आ. सुरेश धस व त्यांच्या कुटुंबीयांबाबत सोशल मीडियावरील आरोपांप्रकरणी कारवाईची मागणी
समस्त आंबेडकरी संघटनांचे आष्टी पोलिसांना निवेदन; कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
आष्टी : आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ताताई धस यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित आक्षेपार्ह भाषा वापरून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा आरोप करत, संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समस्त आंबेडकरी संघटना, आष्टी तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांढरे यांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनासह रास्ता रोको करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आमदार सुरेश आण्णा धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ताताई धस यांच्याविरोधात काही स्वयंघोषित समाजसेवकांकडून सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह भाषेत आरोप केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून, त्यातून लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातील कार्यक्षम आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी असून, सर्व जाती-धर्मांतील सर्वसामान्य जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. मात्र, काही व्यक्तींकडून सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या आरोपांमुळे मतदारसंघातील वातावरण दूषित होण्याची तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडण्याची शक्यता असल्याची चिंता आंबेडकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणे, आक्षेपार्ह भाषा वापरणे किंवा समाजात गैरसमज निर्माण होईल असे वर्तन करणे, याबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक आरोपांना वेळीच आळा घालून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास समस्त आंबेडकरी संघटनांच्या वतीने आष्टी येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर नगरसेवक अरुण निकाळजे, दीपक निकाळजे, शशिकांत निकाळजे, परिवहन गायकवाड, राजू निकाळजे, जालिंदर निकाळजे, सादिक कुरेशी यांच्यासह आंबेडकरी समाजातील अनेक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


stay connected