सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ स्पर्धा उत्साहात संपन्न

 सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ स्पर्धा उत्साहात संपन्न












शिरूर : सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या आळेफाटा लोकल ब्रँच व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील ३९ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना, संशोधनवृत्ती आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचे प्रभावी सादरीकरण केले.


कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोतवाल, एसटीसीओपियन ॲल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी गलांडे, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा आणि बी. फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ. सचिन कोठवदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे यांनी संस्थेच्या स्थापनेचा प्रवास विशद करून फार्मसी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोतवाल यांनी संस्थेची स्थापना, तिचे कार्य तसेच विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत मिळणाऱ्या संधी व फायद्यांविषयी मार्गदर्शन केले. बाबाजी गलांडे यांनी फार्मा आयडियाथॉनसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्याचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. अमोल शहा व सचिन कोठावदे यांनी विद्यार्थ्यांना पेटंट प्रक्रिया, संशोधनाचे महत्त्व आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याबाबत मार्गदर्शन केले.


स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नियंत्रित औषधमुक्तता प्रणाली, जैवतंत्रज्ञान तसेच नावीन्यपूर्ण औषध वितरण प्रणालींवर आधारित विविध मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून त्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड दिसून आली.


स्पर्धेचे परीक्षण डी. फार्मसी विभागासाठी डॉ. योगेश बाफना आणि श्री. मोहन शितोळे यांनी केले. तसेच बी. फार्मसी व एम. फार्मसी विभागासाठी प्रा. विशाल कारखिले आणि प्रा. कुणाल राऊत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


स्पर्धेचा निकाल


बी. फार्मसी व एम. फार्मसी विभाग


प्रथम क्रमांक समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे येथील अश्विनी भोर आणि प्रतिभा गावडे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे येथील नयन वाघचौरे आणि तन्वी वाळुंज यांनी मिळवला. तृतीय क्रमांक मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, थेरगाव, पुणे येथील श्रीपाद कुलकर्णी आणि साक्षी पाटील यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथील सारिका गारकर आणि समती कड यांनी मिळवले.


डी. फार्मसी विभाग


प्रथम क्रमांक केबीएचएस ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील पीयूष निकम आणि पंकज कापसे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, डी. फार्मसी विभागातील श्रेया दरेकर आणि संध्या लांडगे यांनी मिळवला. तृतीय क्रमांक विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे येथील आर्या चंगेडिया आणि भळगट रिया या विद्यार्थिनीने पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी, वाखारी येथील गायत्री गायकवाड आणि प्रतिभा डोंबे यांनी मिळवले.


प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २,०५१ रुपये, १,५५१ रुपये, १,०५१ रुपये आणि ५५१ रुपये रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता केसकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेनंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, आयोजन समिती, स्वयंसेवक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि परीक्षकांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचे कौतुक केले.


विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देणारा ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ हा उपक्रम फार्मसी क्षेत्रातील भावी संशोधक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर