कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषीवर आधारित उद्योग उभारावेत - आ. पंकजाताई मुंडे
प्रत्येक मतदारसंघात कृषी प्रदर्शन भरवुन त्यास पाच लाख रुपये अनुदान द्यावे - मा. आ.भिमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी -( निसार शेख,दिगंबर बोडखे)
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषीवर आधारित उद्योग उभारावेत. जे पेरले तेच उगवते. गहू, ज्वारी, बाजरी पेरली तर गहू, ज्वारी, बाजरीच ऊगवणार आहे त्याप्रमाणे चांगले विचार पेरले तर चांगले विचार उगवतील. विषारी विचार दिले तर विषारी विचारच निर्माण होतील . मा. आ.भीमराव धोंडे यांनी शांत संयमी व सुंदर आणि अभ्यासपूर्ण असे भाषण केले, तसेच आ. पंकजाताई मुंडे यांनी भीमराव धोंडे यांच्या भाषणाचे कौतुक केले. कृषी प्रदर्शन भरवल्यामुळे त्यांचे आ. पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले. शेतीच्या विकासासाठी शासनाने प्रत्येक मतदारसंघात कृषी प्रदर्शन भरवुन त्यास पाच लाख रुपये अनुदान द्यावे तरच शेतकऱ्यांना शेती विषयी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्यांच्या विकासाचे मला वेड लागले आहे असे आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी यांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आ. पंकजाताई मुंडे बोलत होत्या या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे हे होते
पुढे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व आ. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की ,राजकारणात काम करताना असे काम करा की कोणत्याही योजनेमुळे त्या माणसाची ओळख निर्माण झाली पाहिजे. बदलापूर घटने संदर्भात सांगितले की अशा अत्याचारी नीच माणसांना भर चौकात फाशी दिली पाहिजे.राजकारणात आता माणुसकी राहिलेली नाही. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हजारो रुपये दिले तरी देखील शेतकरी मतासाठी आर्थिक अपेक्षा करतात ही चिंताजनक बाब आहे. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून केलेले रस्ते कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवले त्याची देखील व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. सर्वांगीण विकासासाठी आदर्श गावकरी व आदर्श सरपंच असावा
शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत बोलताना त्यांनी सांगितले की कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आली आहे ती आपण राबवली आहे. घरातील लक्ष्मीसाठी या योजनेचा चांगला फायदा होईल. दिड हजार रुपयांमुळे महिलेला इज्जत व सन्मान मिळणार आहे. बहिण मुलांसाठी व कुटुंबासाठीच हि रक्कम जपून ठेवून खर्च करणार आहे.
माजी आमदार भीमराव धोंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे सहकारी मित्र होते. आमचे पहिल्यापासून पारिवारिक संबंध आहेत. भिमराव धोंडे हे अत्यंत शांत, संयमी नेतृत्व असून कोणालाही त्रास देण्याचे काम त्यांनी केले नाही. माझ्याकडे शिस्त आहे मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमराव धोंडे हे होते, परंतु त्यांनी आमदार पंकजाताई मुंडे यांच्या अगोदर भाषण केले या भाषणाचा धागा पकडून आ . पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की,मा. आ. भीमराव धोंडे हे खरोखरच शेतकरी आहेत ते आमदार असताना त्यांनी विधानसभेत सर्व आमदारांना ड्रॅगन फ्रुट खाण्यासाठी आणले होते. शेती करताना शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून मातीचा पोत व मूलद्रव्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. राजकारण म्हणजे येड्या गबाळ्याचे काम राहिले नाही. मुंडे साहेब हे लोकनेते होण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडली होती. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की ज्या लोकांनी मला मत दिले नाही ते नंतर मला फोन करून माझ्यासाठी रडले आहेत . त्यांना असे वाटले की मी मत दिले नाही तरी पंकजाताई निवडून येतील परंतु झाले मात्र उलटेच. माणूस ज्याप्रमाणे शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करतो त्याप्रमाणे मातीचे आरोग्य सुद्धा तपासून घेतले पाहिजे म्हणजे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल
ज्या सर्वसामान्य लोकांना दुष्काळात प्यायला पाणी मिळाले नाही. घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागली अशा सर्वसामान्यांच्या समस्या ज्यांना कळत नाहीत त्यांनी राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना कसलीच जात नसते, शेतकरी हे सर्व समाजाचे व जाती धर्माचे असतात. मी मंत्री असताना पाणी आडवा पाणी जिरवा ही जलयुक्त शिवार योजना अमंलात आणली होती तसेच शिरूर तालुक्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कन्या माझी योजना आणली होती.मी लहानपणापासूनच खेड्यात वाढली आहे माझे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले त्यामुळे माझ्यावर माणुसकीचे चांगले संस्कार आहेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे व अभय राजे धोंडे यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, राज्यात अनेक कृषी प्रदर्शने होतात आपण मात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत कष्ट केलेले व तामिळनाडू राज्यात जन्मलेले डॉ. स्वामीनाथन यांचे नाव दिले आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी भूदान चळवळीत आपली शेकडो एकर जमीन दान केली होती. पूर्वी शेतीचे उत्पन्न कमी होते आता मात्र उत्पादन वाढत चालले आहे. दिवसेंदिवस देशाची व जगाची लोकसंख्या वाढत आहे भविष्यात अन्नधान्य व इतर अत्यावश्यक गोष्टीची टंचाई निर्माण होऊ शकते यावर उपाय करण्यासाठी केंद्र शासनाने आत्तापासूनच देश पातळीवर तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. देशाचे संरक्षण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मुले म्हणजेच शेतकरीच करत आहेत . शेतकऱ्याशिवाय देशाची कोणतीच गोष्ट घडत नाही. शेतकऱ्यामुळेच देश चांगला घडत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाने हमीभाव वाढवला पाहिजे. सध्या राज्यसह देशात अनेक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी शासनाने वेगळी यंत्रणा उभी केली पाहिजे. राज्य शासनाने घोषित केलेले मुलींना मोफत शिक्षण ही आनंदाची गोष्ट आहे. शासनाच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी काही जाचक अटी आहेत. त्या शिथिल केल्या पाहिजेत, उदाहरणार्थ पीक विमा व अनुदानासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. शेतकरी संघटना ते शेतकरी शिक्षण संस्था असा माझा प्रवास झाला आहे. शेतकऱ्यांसाठी मी दिल्ली, बीड ,मुंबई तसेच मतदारसंघात पायी मोर्चे काढले. पद्मश्री पोपटराव पवार हे माझे लहान भाऊ आहेत आज त्यांनी आपले व गावाचे देशात नावलौकिक केले आहे.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले की मी क्रिकेटचा प्लेयर होतो मला खेळाडू मधून सरकारी नोकरी लागत होती त्यावेळी आमदार भीमराव धोंडे यांनी मला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे शिफारस पत्र दिले होते परंतु काही दिवसातच मी सरपंच झालो त्यामुळे नोकरीचा नाद सोडला पाण्यासाठी चांगले काम केले तर भविष्य उज्वल आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. डॉ .स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा संघर्ष केला, जिवाचे रान केले तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भविष्यात जलसंधारणाचे धोरण बदलावे लागेल असे पवार यांनी सांगितले.जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी मातीचे कण आणि पाण्याचा थेंब याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
