दिवाळीच्या खरेदीचे स्वप्न ठरले अखेरचे! भरधाव कारच्या धडकेत दोन शेतकरी भाऊ अन् २० वर्षीय नातीचा मृत्यू कापूस विक्रीसाठी रिक्षातून रवाना; नातीला नवीन कपडे अन् फटाके घेण्यासाठी दुचाकीवरून निघालेले आजोबा काळाच्या पडद्याआड

 दिवाळीच्या खरेदीचे स्वप्न ठरले अखेरचे! भरधाव कारच्या धडकेत दोन शेतकरी भाऊ अन् २० वर्षीय नातीचा मृत्यू
कापूस विक्रीसाठी रिक्षातून रवाना; नातीला नवीन कपडे अन् फटाके घेण्यासाठी दुचाकीवरून निघालेले आजोबा काळाच्या पडद्याआड



** आष्टी ( प्रतिनिधी) | प्रतिनिधी**


दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी शेतात कष्ट करून पिकवलेला कापूस विकायचा, नातवंडांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा आणि घरात सणाचा उत्साह आणायचा... एका शेतकरी कुटुंबाने पाहिलेली ही छोटीशी स्वप्ने एका भीषण अपघाताने क्षणात उद्ध्वस्त केली. अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावरील बांभूळगाव (मिरजगावजवळ) शिवारात शनिवारी रात्री सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन शेतकरी सख्ख्या भावांसह त्यांच्या २० वर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावावर शोककळा पसरली आहे.


**कापूस विक्रीसाठी रिक्षात, नातीच्या आनंदासाठी आजोबा दुचाकीवर!**


केळसांगवी येथील शेतकरी सुदाम मारुती पडोळे आणि देवीदास मारुती पडोळे यांनी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने शेतात पिकवलेला थोडाफार कापूस दिवाळीच्या खर्चासाठी विकण्याचे ठरवले होते. त्यानुसार कापसाच्या गाठी एका मालवाहू रिक्षामध्ये भरून त्या विक्रीसाठी मिरजगावच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.


दरम्यान, सुदाम पडोळे हे आपली २० वर्षीय नात श्रेया हिला दिवाळीनिमित्त नवीन कपडे आणि फटाके घेऊन देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे चुलत भाऊ देवीदास पडोळे हेही दुचाकीवर होते. दिवाळीच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या या तिघांच्या प्रवासाचा शेवट इतका भयंकर होईल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.



**भरधाव कारची पाठीमागून धडक; तिघांचाही दुर्दैवी अंत**


अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर बांभूळगाव शिवारात शनिवारी रात्री सातच्या सुमारास भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की या अपघातात सुदाम पडोळे, देवीदास पडोळे आणि श्रेया या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.


दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने पडोळे कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला. शेतातील कष्टाचे पैसे हातात येण्यापूर्वीच कुटुंबातील तीन सदस्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने केळसांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



दिवाळीच्या दिव्यांनी घर उजळण्याऐवजी या कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा अंधार पसरला आहे. नातीला नवीन कपडे आणि फटाके घेऊन देण्याचे आजोबांचे स्वप्न अपूर्णच राहिले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर