महामानवांचे विचार घराघरात पोहचविणारे ज्येष्ठ गीतकार भीमराव काळेनंद

 


महामानवांचे विचार घराघरात पोहचविणारे ज्येष्ठ गीतकार आष्टीचे सुपूत्र भीमराव काळेनंद




आपल्या कलेच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याच्या कामासोबतच महामानवांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिकांनी आणि कलाकारांनी वेळोवेळी केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम ज्येष्ठ गीतकार, गायक भीमराव अर्जुन काळनंद (कुंभेफळकर) यांच्या कार्याला माझा सलाम !

लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड https होती लेखणीतून समाजप्रबोधन घडावे, गाण्यातून परिवर्तन घड़ावे या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन काळेनंद दादांनी हातात लेखणी घेतली आणि अनेक गाणी जन्माला घातली.
भीमराव काळेनंद बीड जिल्ह्यातील, आष्टी तालुक्याचे रहिवासी होते. कुंबेफळ हे त्यांचे मूल गाव, कुंबेफळ नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात काळेनंद यांचा जन्म झाला. हलाखीच्या परिस्थितीतही न खचता ते पुढे वाटचाल करत राहिले. कालांतराने बरीच वर्षे त्यांनी मुंबईत कल्याण तालुक्यात मोहोने आंबेवाडी या ठिकाणी वास्तव्य केले. १९७२ साली ते मुंबईत आले. खेडेगावात जन्माला आलेल्या या व्यक्तिमाचाने आपल्या गावाचे नाव कला आणि लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात नेले. इयत्ता आठवीला असताना त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली. १९७२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले आणि भीमराव काळेनंद यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण कैली, वडील भजन करायचे, त्यांच्यासोबत मी जायचो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीतरचना करायचे असे देखील त्यांनी मला सांगितले.



आजपावेतो ५००० हून अधिक भीमगीते, लोकगीते, प्रबोधनगीते, भक्तिगीते, भजन-पोवाडे यांची रचना केली. काळेनंद दादांनी सुरुवातीच्या काळात कल्याण येथील रुक्मिणी रुग्णालयात काम केले. त्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार एन.आर.सी. कंपनीमध्ये २७ वर्षे नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कंपनीमध्ये नोकरी करताना आपले लिखाण अव्याहतपणे त्यांनी सुरूच ठेवले. सोबतच तबला, ढोलकी, पेटी, हार्मोनियम अशा प्रकारचे वाद्य वाजविण्याचाही त्यांना छंद होता .

'माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावीलं त्याने', 'सहा डिसेंबर छप्पन सराली', 'मी जगेल तर या समाजासाठी', मी मरेल तर या समाजाच्यासाठी' अशी अनेक स्फूर्तिदायक गीते प्रचंड लोकप्रिय झाली, 'तर भिमानं मढवलं तुला माणूस घडवलं', 'लाख मताने निवडून आली माता रमामूळे त्या', 'बुद्धाची जयंती', 'सिद्धार्थों आम्हाला सोडून जाऊ नको', फिरे घेऊन झेंडा निळा', 'कोरोना जनजागृती, भक्तिगीते, लोकगीते अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली.

सुषमा देवी यांनी आपल्या पाहाडी आवाजाने गायिलेले 'माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं' या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात घुमाकूळ घातला. या गाण्याशिवाय डॉ. बाबासाहेबांची जयंती असो किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम असो हे गाणे वाजविल्याशिवाय प्रेक्षकांना चैन पडत नाही, असे हे गाणे आज प्रत्येक भीम अनुयायांच्या आणि सर्वाच्या ओठावर आल्याशिवाय राहत नाही. त्या गाण्याचे कवी म्हणजे भीमराव अर्जुन काळेनंद

या गाण्याचा शेवट त्यांनी असा केला आहे की, 'काळेनंद अशी ही मायी, झाली नवकोटीची आई! ती वागली प्रेमानं कुंकू लावीले रमाने' हे गाण्याचे कडवे ऐकताच काळेनंद दादा यांची आठवण मनाला चटका लावून जाते.

तसेच ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांच्या स्टेटस्वरती एकच गाणे झळकत ते म्हणजे 'सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली. हे गाणे ऐकताच डोळ्यातून आजही अश्रू ओघळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण या गाण्यातून भीमराय काळेनंद दादांनी करून दिलेली आहे. ते गाण्यात लिहतात की, शान जळता भारतभूची चितेवरी पाहिली, पाहताक्षणी काळेनंदने श्रद्धांजली वाहिली....

डबडबलेल्या अश्रुंनीही महिमा त्यांची गाईली अमर झाली भीमाची किर्ती डोळ्याने मी पाहिली... जाता जाता हृदयी ही आमुच्या मूर्ति बुद्धाची कोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली....
हे गाणं अजरामर ठरलं आहे.

मी मरेल तर या समाजासाठी, मी जगेल तर या समाजासाठी... या गाण्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि समाजाप्रती असलेलं प्रेम काळेनंद यांनी लेखणीतून हुबेहूब लेखणीतून रेखाटले आहे.

२००५ साली महापूर आला होता. त्या महापुरात १५०० लिहून ठेवलेल्या गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात वाहून गेल्या, त्यात विविध प्रकारची १५०० गाणी लिहिली होती. अशी आठवण त्यांनी मला स्वतः फोनवर सांगितली होती.

अनेक वेळा त्यांच्या सोबत माझा फोन वर संपर्क झाला असून, आम्ही अनेक गाण्यांनर चर्चा केली आहे. गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात वाहून गेल्या. मात्र त्यांची लेखणी थांबली नाही निःस्वार्थी भावनेने ते लिहीत राहिले आणि सर्वांच्याच ओठी जे नाव फुलू लागले ते म्हणजे भीमराय काळनंद !

त्यांनी लिहिलेली गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात बुडून गेल्या. पाण्यामध्ये जरी डायऱ्या बुडून नेल्या. मात्र त्यांची लेखणी थांबली नाही ते लिहत राहिले. आपल्या लेखणीतून प्रबोधन करत राहीले. भीमराव कालेनंद यांचे विशेष म्हणजे अनेक गाणी त्यांची तोंडपाठ होती. दादांनी फोनवर बोलताना माझ्याशी खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, 'मी जी गाणी लिहिली ती गाणी अजरामर ठरली. परंतु त्याचा मोबदला मला कधीच मिळाला नाही आणि मी कधी पैशामागे फिरलो ही नाही. असे साधे, सरळ जीवन काळेनंद दादा आयुष्यभर जगले आणि समाजामध्ये नाव त्यांनी कमावले. आपली कला जोपासत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. (अशोक, सम्राट, साजन, आकाश, वैशाली, कविता) नऊ महिन्यांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे काळेनंदांनी लिहिलेली गाणी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, सुषमा देवी, रंजना शिंदे, दीपरुसवा , चंद्रकांत शिंदे  अशा अनेक नामवंत गायक कलाकारांनी गायली आहेत. टी सिरीज, विनस, प्रीजम, कश्मीर इ. कॅसेट कंपनीने काळेनंद दादांच्या गाण्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली.

'जगात देखणी, भीमाची लेखणी' या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब घराघरात पोहोचवला अशा महाकवी वामनदादा कर्डक तसेच स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा सहवास काळेनंद दादांना काही काळासाठी लाभला.

१९८४ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचे महामंडळ स्थापन करायचे होते. त्यासाठी दिल्लीला देखील ते गेले होते. त्यासाठी भीमराव काळेनंद दादांनी खूप धावपळ केली होती. २००८ साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. २०१७ साली अखिल भारतीय मातंग संघ, मानखुर्द मुंबई यांचेकडून 'समाजभूषण पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये बहुजन राष्ट्र समितीच्या वतीने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव सम्मान पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. २०२२ साली लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती कल्याण यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. तर त्यांच्या कलेचे दखल घेऊन विविध ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले होते

आपल्या समाजातील घटक प्रबोधन, परिवर्तन करतो म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन, कल्याण येथील सूत्रसंचालक शशिकांत चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद गायकवाड यांनी भीमराव काळेनंद आणि प्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांना घरी बोलाऊन त्यांचा सन्मान केला. म्हणजेच बाबासाहेबांची चळवळ आपल्या कलेच्या माध्यमातून पुढे नेणाच्या कलावंतांचा सन्मान होणे ही काळाची गरज आणि आपली सामाजिक बांधिलकी आहे.

कलाकार पेन्शन योजना मिळावी म्हणून गेल्या पाच वर्षापासून त्यांची खटपट सुरू होती. २०२५ मध्ये त्यांना मोबदला मिळाला आणि फक्त दोन आठवडेच. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत कलाकाराला वंचितच रहावे लागले. ज्या कलाकारांनी आपल्या लेखणीतून शेवटपर्यंत प्रबोधन आणि परिवर्तन केले अशा कलाकारांना वेळेतच न्याय आणि त्यांच्या हक्कांचा मोबदला मिळाला पाहिजे, तरच त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असे समजले जाईल.

आमचे वडील आदर्श होते. त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण देऊन, आमच्यावर चांगले संस्कार दिले. आज आमच्या पंखात त्यांनी बल दिले आहे. अनेक गाणी त्यांनी लिहिली आणि समाजाच प्रबोधन केले. त्यांनी लिहिलेल्या गाण्यातून त्यांच्या आठवणी आज जिवंत राहतील. जे त्यांचे साहित्य आहे. ते साहित्य आम्ही सांभाळून ते समाजापर्यंत पोहोचवणार आहोत, असे काळेमंद यांचा मुलगा सम्राट याने माझ्याशी बोलताना सांगितले.

आजपर्यंत विविध विषयावरती त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी या गाण्यांचा फायदा झाला आहे. समाज प्रबोधनासाठी जी गाणी लिहून ठेवली आहेत त्यांचा पुढे देखील होणार आहे. म्हणून त्यांचे सर्वच लिखाण आंबेडकरी चळवळीसाठी अतिशय उपयुक्त असे ठरणार आहे. तर येणाऱ्या काळात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू बुद्ध, भीम, गीत ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या साइटवर तसेच रायटर बीए काळेनंद या यूट्यूब चॅनेलवर भीमराय काळेनंद यांचे लिखाण आपल्याला वाचायला मिळणार आहे.

दिनांक १९ जून २०२५ रोजी काळेनंद दादांची प्रकृती बिघडली त्यानंतर उल्हासनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि दिनांक २२ जून २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वयाच्या ७८ वर्षी त्याची प्राणज्योत मावळली.
ही दुःखद बातमी समजताच पूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिभावंत महाकवी आपल्यातून निघून गेल्याने, त्यांनी लिहिलेल्या अजरामर गाण्यांचे स्टेटस सर्वांच्या मोबाईलवर दिसू लागले आणि त्यांना अभिवादन करू लागले.

पाश्चात देशात लिखाणाला महत्त्व डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू बुद्ध, भीम, गीत ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या वेबसाइटवर भारत देशाच्या बाहेरून सुद्धा काळेनंद दादा यांच्या गाण्याचे लिखाण लंडन, अमेरिका, न्यूझीलंड, दुबई, युके अशा विविध देशातून लिखाण वाचले गेले आहे.

एवढे दर्जेदार लिखाण भीमराव काळेनंद यांनी केले असून बाहेरच्या देशातसुद्धा त्यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत. काळेनंद दादा यांना झाडे लावण्याची खूप आवड होती.

काळेनंद दादा यांचा मुलगा सम्राट याने दोन वर्षापूर्वी रत्नागिरी येथून आंबे आणले होते आणि त्या आंब्याची कोय काळेनंद दादा यांनी घराजवळ लावली होती. ते रोप मोठे होऊन त्या झाडाची देखभाल स्वतः कालेनंद गेल्या दोन वर्षापासून करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर काळेनंद यांच्या परिवाराने मोहने, गालेगाव स्मशान भूमीच्या आवारात त्यांच्या अस्थीवर ते झाड आज लावण्यात आले आहे. त्या झाडाची निगा काळेनंद परिवार करणार आहे. म्हणजे अस्थी विसर्जित न करता काळेनंद यांच्या परिवाराने सामाजिक एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. लेखकाला अंधारात ठेऊ नका, आजकाल गायक हा वेगाने फेमस होतो. गाणे देखील झपाट्याने व्हायरल होतात. त्या गाण्याच्या रिल्स बनतात, परंतु ज्यांच्या लेखणीने गाणे साकार झालेले आहे त्या गाण्याच्या लेखकाला नेहमीच अंधारात ठेवले जाते. असंख्य गाणी युट्युबवर टाकली जातात. परंतु लेखकाच्या नावाचा विसर पडलेला असतो. ज्याने गाणे जन्माला घातले आहे. त्याचे नाव आलेच पाहिजे. ही देखील खबरदारी, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे लेखक हे गाण्याचे मूळ निर्माते असतात आणि त्यांना गाण्याचे कॉपीराइट मिळू शकतात. ज्येष्ठ कवी, गायक भीमराव काळेनंद यांचे साहित्य सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करणारे साहित्य आहे.

आपल्या कलेच्या माध्यमातून समाज परिवर्तन आणि प्रबोधन करणाऱ्या कलावंतांच्या आठवणी जिवंत ठेवणे आजच्या तरुणांनी, कार्यकरांनी खूप महावाचे आणि गरजेचे आहे. त्यातूनच आपल्याला प्रोत्साहन मिळत असते.

त्यांनी विविध विषयावरती केलेले लिखाण, साहित्य प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचवण्याचा काम आपण सर्वजण करूया. तेंव्हाच खऱ्या अर्थाने कवी भीमराव अर्जुन काळेनंद यांना अभिवादन ठरेल !

- मिलींद जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.