देवळालीच्या सोनी पठारावर वन्यप्राण्याचा थरारक हल्ला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू! गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या देविदास टकले यांच्यावर हल्ला; १०० ते १५० फूट फरफटत नेल्याची माहिती, परिसरात भीतीचे वातावरण

 

देवळालीच्या सोनी पठारावर वन्यप्राण्याचा थरारक हल्ला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू!

गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या देविदास टकले यांच्यावर हल्ला; १०० ते १५० फूट फरफटत नेल्याची माहिती, परिसरात भीतीचे वातावरण



आष्टी | प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडी) शिवारातील सोनी पठार परिसरात शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याला सुमारे १०० ते १५० फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे.

देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली परिसर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आष्टी तालुक्यातील देवळाली-लोखंडवाडी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी गवत आणण्याच्या उद्देशाने देविदास टकले हे शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास सोनी पठार परिसरात गेले होते. याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. वनविभागाकडून या घटनेचा पंचनामा व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

बिबट्या की वाघ? वनविभागाच्या तपासाकडे लक्ष!

या हल्ल्यामागे बिबट्या आहे की वाघ, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हल्लेखोर वन्यप्राण्याची नेमकी ओळख वनविभागाच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेने देवळाली, लोखंडवाडी आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आधीच दुष्काळामुळे चारा आणि पाण्यासाठी शेतकऱ्यांना शिवारात भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जीव गेल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरात वन्यप्राण्याचा वावर असल्यास त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढवावी तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर