*लसीकरण: खर्च नाही, तर सुरक्षिततेची गुंतवणूक* डॉ.जयदीप कवडे (MVSc. NET, चिकित्सालयीन औषधवैद्यक शास्त्र ,नितीशास्त्र व न्यायवैद्यकशास्त्र)

 *लसीकरण: खर्च नाही, तर सुरक्षिततेची गुंतवणूक* 
डॉ.जयदीप कवडे (MVSc. NET, चिकित्सालयीन औषधवैद्यक शास्त्र ,नितीशास्त्र व न्यायवैद्यकशास्त्र)


शेतकरी म्हणून आपण दररोज अनेक निर्णय घेत असतो—चारा कोणता घ्यायचा, औषध द्यायचं की नाही, पशुवैद्यकाला कधी बोलवायचं. मात्र या सगळ्या निर्णयांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आजही अनेकदा “नंतर बघू” म्हणून टाळली जाते, ती म्हणजे लसीकरण. पशुवैद्यक म्हणून काम करताना मला वारंवार एक वाक्य ऐकायला मिळतं—“डॉक्टर, लस दिली असती तर आज हे नुकसान झालं नसतं.”

पशुधनातील आजार हे फक्त ताप, खोकला किंवा जखम इतक्यापुरते मर्यादित नसतात. एकदा आजार आला की त्याचे परिणाम हळूहळू पण खोलवर दिसू लागतात. जनावराचं दूध उत्पादन कमी होतं, ते अशक्त होतं, गाभण राहण्यास उशीर होतो, औषधांवर खर्च वाढतो आणि कधी कधी जनावर दगावण्याचीही वेळ येते. यामधला सर्वात मोठा तोटा म्हणजे भविष्यातील उत्पादन कायमचं घटणं. हा तोटा लगेच जाणवत नाही, पण कालांतराने तो शेतकऱ्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम करतो.

लसीकरण म्हणजे आजारावर उपचार करणं नाही, तर आजार येऊच न देण्यासाठी आधीच संरक्षण तयार करणं होय. औषधोपचार हे आजार झाल्यानंतर करावे लागतात, पण लसीकरणामुळे जनावराच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. योग्य वेळी एकदाच लसीकरण केल्यास खुरपका-मुखपका (FMD), घटसर्प (HS), काळा पाय (BQ), लंपी स्किन डिसीज (LSD), ब्रुसेलोसिस, एंटरोटॉक्सिमिया (शेळी-मेंढी) यांसारखे गंभीर आणि नुकसानकारक आजार सहज टाळता येतात. लसीचा खर्च आणि आजार झाल्यानंतरचा उपचार खर्च यांची तुलना केली तर दोघांत प्रचंड फरक आहे. थोडा शांतपणे हिशोब केला तर लक्षात येतं की लसीकरणावरचा खर्च म्हणजे प्रत्यक्षात मोठी बचतच आहे.

अनेक शेतकरी असं सांगतात की “आमच्या जनावरांना कधीच आजार झाला नाही” किंवा “आमच्या गावात कधी रोग आला नाही”. पण हाच सगळ्यात धोकादायक विचार ठरतो. आजच्या काळात जनावरांची ये-जा, बाजार, चारा आणि पाण्यामुळे रोग एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचायला वेळ लागत नाही. एक जनावर आजारी पडलं की तो रोग इतर जनावरांमध्ये पसरतो आणि संपूर्ण कळप धोक्यात येतो. नुकसान फक्त एका जनावरापुरतं मर्यादित राहत नाही. लसीकरणामुळे संपूर्ण कळपाला संरक्षण मिळतं, ज्याला herd immunity असं म्हणतात.

लसीकरण आणि दूध उत्पादन यांचा थेट संबंध आहे. निरोगी जनावर जास्त दूध देते, कमी औषधांवर चालते आणि दीर्घकाळ उत्पादनक्षम राहते. त्यामुळेच आज अनेक दूध संकलन केंद्रे आणि डेअरी संघटना लसीकरण केलेल्या जनावरांकडून आलेल्या दुधाला प्राधान्य देताना दिसतात. आजच्या काळात दूधाचं प्रमाण जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितताही महत्त्वाची ठरली आहे.

लसीकरण हे “वेळ मिळेल तेव्हा” करण्याचं काम नसून ते ठराविक योजनेनुसार करणं आवश्यक असतं. योग्य वयात, योग्य लसीने आणि ठराविक वेळापत्रकानुसार लसीकरण झालं पाहिजे. प्रत्येक भागातील रोगप्रसार वेगळा असतो, त्यामुळे स्थानिक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरणाचा कार्यक्रम ठरवणं हेच शहाणपणाचं ठरतं. अतिरिक्त माहिती, योग्य लसीकरण वेळापत्रक आणि आपल्या जनावरांसाठी आवश्यक लसींबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट द्यावी. तेथे जनावरांचे लसीकरण अत्यंत अल्प दरात किंवा किमान खर्चात केले जाते. वेळेवर आणि योग्य पद्धतीने लसीकरण करून पशुधन सुरक्षित ठेवणे हेच शहाणपणाचे पाऊल आहे.

लसीकरण केल्यानंतर लगेच हातात पैसे येत नाहीत, म्हणून अनेकांना ते खर्च वाटतं. मात्र आजार झाल्यानंतर जाणारा पैसा, वाया जाणारा वेळ आणि येणारा मानसिक ताण हे सगळं लसीकरणामुळे टाळता येऊ शकतं. म्हणून स्पष्ट सांगायचं झालं तर लसीकरण हा खर्च नाही, तर तुमच्या पशुधनाच्या आरोग्यात, उत्पादनात आणि भविष्यातील उत्पन्नात केलेली गुंतवणूक आहे. 

“निरोगी जनावर म्हणजे सुरक्षित शेतकरी आणि सुरक्षित शेतकरी म्हणजे टिकाऊ शेती.”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर