धुळीच्या धुरळ्यात कडेकरांचा श्वास कोंडला; दिवाळीपर्यंत महामार्ग पूर्ण करा, अन्यथा हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार : डॉ.महेश नाथ
——————
तीन-चार वर्षांपासून १३ किलोमीटरचा रस्ता अपूर्ण; डॉ. महेशनाथ यांचा कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला इशारा
आष्टी:
नगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील साबलखेड ते आष्टी या १७ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून रुग्ण, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांच्या आरोग्यावर तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यामुळे कडा परिसरातील महामार्गाचे उर्वरित काम दिवाळीपर्यंत पूर्ण करावे अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा डॉ. महेश नाथ यांनी दिला आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. महेश नाथ यांनी यापूर्वी संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी व निवेदने दिली आहेत. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी तात्पुरती कामे करण्यात आली; परंतु रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने धुळीचा प्रश्न कायम आहे.
दरम्यान, डॉ. महेश नाथ यांनी संबंधित कंत्राटदाराशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी कंत्राटदाराने येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काम पूर्ण होईपर्यंत दररोज पाणी मारावे
रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित यंत्रणेने दररोज पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. महेश नाथ यांनी केली आहे.
उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
कडा परिसरातील महामार्गाचे उर्वरित सर्व काम शंभर टक्के पूर्ण करावे, गावातील कोणताही भाग अपूर्ण ठेवू नये, रस्त्याच्या बाजूचे डांबरीकरण पूर्ण करावे, संपूर्ण गटार व्यवस्था उभारावी आणि रस्त्याच्या मध्यभागातील दुभाजकांचे काम पूर्ण करावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. काम पूर्ण होईपर्यंत धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी मारणे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रत्यक्ष देखरेख ठेवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुदतीत काम न झाल्यास न्यायालयात धाव
दिवाळीपर्यंत, म्हणजेच ८ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर कंत्राटदार आणि संबंधित विभागाविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात येईल. यासंदर्भात वकिलांशी चर्चा पूर्ण झाली असल्याचे डॉ. महेश नाथ यांनी सांगितले. परिसरातील व्यापारी आणि नागरिकांकडूनही या मागणीला पाठिंबा मिळत असून, महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करून धुळीच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


stay connected