गुरुवर्य संत मदन महाराजांची पायी दिंडी पंढरीकडे
-------------------
पाऊस पडू दे... शिवार फुल दे... अन्नदाता सुखी होऊ दे...- बबन महाराज
---------------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा! विठ्ठल कृपेचा कोहळा
विठ्ठल प्रेमाचा पुतळा! लाविलेले चाळा विश्व विठ्ठले...
टाळ- मृदुंग वाजती, विणा झंकारती, वरून राजाचा अभिषेक होऊनी, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती ' अशी अनुभूती कड्याच्या संतनगरीत आली. शेकडो वारकऱ्यांच्या अभूतपूर्व उत्साहात हरिनामाचा जयघोष करीत विठुरायाच्या भेटीला निघालेल्या संतश्रेष्ठ गुरुवर्य वै. हभप मदन महाराज बिहाणी च्या पायी दिंडीचा सोहळा मठाधिपती बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भगव्या पताका घेऊन गुरुवारी सकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला. बा विठोबा पाऊस पडू दे... शिवार फुलू दे... अन्नदाता बळीराजा सुखी होऊ दे..! असे विठुरायाला साकडे घालणार असल्याचे बबन महाराज सांगितले.
कडा येथील संत नगरीतील श्रद्धास्थान परमपूज्य संत श्री मदन महाराजांच्या कृपाशीर्वादाने या संस्थानचे मठाधिपती हभप बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे संत नगरीतून कडा ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दि.26 जुन रोजी सकाळी शेकडो वैष्णवांचा मेळा हरिनामाचा जयघोष करीत टाळ - मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीला खांद्यावर भगव्या पताका घेऊन भक्तिमय वातावरणात निघाला. प.पू.वै. गुरुवर्य संतश्री मदन महाराज यांच्या दिंडीच्या स्वागतासाठी कड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर सुवासिनींनी रांगोळी घालून पंचारती ओवाळून चौकाचौकात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रतिनिधीशी बोलताना बबन महाराज म्हणाले बा... विठूबा पाऊस पडू दे... रान शिवार फुलू दे ... अन्नदाता बळीराजा सुखी होऊ दे..! असे साकडे विठुरायाला घालणार असल्याचे सांगितले. या पायी दिंडी सोहळ्यात आष्टी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्षेत्रातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------%%--------
stay connected