२०५० सालापर्यंत देशातील व जगातील ५० टक्के लोकांना पौष्टिक व चांगले अन्न मिळते की नाही असा प्रश्न उपस्थित केला. दिवसेंदिवस वातावरणातील तापमानात बदल होत आहे त्यामुळे शेतीवर व पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. खऱ्या अर्थाने माती व पाण्याचे महत्व इस्त्रायल देशाला समजले आहे. शेताला जादा पाणी दिल्यामुळे मातीतील मूलद्रव्यव घटक वाहुन जातात
भविष्यात पिकाला बाटलीने पाणी देण्याची वेळ येते काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामराव खेडकर व सुधीर घुमरे यांनी सांगितले की मा आ भीमराव धोंडे यांनी स्व. गोपिनाथराव मुंडे यांना वेळोवेळी मोलाची साथ दिली. राजकारणात मनापासुन त्यांना सहकार्य करण्याचे काम केले. भिमराव धोंडे यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीविषयी चांगले ज्ञान मिळण्यासाठी फायदा होत आहे. जि. प. चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार यांनी सागितले की, कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी मदत होईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व प्रा. अनंत हंबर्डे यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीपर्यंत पायी मोर्चा काढला ते खरोखर शेतकऱ्यांचे प्राण आहेत. आष्टी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष साहेबराव मस्के यांनी सांगितले की माजी आमदार भीमराव धोंडे हा मोर्चा काढणारा माणूस आहे. शेतकऱ्यासांठी धोंडे यांनी बीड, मुंबई, दिल्ली पर्यंत मोर्चे काढले. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मतदार संघाची शैक्षणिक प्रगती केली. आष्टी तालुक्याला या संस्थेच्या माध्यमातून विद्यापीठ द्यावे अशी मागणी म्हस्के यांनी केली. यावेळी परभणी कृषी विद्यापीठाचे डॉ. भगवान आसेकर, बबनराव झांबरे व इतरांची भाषणे झाली. यावेळी शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त बाबासाहेब पिसोरे,सौ . दमयंतीताई धोंडे, सौ.अक्षदा अजय धोंडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे,माजी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, चेअरमन राजेश धोंडे, ,गो. गो. मिसाळ, किशोर खोले,माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख, माजी सभापती अनिल जायभाय, बाळासाहेब वाघुले, पं. स. सदस्य रावसाहेब लोखंडे, उपसभापती नामदेव धोंडे,माजी सभापती नियामत बेग, पांडुरंग गावडे, दिनकर तांदळे महाराज, दिलीपराव काळे, संजय कांकरिया, माजी सरपंच सुदाम झिंजुर्के, जयंत राख, मधुकर गर्जे, अंकुश मुंढे, कुंडलिक आस्वर, बाळासाहेब भुकन, सोपानराव गाडे, बाबासाहेब ससाणे, नवनाथ गाडे, भाऊसाहेब देसाई, बाबासाहेब जाधव, बाबुराव कदम, रघुनाथ शिंदे, आप्पासाहेब राख, ॲड. खेडकर, बाबासाहेब जाधव, गटविकास अधिकारी सचिन सानप,कृषी अधिकारी प्रमोद कुदळे, नाथाभाऊ शिंदे, कृषी अधिकारी गोरख तरटे, माऊली पानसंबळ, सरपंच माऊली वाघ, संतोष चव्हाण, संभाजी झांबरे, कल्याण पोकळे, रत्नदिप निकाळजे, अज्जुभाई व इतर मान्यवर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य श्रीराम आरसुळ यांनी गतवर्षीच्या कृषी प्रदर्शनाच्या बाबत माहिती दिली तसेच यावर्षी जवळपास ११५ स्टाॅल सहभागी झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*** क्षणचित्रे ****
* सांगली येथील ४१ लाख रुपये किंमतीच्या खिलार सोन्या जातीच्या बैलाच्य सभोवताली उभे राहून राशीन व चिखली येथील ५१ कलाकारांनी एकाच वेळी हालगी वाजवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
* कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, महाराष्ट्राच्या रणरागिणी लोकनेत्या आ पंकजाताई मुंडे, मुख्य आयोजक मा. आ. भिमराव धोंडे, पोपटराव पवार, समारोपाचे पाहुणे राज्य वारकरी संप्रदायाचे हभप प्रकाश महाराज बोधले, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे लक्ष वेधून घेणारे बॅनर लावण्यात आले होते.
* कृषी प्रदर्शनाच्या स्थळी प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक पुतळा ठेवण्यात आला होता. मान्यवरांसह प्रत्येक शेतकरी व इतर शिवाजी महाराजांना अभिवादन करुन पुढे जात होता.
stay connected