स्त्री शक्तीचा आदर केवळ नवरात्री पुरताच का? नवरात्रीचा मूळ गाभा आणि साधेपणा हरवत चालला

 स्त्री शक्तीचा आदर केवळ नवरात्री पुरताच का?
नवरात्रीचा मूळ गाभा आणि साधेपणा हरवत चालला



       नवरात्री आणि आपली आजची मानसिकता या विषयाकडे पाहताना असे लक्षात येते की, काळानुसार मानवी स्वभाव, जीवनशैली आणि श्रध्दा ठेवण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आजच्या आधुनिक जगात नवरात्रीच्या नऊ दिवसांकडे आणि मानसिकतेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन समोर येतात. नवरात्री आणि आजची मानसिकता या दोन्ही गोष्टींचा परस्परसंबंध अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा आहे. नवरात्र हा केवळ नऊ दिवस उपवास करण्याचा, गरबा खेळण्याचा किंवा धार्मिक विधींचा सण राहिलेला नाही, तर तो आजच्या मानवी मानसिकतेचे आणि बदलत्या सामाजिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब बनला आहे.

       पूर्वी नवरात्र हा प्रामुख्याने कडक उपवास, व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा आणि अध्यात्माचा काळ मानला जायचा. आजच्या मानसिकतेत श्रध्दा कायम आहे, पण तिचे स्वरूप अधिक उत्सवप्रिय आणि सामाजिक झाले असून भक्तीपेक्षा दिखाव्याला अधिक महत्त्व आले आहे. गरबा, दांडिया, नऊ रंगाचे कपडे घालणे आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करणे याभोवती तरुणाई अधिक फिरताना दिसते. भक्तीची जागा ब-याच अंशी मनोरंजनाचे आणि ताणतणाव विसरण्याच्या साधनाने घेतली आहे. गरबा आणि दांडिया हे आता मोठे व्यावसायिक इव्हेंट्स झाले आहेत. महागडे पासेस, डिझायनर कपडे यावर होणारा खर्च आजच्या दिसण्याच्या मानसिकतेेवर प्रकाश टाकतो. आजच्या मानसिकतेची एक नकारात्मक बाजू म्हणजे या सणाचे झालेले प्रचंड व्यापारीकरण. नऊ दिवसांचे पासेस, महागडे कपडे, इव्हेंट्स आणि स्पॉन्सर्स यांच्या गर्दीत सणाचा मूळ गाभा आणि साधेपणा काहीसा हरवत चालला आहे. गरब्यासाठी महागडे पासेस, डिझायनर कपडे यामुळे या सणाचे स्वरूप थोडे व्यावसायिक झाले आहे. यामुळे कधीकधी मूळ आध्यात्मिक भाव मागे पडतो की काय, अशी शंका येते. अनेकांसाठी हा सण आध्यात्मिक अनुभूतीपेक्षा 'स्टेटस सिम्बॉल' किंवा दिखाव्याचे माध्यम बनत चालला आहे.

       आजचे जीवन अत्यंत धावपळीचे आणि तणावाचे झाले आहे. अशा वेळी नवरात्रीचे नऊ दिवस अनेक लोकांसाठी मानसिक शांतता आणि डिटॉक्स करण्याचा काळ बनला आहेत. पूर्वी उपवास हा केवळ धार्मिक भाग होता, आज लोक याकडे आरोग्य आणि शरीराला विश्रांती देण्याच्या मानसिकतेतूनही पाहतात. दैनंदिन तणावातून काही काळ बाजूला होऊन मन सकारात्मक ऊर्जेने भरण्यासाठी लोक या दिवसांत देवीची उपासना करतात. नऊ दिवस केली जाणारी प्रार्थना किंवा ध्यान लोकांना मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारे साधन वाटते. आजच्या 'डिजिटल' युगात माणूस स्क्रीनला खिळलेला असतो. नवरात्रीचे नऊ दिवस लोकांना घराबाहेर पडून, मित्रांना भेटण्याची आणि गरब्याच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी देतात. त्यामुळे गरबा आणि दांडिया हे केवळ नृत्य राहिले नसून, ते आजच्या पिढीसाठी ताणतणाव विसरून मुक्तपणे जगण्याचे आणि आनंद साजरा करण्याचे माध्यम बनले आहे. तसेच हा सण आता केवळ घरात पूजेपुरता मर्यादित न राहता, एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा एक मोठा सामाजिक सोहळा बनला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर विजय मिळवणे हा या सणाचा खरा उद्देश आहे.

       नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या, स्त्री शक्तीच्या जागरणाचा उत्सव. आजचा सुशिक्षित समाज या नऊ दिवसांत स्त्री सबलीकरण, स्त्री शिक्षण आणि त्यांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलू लागला आहे. स्त्रीला केवळ 'अबला' न मानता तिचे 'दुर्गा' रूप स्वीकारण्यास तयार होत आहे म्हणजेच आजची मानसिकता या संकल्पनेला अधिक प्रगल्भतेने पाहू लागली आहे. एकीकडे समाजात कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर करणे, त्यांना समान संधी देणे याविषयीची जाणीव वाढली आहे म्हणजेच सकारात्मक बदल दिसून येत आहे. तर दुसरीकडे द्वंद्व ही पहायला मिळत आहे. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करतो. पण समाजात ख-या आयुष्यातील स्त्रियांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार किंवा त्यांच्याशी होणारा दुजाभाव थांबवायचा नाही म्हणजेच दुर्लक्ष करायचे. नवरात्रीत आपण दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतो. लहान मुलींना देवी मानून त्यांचे पादपूजन करून पाय पडतो. पण दुसरीकडे, समाजात महिलांविरुध्दचे गुन्हे आणि मानसिक छळ कमी झालेला नाही. नऊ दिवस ज्या स्त्री शक्तीला आपण पूजतो, त्याच स्त्रीचा रोजच्या आयुष्यात किती आदर केला जातो म्हणजे महिलांची सुरक्षितता आणि आदर हा आजच्या मानसिकतेसमोरील मोठा प्रश्न आहे. आधुनिक महिला आता या सणाकडे स्वत:मधील 'दुर्गा' (आत्मविश्वास आणि शक्ती) जागृत करण्याचे माध्यम म्हणून पाहत आहे. आजची स्त्री अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यासाठी नवरात्रीच्या ऊर्जेचा वापर करत आहे.

       आजच्या न्यूक्लियर फॅमिली आणि डिजिटल जगात माणूस एकटा पडत चालला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस लोकांना एकत्र आणतात, ज्यामुळे 'एकटेपणाची मानसिकता' दूर होऊन समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मानसिक प्रवासाला एक नवी ऊर्जा मिळते. सर्व मतभेद, जात-पात बाजूला ठेवून एकत्र नाचणे, आनंद साजरा करणे यामुळे समाजातील एकतेची भावना बळकट होते. वर्षभराच्या थकव्यानंतर मानवी मनाला पुन्हा नवसंजीवनी देणारा हा काळ ठरतो. नवरात्रीच्या नऊ रंगाचे आजच्या काळात वेगळेच वेड आहे. कार्यालयांमध्ये, कॉलेजमध्ये सर्वजण एकाच रंगाचे कपडे घालताना दिसन येते. ही मानसिकता 'एकता' आणि 'समानता' दर्शवते. विषमतेच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येण्याची ही आधुनिक मानसिकता नक्कीच कौतुकास्पद आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे आजची मानसिकता नवरात्रीकडे एक पारंपरिक धार्मिक सण म्हणून तर पाहतेच, पण सोबतीला मनोरंजन, सामाजिक एकत्रिकरण आणि मानसिक ऊर्जा मिळवण्याचे एक उत्तम माध्यम म्हणूनही याकडे बघते. नवरात्री हा केवळ एक धार्मिक सण राहिलेला नाही, तर तो सामाजिक एकत्रिकरण, आत्मपरीक्षण आणि मनोरंजनाचा एक मोठा उत्सव बनला आहे. गरज आहे ती फक्त बाह्य भपक्यापलीकडे जाऊन  या सणामागील 'स्त्री शक्तीचा आदर' आणि 'अंतर्मनाच्या शुद्धीकरणाचा' विचार जपण्याची आणि देवीच्या रूपांमधील संयम, बुध्दी आणि करुणा हे गुण आपल्या दैनंदिन विचारांमध्ये आणि वर्तनात उतरवण्याची. जेणेकरून ख-या अर्थाने आपल्या मनातील 'महिषासूर' रुपी नकारात्मक विचारांचा मर्दन करता येईल.

       आधुनिक काळात लोकांच्या मानसिकतेत एक सकारात्मक बदलही पाहायला मिळत आहे, तो म्हणजे पर्यावरणपूरक नवरात्र. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करणे, रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करणे आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा पाळणे याविषयी आजची तरुण पिढी जागरूक होत आहे. हा बदल समाजाच्या प्रगतीशील मानसिकतेचे लक्षण आहे. अनेक मंडळांमध्ये आता महागड्या मूर्ती किंवा सजावटीऐवजी त्या पैशातून रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना मदत किंवा वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. म्हणजेच आजची तरुण पिढी अधिक संवेदनशील होताना दिसते. लोक परंपरेचा आदर करत आहेत, पण त्यात स्वत:च्या सोयीनुसार आणि आधुनिक विचारसरणीनुसार बदलही करत आहेत.

