*संत एकनाथ महाराज पालखीचे पाटोदा शहरात स्वागत; मुस्लिम समाजातील उद्योजक सय्यद इम्रान यांच्या कडून वारकऱ्यांना दूध वाटप करत दिला सामाजिक एकतेचा संदेश*
भक्ती, परंपरा आणि अध्यात्मिकतेचा संगम असलेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पाटोदा शहरात भव्य स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणांहून आलेल्या वारकऱ्यांच्या जयजयकारात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पालखी शहरात पोहोचली.या सोहळ्याला धर्मीय सलोख्याचा सुंदर नमुना पाहायला मिळाला. पाटोदा येथील मुस्लिम समाजातील युवा उद्योजक सय्यद इम्रान यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी दूध वाटप उपक्रम राबवून एकतेचा अत्यंत सकारात्मक संदेश दिला. सय्यद इम्रान म्हणाले, "संत एकनाथ महाराज हे माणुसकी, समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे संत होते. त्यांच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्य आहे. समाज एकत्र राहिला तरच खरी प्रगती शक्य आहे."या उपक्रमाचे वारकऱ्यांसह शहरातील नागरिकांनी मन:पूर्वक स्वागत केले. विविध धर्मांतील लोक एकत्र येऊन सण-उत्सवात सहभागी होत असल्याने समाजात भिंती नाही, तर एकता होत असल्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला.संत एकनाथ महाराजांचे कार्य आणि विचार हे सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक होते, आणि आजही त्यांच्या शिकवणुकीनुसारच पाटोदा शहरात सर्व समाज एकत्र येऊन त्यांचे स्मरण करत आहेत. सय्यद इम्रान यांचा हा उपक्रम केवळ सेवा नसून, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा जिवंत संदेश आहे.
stay connected