आ. सुरेश धस यांची अपघातग्रस्त जोशी कुटुंबीयांसाठी रुग्णालयात धाव; उपचारांना गती देण्याच्या सूचना विद्याताई जोशी यांच्या निधनाने आष्टी शहरावर शोककळा; राजेंद्र जोशी व त्यांच्या आईंच्या प्रकृतीची धस यांनी केली आस्थेने विचारपूस

 आ. सुरेश धस यांची अपघातग्रस्त जोशी कुटुंबीयांसाठी रुग्णालयात धाव; उपचारांना गती देण्याच्या सूचना
विद्याताई जोशी यांच्या निधनाने आष्टी शहरावर शोककळा; राजेंद्र जोशी व त्यांच्या आईंच्या प्रकृतीची धस यांनी केली आस्थेने विचारपूस





आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील कापड व्यावसायिक तथा आ.सुरेश धस यांचे स्नेही श्री.राजेंद्र जोशी, त्यांच्या पत्नी विद्याताई जोशी आणि आई कलाबाई जोशी हे शुक्रवारी रात्री गंगापूर येथून आष्टीकडे परतत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात विद्याताई जोशी यांचे निधन झाले. या दुर्घटनेने जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या निधनाने आष्टीवर शोककळा पसरली.




या अपघाताची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी समयसूचकता दाखवत मुंबईहून आष्टी येथे दाखल होताच तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील धूत हॉस्पिटल गाठले.अपघातग्रस्त राजेंद्र जोशी आणि त्यांच्या आईंची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या कठीण प्रसंगी जोशी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत धस यांनी आपुलकीचा आधार दिला.यावेळी उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. गायकवाड, डॉ. गवळी आणि डॉ. हंबर्डे यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा करून उपचारांची माहिती जाणून घेतली. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेंद्र जोशी यांच्या आईंवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून राजेंद्र जोशी यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.रुग्णांची प्रकृती लक्षात घेता उपचारांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, उपचारांची गती वाढवावी तसेच आवश्यक ती सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आ.सुरेश धस यांनी संबंधित डॉक्टर आणि यंत्रणेला केल्या.रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत,यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले.

दरम्यान,अपघातात दुर्दैवाने निधन झालेल्या विद्याताई जोशी यांच्यावर आष्टी शहरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव, मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित होते. अश्रुपूर्ण वातावरणात विद्याताई यांना अखेरचा निरोप देण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर