गेट टू गेदर ; प्राथमिक शाळेत सोहळे व्हावेत?

 गेट टू गेदर ; प्राथमिक शाळेत सोहळे व्हावेत?




         *गेट टू गेदरचेही सोहळे प्राथमिक शाळेत व्हावेत. कारण त्याच शाळेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. त्यातच त्याच शाळेतून विद्यार्थ्यांना विकासही होत असतो, सर्वतोपरीनं. भविष्य घडत असतं, त्याच शाळेत. तीच शाळा नसेल तर विद्यार्थ्यांचा विकास होवू शकणार नाही. त्यातच विद्यार्थी आपलं भविष्य घडवूच शकणार नाही. म्हणूनच प्राथमिक शाळेला कोणी विसरु नये. जरी आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानानं आपण आकाश व्यापत असलो तरी.*

            'माझ्या साडीचा पदर खेचत होते. माझ्या साडीला तोंड पुसत होते.' एका शिक्षिकेचं तिच्या तोंडचं वाक्य. तसं पाहिल्यास मुलं जेव्हा लहान असतात. ती पहिल्या वर्गात जेव्हा असतात. तेव्हा त्यांना कळत नसतं की ते विद्यार्थी आहेत व ते त्यांचे शिक्षक आहेत. 

          विद्यार्थी शिक्षकांचं नातं. ते नातं अमर असतं व त्या नात्याला अमरत्व प्राप्त झालेलं असतं. मुलं जेव्हा लहान असतात, तेव्हा तीच मुलं आपलं वाहणारं शेंबूड सुद्धा शिक्षिकेच्या साडीला पुसत असतात. त्यांच्या शौचाच्या तऱ्हाही बरोबर नसतात. कधी ती मुलं वर्गातच न सांगता शौच करुन ठेवतात. अन् ते स्वच्छ करायला प्राथमिक शाळेत शिपाई नसल्यानं ती शौच एका शिक्षकांनाच धुवून काढावी लागते आपल्या लेकरागत. ती मुलं जेव्हा लहान असतात. तेव्हा ती राग आल्यावर शिक्षकांना मारतही असतात. एवढंच नाही तर काही मुलं शिक्षकांच्या खांद्यावर हात ठेवतात व शिक्षकांच्या अंगाखांद्यावर वावरत असतात. त्यातच त्यांना शिक्षकांना 'सर' म्हणायचे असते. हेही कळत नसल्यानं घरी जे बोलतात. तसंच शाळेतही बोलतात. शाळेत ती मुलं शिक्षकांना 'सर' म्हणण्याऐवजी पप्पाच म्हणतात. तर शिक्षिकेला मम्मी म्हणून मोकळे होतात. काही मुलं शिक्षकांना चिमटेही काढत असतात. त्यांचं वावरणं हे घरी जसं असतं. तसंच शाळेतही असतंच, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

          मुलं जेव्हा लहान असतात. तेव्हा त्यांना शिक्षक शिक्षिका व आईवडील यांच्यातील भेद कळत नाही. ते सांगून त्यांना पटवून देण्यासाठी बरेच दिवस लागतात. कधी त्यांना मारलं वा रागावलं तरीही त्यांना त्याचं वाईट वाटत नाही. ते राग धरत नाहीत व दुसर्‍याच क्षणी ते जवळ येतात. त्या बालवयात त्यांना शिकवितांना आनंद येतो. जो आनंद वरच्या वर्गात शिकवितांना येत नाही. तसंच त्यांना शिकवितांना जे कसड लागतं. ते कसब वरच्या वर्गांना लागत नाही. तरीही मुलं प्राथमिक स्तरावर जे शिक्षक शिकवितात. त्यांना विसरतात व वरच्या अर्थात प्राथमिक स्तर सोडून इतर वर्गातील शिक्षक आठवतात. ही विचार करण्यालायक बाब आहे व तेवढीच चिंतनीयही आहे. प्राथमिक शिक्षक हा विद्यार्थ्यांवर केवळ संस्कारच करीत नाही तर त्यांना सर्वगुणसंपन्न देखील डनवत असतो. एकदा का एखाद्या मुलात संस्कार भरले की तेच संस्कार सार्वकालिक टिकत असतात, अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत.

         सध्या गेट टू गेदरचं फॅड आलं आहे व मुलं जी दहाव्या वर्गात असतात. त्याच दहावीच्या शाळेत जावून गेट टू गेदर करु लागलेले आहेत. त्या गेट टूगेदरमध्ये ती मुलं त्यांच्यासोबत शिकत असलेल्या प्राथमिक स्तरावरील मुलांनाही बोलवत नाहीत. असाच एक गेट टू गेदर. त्या गेट टू गेदरमध्ये एक मुलगी दिसली नाही. तेव्हा शिक्षकांनी तिला फोन केला की तू गेट टू गेदरच्या कार्यक्रमात का आली नाही. तेव्हा तिनं उत्तर दिलं की ती त्या शाळेत सातवीपर्यंतच त्यांच्यासोबत शिकल्यानं तिला त्यांनी बोलावलं नव्हतं. तीच बाब हेरुन शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांना तिच्या येण्याबद्दल विचारलं. तेव्हा त्याही मुलांनी तेच उत्तर दिलं की सर, दहावीमध्ये जी मुलं होती. हा कार्यक्रम त्यांचाच आहे. इतरांचा नाही. ती मुलगी सातवीपर्यंत आमच्यासोबत शिकायला होती. आठवीपासून दुसर्‍या शाळेत गेली होती. 

            मुलं ज्याप्रमाणे सातवीपर्यंत असलेल्या आपल्याच वर्गातील मुलांना विसरतात. तशीच ती त्यांना संस्कार शिकविणाऱ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही विसरतात. हे बरेच ठिकाणी दिसून येतं. तसं पाहिल्यास प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकविणं कठीण असतं. वरच्या वर्गाला नाही. सातवीनंतर तर नाहीच नाही आणि उरला प्रश्न विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याचा तर तोही प्रश्न सातव्याच वर्गात सुटतो. चांगलं भविष्य अर्थात चांगले संस्कार. वरच्या वर्गात विद्यार्थ्यांचं भविष्य घडत नाही. फक्त शिक्षण आणि त्या शिक्षणातून फक्त पदवी तेवढी मिळते. जर सातवीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी संस्कार चांगले केले असतील, तर तेच संस्कार त्यांच्यात पुढेही दिसून येतात. तरीही मुलांचे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विसरणे. ही गोष्ट काळजाला टोचते. त्या शिक्षकांच्या काळजाला टोचते की जे शिक्षक त्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर शिकवितात. मात्र पुर्वी असं नव्हतं.

        पुर्वीच्या काळात आश्रमपद्धती होती. मुलं आश्रमात शिकत असतंम. तिथंच ती लहानाची मोठी होत. तिथंच ती राहात असत व हे आश्रम घराजवळ नसायचे. बे आश्रम विरक्त अशा ठिकाणी म्हणजेच एखाद्या जंगलात असायचे. जिथं हिंस्र श्वापदांची भीती असायची. त्या जंगलात अगदी लहानपणापासूनच स्वतःचं संरक्षण कसं करायचं. ह्या गोष्टी व त्यातील करतब मुलं स्वतःच शिकायची. कारण ती गरज असायची त्यांची. त्यातूनच मुलं घडत असत. प्रत्येक वेळेस मुलांचं संरक्षण करण्यासाठी गुरु सोबतीला नसायचेच. स्वयंपाकासाठी आश्रमात लागणारे लाकडं, ते आणायला जेव्हा मुलं जंगलात जायचे. तेव्हा साऱ्याच समस्या त्यांच्यापुढे उद्भवत. अशा प्रसंगी ती मुलं हिंमतीनं समोर आलेल्या संकटांचा सामना करीत. असाच सामना करीत करीत ती लहानाची मोठी व्हायची. जी मुलं, त्यांच्या शाळेत शिकविणाऱ्या प्राथमिक स्तरावरील गुरुला आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरायची नाहीत. कारण त्यांचा जो गुरु त्यांना पहिल्या वर्गात शिकवायचा. तोच गुरु त्यांच्या पदवीपर्यंत म्हणजेच परीपुर्ण शिक्षण होईपर्यंत त्याच्या सोबत असायचा. आज तसं नाही. आज प्रत्येक वर्गानुसार गुरु बदलविण्याची पद्धत आलेली आहे व प्रत्येक वर्गात गुरु बदलत आहे. त्यातच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात वेगवेगळे गुरु मिळतात. अशावेळेस त्या विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक लक्षात राहतील? कसेबसे ते विद्यार्थी दहाव्या वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनाच तेवढं लक्षात ठेवतात. इतरांना नाही. त्याचं कारण आहे, त्या विद्यार्थ्यांना आलेली समजदारी. ती मुलं दहाव्या वर्गात असतांना बरीच समजदारी आलेली असते. त्यामुळंच सहजच दहाव्या वर्गात शिकविणारे शिक्षक त्याला लक्षात राहतात. तेवढे प्राथमिक शाळेतील शिक्षक लक्षात राहात नाहीत. म्हणूनच मुलं दहाव्या वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांना लक्षात ठेवतात. प्राथमिक स्तरावरील शिकविणाऱ्या शिक्षकांना लक्षात ठेवत नाहीत. ही शोकांतिकाच आहे.

         महत्वाचं सांगायचं झाल्यास सर्वच शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय जीव ओतून शिकवितातच. हे जरी खरं असलं तरी प्राथमिक शाळेतील शिक्षक हे जेवढं आपल्या वर्गातील मुलांना हाताळतात. तेवढ्या प्रमाणात वरच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना हाताळत नाहीत. ते फक्त स्वतःच्या मनानं अभ्यास करुन फक्त व्याख्यान देतात. जे लक्षात राहातं. अन् प्राथमिक शाळेतील शिक्षक....... ते शिक्षक शिकवितात. व्यतिरिक्त त्यांच्या विशेष गरजा ओळखून त्या गरजाही त्यांचे आईवडीलच असल्यागत पुर्ण करतात. कधी एखादं मुलं रडलंच तर त्याला स्वतःच्या वेतनातून पैसे खर्च करुन त्याला जी गरज असेल, ती गरज पुर्ण करतात नव्हे तर कधीकधी वह्या, पाटी, पेन्सील व पुस्तकही घेवून देतात. खाऊचे तर सोडूनच द्या. अलिकडील काळात विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करतांना काही शिक्षक आपल्या जवळच्या पैशानं विद्यार्थ्यांचे वाढदिवसही साजरे करतात. कशासाठी? तर त्या विद्यार्थ्यांना आनंद वाटावा. ते मुल खुश व्हावं, ती मुलं खुश राहावीत, यासाठी. ती मुलं साडीला आपलं शेंबूड पुसत असतील तरी त्यांचा राग न धरता त्यांना आपलंच लेकरु समजून वागवतात. 

          विशेष बाब ही की प्राथमिक शाळेतही गेट टू गेदरचे कार्यक्रम व्हायला हवेत. त्या शाळेतील शिकविणारे शिक्षकही मुलांना आठवायला हवेत. कारण हेच गेट टू गेदरचे कार्यक्रम शाळेत होणे म्हणजे संवादाचे दृढीकरण असते. शिक्षकांनाही वाटत असते की आपण शिकविलेली आपली मुलं परत एकदा शाळेत यावीत. ती भेटावीत, त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. जशी हुरहूर आपल्या आईवडीलांना आपल्या मुलांची वाटते तशी. आपण सासरवरुन एखाद्यावेळेस आपल्या माहेरी आलोच तर आपल्या आईवडीलांना ती गोष्ट एखाद्या दिवाळीसारखी वाटते. अगदी तसंच शिक्षकांनाही वाटत असते. अशी मुलं जेव्हा शिक्षकांना भेटायला येतात. तेव्हा तो प्रसंग म्हणजे शिक्षकांना पुरस्कार मिळाल्यासारखा प्रसंग असतो. ज्याची कल्पना ही करताच येत नाही. तशी काही मुलं येतातही शाळेत शिक्षकांना भेटायला. परंतु काही मुलं अशी असतात की जी ज्ञानाच्या फुटलेल्या पंखांनी उत्तूंग भरारी तर घेतात. संपुर्णतः आकाश व्यापतात. परंतु ते जमीन विसरतात. विसरतात की याच जमीनीवरुन चालायला शिकलो होतो, ज्ञानाचे पंख फुटण्यापुर्वी.

          खरं तर गेट टू गेदरचेही सोहळे प्राथमिक शाळेत व्हावेत. कारण त्याच शाळेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. त्यातच त्याच शाळेतून विद्यार्थ्यांना विकासही होत असतो, सर्वतोपरीनं. तीच शाळा नसेल तर विद्यार्थ्यांचा विकास होवू शकणार नाही. त्यातच विद्यार्थी आपलं भविष्य घडवूच शकणार नाही. हे तेवढंच खरं.


          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर