परिपूर्ण केले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे आष्टी तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून अरशानवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ, शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच स्थानिक मान्यवरांनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
छोट्या गावातून मोठी झेप घेत अरशानने सिद्ध केले की, जिद्द आणि मेहनत असेल तर यश निश्चित मिळते!





stay connected