आष्टीत थोरल्या पवारांनी शोधला नवा कोरा चेहरा
----------------
राजकीय आखाड्यात उच्चशिक्षित डॉ. महेश थोरवे 'तुतारी' घेऊन मैदानात
----------------
राजेंद्र जैन / कडा
----------
आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय पक्षांना चाहूल लागली असतानाच, बारामतीच्या थोरल्या पवारांकडून उच्चशिक्षित नव्या को-या चेहऱ्याला संधी असल्यामुळे आष्टी मतदार संघाच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सामान्यांच्या मुलभूत प्रश्नांची जाण डोळ्यासमोर ठेवून राजकीय समीकरणे बदलण्याची धमक असणारा नवीन चेहरा म्हणून डॉ. महेश थोरवे तुतारी घेऊन प्रस्थापित नेत्यांसमोर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेची लढत मोठी रंजक होणार असल्याची शक्यता, मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्याचा मागील इतिहास पाहता राजकारणातील घडामोडीत आष्टी, पाटोदा, शिरूर हा बहुचर्चित मतदार संघ नेहमीच विविध राज-कारणांनी राजकीय केंद्रबिंदू ठरलेला आहे. राजकीयदृष्ट्या बहुचर्चित या मतदार संघात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात मागच्या काळात फोडाफोडीच्या राजकारणामुळे पुलाखालून बरेच पाणी गेल्याने राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष व नेते आपापली चुल आता वेगळी मांडण्यासाठी ग्राऊंडवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे तयारी करताना दिसत आहेत. आष्टीच्या राजकीय आखाड्यात प्रस्थापित दिग्गज आजी- माजी आमदारांसह काही नवीन इच्छुक चेहरे देखील नशिब आजमावून पाहण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रस्थापित नेत्यांना नवीन चेह-यांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता जाणकार मंडळी व्यक्त करतात. आष्टी मतदार संघात आगामी विधानसभेची निवडणूक चौरंगी किंवा त्यापेक्षा अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत. आष्टीत सर्वच राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना या निवडणुकीचे वेध लागलेत. सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते व त्यांचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन लोकांशी संवाद साधत जवळीक दाखवत असल्याचे प्रदर्शन करु पाहत आहेत. ही निवडणुक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अन् चुरशीची ठरणार आहे. नवीन चेहरे समोर आले तर आष्टीच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातच राष्ट्रवादी (शरद पवार गटाकडून) नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत असून, आष्टीचे भूमीपूत्र कडा येथील रहिवासी व उच्चशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले डॉ. महेश थोरवे यांना थोरल्या पवारांसह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून विधानसभा निवडणुकी संदर्भात सकारात्मकता दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. थोरवे यांनी तुतारी घेऊन सर्वोतोपरी नियोजन करून या संभाव्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यातील बहुचर्चित आष्टी मतदार संघात प्रस्थापित नेत्यांसह नवनवीन चेहरे समोर येणार आहेत. त्या अनुषंगाने या निवडणुक अटीतटीची होण्याची अधिक शक्यता आहे. राजकीय पटलावर सध्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची धमक असणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. महेश थोरवे या उच्चशिक्षित नवीन चेह-याच्या नावाची राजकीय वर्तुळात सध्यातरी जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
-----%%----
बदल घडावा ही सामान्यांची भावना...
----------------
राजकारण हा माझा पिंड नाही. परंतु सर्वसामान्य नागरिकांची एक बदलाची साद त्या अनुषंगाने आपण परिवर्तनासाठी आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा मिळावी म्हणून पोटतिडकीने आष्टी मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. कारण बदल घडवा हीच इथल्या सामान्य जनतेची भावना आहे.
-डॉ. महेश थोरवे, आष्टी
------%%--------
stay connected