शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून नंबर एकचा माल निर्माण करून मार्केटिंग करायला शिकल्यास निश्चित आर्थिक फायदा होईल - ना. अजित पवार
आष्टी प्रतिनिधी
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन शिकायला मिळते तसेच विचाराची देवाण घेवाण होते, आजचा ग्राहक हा चोखंदळ आहे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून नंबर एकचा माल निर्माण करून मार्केटिंग करायला शिकल्यास निश्चित आर्थिक फायदा होईल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आष्टी येथे केले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून कृषी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषी मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली.
यावेळी व्यासपीठावर आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार बाळासाहेब आजबे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ .शिवाजी राऊत, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे स्वागत अध्यक्ष डॉ. अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, लालाभाऊ कुमकर, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे इतरांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांचे माजी आमदार भीमराव धोंडे व अजय दादा धोंडे यांनी स्वागत केले.
पुढे बोलताना ना. अजित पवार यांनी सांगितले की,फळबागा, फुलांची शेती व इतर शेती उत्पादनासाठी केंद्र सरकार करोडो रुपये खर्च करते. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पादन मिळुन चांगले भाव देखील चांगला मिळतो. शेती उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनीची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. शेतीसाठी गोमूत्र वापरल्यास उत्पादन वाढीसाठी फायदा होतो तसेच पौष्टिक अन्न मिळते. माजी आमदार भीमराव धोंडे व डॉ. अजय दादा धोंडे यांनी आष्टी सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट व चांगले कृषी प्रदर्शन भरवले त्याबद्दल अजित दादा पवार यांनी मनापासून कौतुक केले. कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडते. नवनवीन माहिती मिळते. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलले पाहिजे. आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल तरच शेती उपयुक्त व फायदेशीर आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळते तसेच वेगवेगळे अवजारे,वस्तू, पदार्थ पाहायला मिळतात. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव असे कार्य केलेले आहे. ते एक दैवी शक्ती होते असेही अजित पवार यांनी सांगितले. याप्रसंगी कृषी मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, परळीत गेल्या आठवड्यात कृषी प्रदर्शन झाले आहे आणि आष्टी येथे लगेच होत आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने एकाच महिन्यात दोन ठिकाणी प्रदर्शन होत आहे ही चांगली बाब आहे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख यांनी केली. कार्यक्रमास शेतकरी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected