धानोरा बसस्थानकासमोरील अपूर्ण डिवायडरमुळे अपघातांची मालिका; तात्काळ उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी
धानोरा (प्रतिनिधी ) : धानोरा ते अहिल्यानगर या मुख्य मार्गाचे काम धानोरा गाव हद्दीत जवळपास पूर्णत्वास आले असले तरी, धानोरा बसस्थानकासमोरील डिवायडरसाठी करण्यात आलेला खड्डा अद्याप न बुजवल्याने येथे अपघातांची मालिका सुरू आहे. या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना अचानक अडथळा निर्माण होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामे पूर्ण झाली असली तरी बसस्थानकासमोरील डिवायडरचा भाग अर्धवट अवस्थेत आहे. खोदलेला खड्डा खुला असल्याने दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही किरकोळ अपघात येथे आधीच घडले असून, मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मुख्य चौकात तातडीने सुरक्षात्मक उपायांची गरज
धानोरा बसस्थानक हा गावातील मुख्य वर्दळीचा भाग असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तात्काळ डिवायडर नसलेले खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
याशिवाय, जनता विद्यालयाजवळील संतोषी माता चौकात तसेच बसस्थानक परिसरात गतीरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, जेणेकरून गाव हद्दीत वाहनांचा वेग नियंत्रित राहील आणि अपघात टळतील, अशी मागणी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व जनता विद्यालय प्रशासनाने केली आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्ता काम पूर्णत्वास आले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर संपूर्ण कामाचा उद्देशच व्यर्थ ठरेल. संबंधित बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती व गतीरोधक उभारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
गावाच्या मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


stay connected