       भारतीय संस्कृतीत नारीला आदिशक्तीचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे नवरात्र हा भारतीय संस्कृतील अत्यंत महत्त्वाचा, ऊर्जेचा आणि आदिशक्तीच्या उपासनेचा सण आहे. नऊ दिवस चालणा-या या उत्सवात आपण दुर्गेच्या नऊ रूपांची अत्यंत भक्तीभावाने पूजा करतो, उपवास करतो आणि तिचा जयजयकार करतो. हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो वाईटावर चांगल्याचा विजय आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे प्रतिक आहे. पण नवरात्र संपताच, 'या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता' म्हणणारे आपण, आपल्याच घरातील आणि समाजातील जिवंत स्त्रीशक्तीचा आदर करायला का विसरतो? आपण पुन्हा आपल्या जुन्या मानसिकतेकडे का वळतो? म्हणून स्त्रीशक्तीचा आदर केवळ नवरात्री पुरताच का? हा आजच्या काळातील आधुनिक समाजासमोरील एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

        एकीकडे आपण स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्यासमोर नतमस्तक होतो, तर दुसरीकडे प्रत्यक्ष आयुष्यात अनेक स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. वर्षातील नऊ दिवस तिची पूजा करणे आणि उर्वरित ३५६ दिवस तिच्या अस्तित्वाचा, तिच्या हक्कांचा आणि तिच्या भावनांचा आदर न करणे, हा एक ढोंगीपणा आहे. ख-या स्त्रीशक्तीचा आदर करायचा असेल, तर तो केवळ काही दिवसांपुरता मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग असायला हवा. आजच्या आधुनिक युगातही आपल्याला अनेक विरोधाभास पाहायला मिळतात. नवरात्रीत रात्री उशिरापर्यंत गरबा खेळणा-या मुलींना सुरक्षित वातावरण मिळते, पण एरवी मात्र त्यांना रात्री बाहेर पडताना हजार वेळा विचार करावा लागतो. एका बाजूला 'कन्या पूजन' केले जाते, तर दुस-या बाजूला आजही समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. घरात आणि कामाच्या ठिकाणी रात्रंदिवस झटणा-या स्त्रीच्या कष्टाला अनेकदा गृहीत धरले जाते.

       स्त्रीशक्तीचा खरा आदर केवळ मूर्तीची पूजा करण्यात किंवा तिची स्तुती गाण्यात नाही. शिक्षण, नोकरी आणि प्रगतीचे निर्णय घेताना तिला पुरुषांच्या बरोबरीने समान संधी आणि स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला घरात, रस्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानाचे नि रात्रीच्या वेळीही भीतीमुक्त वातावरण मिळायला हवे. तिच्या मताला, तिच्या आवडीनिवडीला महत्त्व आणि तिच्या स्वप्नांवर बंधने न घालता तिला स्वत:चे  अस्तित्व निर्माण करण्याचे स्वातंत्र्य समाजात दिले पाहिजे. मुलांवर लहानपणापासूनच मुलींचा आदर करण्याचे संस्कार झाले पाहिजे. जोपर्यंत आपण घरातल्या स्त्रीला माणूस म्हणून आदर देत नाही, तोपर्यंत मंदिरातील देवीची पूजा व्यर्थ आहे. स्त्री ही केवळ चूल आणि मूल सांभाळणारी व्यक्ती नसून ती आज अंतराळापासून ते देशाच्या संरक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहे. तिच्यातील या अथांग शक्तीचा आदर रोजच्या व्यवहारात दिसणे गरजेचे आहे.

       काळ बदलतो तशा सण साजरा करण्याच्या पद्धती बदलतात हे स्वाभाविक आहे. आजच्या मानसिकतेत जरी आधुनिकता आणि मनोरंजन वाढले असले, तरी सणाचे मूळ मर्म विसरता कामा नये. नवरात्र ही केवळ नऊ दिवस नटण्याची किंवा गरबा खेळण्याची संधी नाही, तर ती स्वत:मधील नकारात्मक विचार, अहंकार आणि वाईट सवयींवर विजय मिळवण्याची पर्वणी आहे. स्त्री ही केवळ नवरात्रीत पुजली जाणारी मूर्ती नाही, तर ती सृष्टीचे चक्र चालवणारी, कुटुंबाला आधार देणारी आणि समाजाची प्रगती साधणारी जिवंत शक्ती आहे. जोपर्यंत आपण आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी आणि मुलगी यांच्या कर्तृत्वाचा आणि अस्तित्वाचा आदर करत नाही, तोपर्यंत नवरात्रीच्या पूजेला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणूनच, स्त्रीशक्तीचा आदर हा केवळ नऊ दिवसांचा उत्सव न ठरता, तो ३६५ दिवसांचा जीवनमार्ग बनला पाहिजे. आपण समाजातल्या प्रत्येक स्त्रीला सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण देऊ, तरच ख-या अर्थाने देशात आणि समाजात 'नवरात्र' साजरी होईल.




             सुनील शिरपुरे
     कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७४९८८८५०६१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर