मेघना झुंझम यांच्या एकपात्री प्रयोगाने प्रेक्षक भारावले महिला दिनानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणी’च्या होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

 मेघना झुंझम यांच्या एकपात्री प्रयोगाने प्रेक्षक भारावले
महिला दिनानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणी’च्या होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग




आष्टी (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमात ‘मी तुमची सावित्रीबाई फुले’ या प्रभावी एकपात्री प्रयोगाने उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या प्रयोगात सौ. मेघना झुंझम (भिंबरपाटील) यांनी आपल्या दमदार अभिनयातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्रेरणादायी गाथा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

आष्टी पंचायत समितीच्या प्रांगणात सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आष्टी तालुका दूध संघ,आष्टी नगरपंचायत कार्यालय,कासारी, मुर्शदपुर, शिंदेवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम पार पडला. मुंबई महानंद संचालिका सौ. प्राजक्ता ताई सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. परिसरातील महिलांसाठी हा कार्यक्रम प्रेरणा, मनोरंजन आणि समाजप्रबोधनाचा संगम ठरला.




एकपात्री प्रयोगाद्वारे सौ.मेघना झुंझम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष, स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य अत्यंत प्रभावीपणे सादर केले. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीमाईंचा इतिहास, समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी केलेली लढाई आणि स्त्री शिक्षणाचा लावलेला दीप या प्रयोगातून जिवंत झाला.

या सादरीकरणाने उपस्थितांना कधी भावूक केले तर कधी हसवले. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशक्ती, धाडस आणि शिक्षणाचे महत्त्व यांचा जागर या प्रयोगातून करण्यात आला. सावित्रीमाईंच्या कार्याची आठवण करून देत समाजात परिवर्तनाची प्रेरणा देणारा हा प्रयोग उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.



यावेळी महिला दिनानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणी’च्या “होम मिनिस्टर” स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम – सुमित्रा संकेत गायकवाड (आकर्षक पैठणी व फ्रिज, सन्मानचिन्ह)

द्वितीय – ऋतुजा लोंढे (आकर्षक पैठणी व वॉशिंग मशीन, सन्मानचिन्ह)

तृतीय – मनीषा शेळके (आकर्षक पैठणी व ओव्हन, सन्मानचिन्ह)

उत्तेजनार्थ – संगीता हराळ (आकर्षक पैठणी व राईस कुकर, सन्मानचिन्ह)

पाचवा – योगिता रेडेकर (इंडक्शन शेगडी, सन्मानचिन्ह)

सहावा – रेश्मा शास्त्री (टेबल फॅन, सन्मानचिन्ह)

सातवा – इलेक्ट्रिक ब्लेंडर (सन्मानचिन्ह)

आठवा – संगीता साबळे (केतली, सन्मानचिन्ह),

नववा – ज्योती प्रविण पोकळे (इस्त्री, सन्मानचिन्ह),

दहावा – जया वारंगुळे (टिफिन बॉक्स, सन्मानचिन्ह) देऊन विजेत्या महिलांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी आष्टी तालुका दूध संघ,आष्टी नगरपंचायत कार्यालय,कासारी, मुर्शदपुर, शिंदेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी,पत्रकार,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्री मेघना झुझम पाटील यांचा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान




जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्ध अभिनेत्री व प्रबोधनकार सौ. मेघना झुझम (भिंबरकर) पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आष्टी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महानंद मुंबईच्या संचालिका सौ. प्राजक्ताताई सुरेश धस यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, पत्रकार समीर शेख, जेष्ठ पत्रकार राजेंद्र लाड, दीपक उंबरकर व जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय उपाध्यक्षा सुवर्णाताई गि-हे, सरपंच वंदनाताई गायकवाड, सरपंच शालिनीताई मुळे, माजी सरपंच आदिकाताई लोखंडे, तसेच मुर्शुदपूर ग्रामपंचायत सदस्या सौ.स्वप्ना अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.तर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा १२ मार्च रोजी नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.