*कमी उत्पन्नाचा पैसा, वाढते कर्ज, चालू आर्थिक विवंचना आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या एक गंभीर समस्या*
*आर्थिक संकट हा शेवट नसतो; योग्य नियोजन, संवाद आणि वेळीच मदत घेतली तर परिस्थिती बदलू शकते – डॉ. जितीन वंजारे*
आजच्या धावपळीच्या जीवनात पैसा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गरज झाली आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, शेती, घरबांधणी, लग्नसमारंभ अशा अनेक कारणांसाठी कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेणे ही स्वतःमध्ये चुकीची गोष्ट नाही; परंतु उत्पन्नापेक्षा खर्च वाढणे, अनेक ठिकाणी कर्ज घेणे, वाढते व्याज, परतफेडीचा ताण आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घुसमट ही धोकादायक परिस्थिती ठरू शकते.आर्थिक अडचणींमुळे निर्माण होणारा ताण काही वेळा इतका वाढतो की व्यक्तीला आपल्यासमोर कोणताही मार्ग उरलेला नाही असे वाटू लागते. निराशा, झोप न लागणे, चिडचिड, एकटेपणा, कुटुंबापासून दूर जाणे, सतत कर्जाचा विचार करणे आणि ‘सगळं संपवावं’ अशा विचारांकडे जाणे ही गंभीर धोक्याची चिन्हे आहेत. आर्थिक समस्या आणि तीव्र भावनिक संकट यांचा संबंध असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नमूद केले आहे.मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे,कर्ज फेडता येते, पैसा पुन्हा कमावता येतो, व्यवसाय पुन्हा उभा करता येतो; पण गेलेले जीवन परत मिळत नाही.
पैशाचे नियोजन कसे करावे? आर्थिक संकट टाळण्याची पहिली पायरी म्हणजे उत्पन्न किती आणि खर्च किती याचा स्पष्ट हिशोब ठेवणे. RBIच्या आर्थिक साक्षरता मार्गदर्शनानुसार गरजा आणि इच्छा यातील फरक समजून घेणे, बजेट तयार करणे, बचत करणे आणि जबाबदारीने कर्ज घेणे महत्त्वाचे आहे.दर महिन्याला एक साधे आर्थिक बजेट तयार करावे.१)एकूण उत्पन्न लिहा.पगार, व्यवसाय, शेती, भाडे किंवा इतर उत्पन्नाची नोंद करा.२)आवश्यक खर्च वेगळा करा.अन्न, घर, शिक्षण, आरोग्य, वीज, प्रवास यासारख्या आवश्यक खर्चांना प्राधान्य द्या.३)अनावश्यक खर्च कमी करा.मोबाईल, ऑनलाइन खरेदी, महागडे मनोरंजन, दिखाऊ समारंभ किंवा गरज नसलेल्या वस्तू यावर नियंत्रण ठेवा.४)बचतीची सवय लावा.
उत्पन्न कितीही कमी असले तरी शक्य तेवढी नियमित बचत करण्याची सवय लावावी.५)आपत्कालीन निधी तयार करा.आजारी पडणे, व्यवसाय बंद पडणे, नोकरी जाणे किंवा अचानक मोठा खर्च येणे यासाठी स्वतंत्र निधी ठेवणे आवश्यक आहे.‘गरज’ आणि ‘हौस’ यात फरक ओळखा.आपल्याला एखादी वस्तू हवी आहे म्हणजे ती लगेच खरेदी करणे आवश्यक आहे असे नाही.गरज पुढे, हौस नंतर.दुसऱ्यांकडे आहे म्हणून मलाही पाहिजे’, ‘समाज काय म्हणेल?’ किंवा ‘प्रतिष्ठेसाठी कर्ज घेऊ’ या मानसिकतेमुळे अनेकदा आर्थिक संकट वाढते.
कर्ज घ्यायचे असेल तर हे पाच प्रश्न स्वतःला विचारा १)हे कर्ज खरोखर आवश्यक आहे का?२)माझे मासिक उत्पन्न किती आहे ३)सर्व कर्जांचे EMI मिळून किती होतात ४)व्याजदर आणि कर्जाची एकूण किंमत किती आहे?५)उत्पन्न काही महिन्यांसाठी कमी झाले तर मी EMI भरू शकतो का? कर्ज घेण्यापूर्वी परतफेडीची क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. RBIच्या मार्गदर्शनातही कर्ज घेण्यापूर्वी उत्पन्न, खर्च आणि परतफेडीची क्षमता विचारात घेण्यावर भर दिला आहे.
कर्ज झाले आहे; आता ते फेडायचे कसे?कर्ज झाले म्हणून घाबरून जाण्यापेक्षा कर्जाचा पूर्ण नकाशा तयार करा.एका वहीत लिहा-कर्ज, बाकीरक्कम,व्याजदर,EMI,थकबाकी.१.सर्व कर्जांची माहिती एकत्र करा.किती कर्ज आहे, कोणाकडून आहे, व्याज किती आहे आणि किती रक्कम थकीत आहे हे स्पष्ट करा.२.नवीन कर्ज घेऊन जुने कर्ज झाकण्याची सवय थांबवा,एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे महागडे कर्ज घेणे म्हणजे अनेकदा समस्या पुढे ढकलणे असते.३.जास्त व्याजाच्या कर्जाला प्राधान्य द्या.शक्य असल्यास जास्त व्याज असलेल्या कर्जावर अतिरिक्त रक्कम भरून व्याजाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करा.४.कर्जदार संस्थेशी संवाद साधा.EMI भरण्यात अडचण येत असल्यास बँक किंवा संबंधित अधिकृत वित्तीय संस्थेशी संपर्क साधून उपलब्ध पर्याय—उदा. पुनर्रचना, परतफेडीची मुदत किंवा इतर लागू सुविधा—याबाबत माहिती घ्यावी.५.क्रेडिट कार्ड आणि उच्च व्याजाच्या कर्जाबाबत विशेष काळजी घ्या.फक्त किमान रक्कम भरत राहिल्यास कर्ज दीर्घकाळ टिकू शकते. शक्य तितक्या लवकर संपूर्ण देणी कमी करण्याची योजना करावी.६.अतिरिक्त उत्पन्नाचा काही भाग कर्जफेडीसाठी वापरा.ओव्हरटाइम, अतिरिक्त व्यवसाय, कौशल्यावर आधारित काम किंवा इतर कायदेशीर उत्पन्नातून मिळालेल्या अतिरिक्त रकमेचा नियोजनपूर्वक वापर कर्ज कमी करण्यासाठी करता येतो.
आर्थिक विवंचना टाळण्यासाठी ‘५०-३०-२०’हा एक साधा आराखडा.प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार प्रमाण बदलू शकते; मात्र सुरुवातीस एक साधा आराखडा असा ठेवता येईल.५०% – आवश्यक खर्च
घर, अन्न, शिक्षण, आरोग्य, वीज, प्रवास.३०% – वैयक्तिक/इतर खर्च
मनोरंजन, इच्छा, इतर नियंत्रित खर्च.२०% – बचत, आपत्कालीन निधी आणि कर्जफेड.मात्र ज्यांच्यावर मोठे कर्ज आहे त्यांनी परिस्थितीनुसार अनावश्यक खर्च कमी करून कर्जफेडीचा हिस्सा वाढवण्यास प्राधान्य द्यावे.कर्जापेक्षा मोठी समस्या म्हणजे कर्ज लपवणे.अनेक लोक कुटुंबीयांपासून कर्ज लपवतात. एका व्यक्तीचे कर्ज हळूहळू संपूर्ण कुटुंबाचे मानसिक संकट बनते.म्हणूनच आर्थिक अडचण निर्माण झाली तर विश्वासू व्यक्तीशी बोला.माझ्यावर कर्ज आहे हे सांगणे लाजेचे नाही.मला मदत हवी आहे हे सांगणे कमजोरी नाही.वेळेत चर्चा झाली तर खर्च कमी करता येतो, उत्पन्नाचे पर्याय शोधता येतात आणि कर्जफेडीचा आराखडा तयार करता येतो.
आत्महत्या रोखण्यासाठी कुटुंबाने काय करावे?जर एखादी व्यक्ती ‘मला जगायचे नाही’ असे बोलत असेल,‘सगळे संपवतो’ असे म्हणत असेल,अचानक लोकांपासून दूर जात असेल,अत्यंत निराश किंवा अस्वस्थ दिसत असेल,स्वतःला इजा करण्याबद्दल बोलत असेल,आपली महत्त्वाची कामे अचानक आवरत असेल,तर त्या व्यक्तीला एकटे सोडू नका.शांतपणे त्यांच्याशी बोला.तू असे का करतोस?तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतो असे दोष देऊ नका.त्या ऐवजी तुझी समस्या आम्ही ऐकून घेऊ.आपण मिळून मार्ग शोधू.कर्जापेक्षा तुझं आयुष्य महत्त्वाचं आहे.तू एकटा नाहीस.जर ठोस योजना किंवा तातडीचा धोका असेल तर व्यक्तीला एकटे न सोडता धोकादायक साधने दूर करणे आणि तातडीने व्यावसायिक मदत घेणेआवश्यक.आत्महत्या नाही, उपाय शोधूया!’आर्थिक संकट आले की कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका.कुटुंबातील व्यक्ती, मित्र, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला.जर व्यक्तीला तातडीने स्वतःला इजा करण्याचा धोका असेल तर तिला एकटे सोडू नये आणि तातडीची वैद्यकीय/आपत्कालीन मदत घ्यावी.
समाजानेही आपली भूमिका बदलण्याची गरज आहे .कुटुंब, मित्र, बँका, वित्तीय संस्था, डॉक्टर, समुपदेशक आणि समाज यांनी आर्थिक संकटात असलेल्या व्यक्तीकडे सहानुभूतीने पाहणे आवश्यक आहे.पैसा महत्त्वाचा आहे; पण पैसा म्हणजे जीवन नाही.कर्ज फेडण्यास वेळ लागू शकतो.व्यवसायात नुकसान होऊ शकते.नोकरी जाऊ शकते.
मालमत्ता विकावी लागू शकते.जीवनशैली बदलावी लागू शकते.पण जीवन संपवणे हा कोणत्याही आर्थिक समस्येचा उपाय नाही.आज कर्ज आहे, उद्या त्याची पुनर्रचना होऊ शकते.
आज व्यवसाय तोट्यात आहे, उद्या पुन्हा उभा राहू शकतो.
आज आर्थिक अडचण आहे, उद्या परिस्थिती बदलू शकते.म्हणूनच प्रत्येकाने आर्थिक शिस्त, बचत, योग्य कर्जव्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य यांना समान महत्त्व द्यावे.‘कर्ज लपवू नका, समस्या लपवू नका आणि मनातील वेदनाही लपवू नका. बोला, मदत घ्या आणि मार्ग शोधा.
*लेखक-शारीरिक, मानसिक व आर्थिक सल्लागार समुदेशक -डॉ.जितीन वंजारे, संजीवनी क्लिनिक टाकळी मानूर -9922541030*


stay connected