आई-वडिलांच्या रागावण्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या; सांगवी (पाटण) येथे दुर्दैवी घटना

 आई-वडिलांच्या रागावण्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या; सांगवी (पाटण) येथे दुर्दैवी घटना



कडा (प्रतिनिधी) – घरगुती कामाकडे कानाडोळा केल्यामुळे आई-वडिलांनी रागावल्याची मनावर घेत एका तरुणाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विराज हरिदास भगत (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विराज हा घरी काम करत असताना अनेकदा कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जाते. यावरून त्याच्या आई-वडिलांनी त्याला समज दिली आणि रागावले. या घटनेचा राग मनात धरून विराज घरातून निघून गेला.



मंगळवारी सकाळच्या सुमारास तो घराजवळील शेतात गेला आणि शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. काही वेळाने शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीने हा प्रकार पाहिल्यानंतर घरच्यांना माहिती दिली. ही घटना समजताच आई-वडील तात्काळ घटनास्थळी धावले.

त्यानंतर कुटुंबीयांनी विराजला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृत विराजच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे हवालदार भागसाहेब आहेर, अमोल नवले, गणेश भुतकर व पोलीस अमलदार सचिन पवळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.