अभूतपूर्व कार्याने तुकाराम मुंडे आणि वैभव गायकवाड विलक्षण चर्चेत Tukaram Mundhe

 अभूतपूर्व कार्याने तुकाराम मुंडे आणि वैभव गायकवाड विलक्षण चर्चेत




       सध्या महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आयएएस तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा  होत असताना तेलंगणात महाराष्ट्राच्या मातीतून गेलेल्या एका आयपीएस अधिका-याने आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप निर्माण केल्यामुळे तेही चर्चेच्या अग्रस्थानी आहे. तेलंगणासह हैदराबादमध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणा-या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याचा विडाच वैभव गायकवाड यांनी उचलल्याचं त्यांच्या कारवाईतून पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड यांनी तेलंगणा कॅडरमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळत गुन्हेगारीविरोधात धडक कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सध्या ते हैदराबाद शहरात डीसीपी, टास्क फोर्स म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी तसेच अन्नभेसळीविरोधात प्रभावी कारवाया सुरू आहेत.
       आयपीएस वैभव गायकवाड हे भारतीय पोलीस सेवेत २०१८ मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाली. तेलंगणामध्ये त्यांच्या सेवेला नालगुंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर वरंगळ येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वरंगळमध्येच अप्पर पोलीस उपआयुक्त (प्रशासन) तसेच टास्क फोर्स या महत्त्वाच्या जबाबदा-याही त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल या दोन जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विविध जिल्ह्यांमध्ये काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांना मिळाला. डिसेंबर २०२५ पासून ते हैदराबाद शहरात पोलीस उपायुक्त, टास्क फोर्स म्हणून कार्यरत आहेत.
       हैदराबाद शहरातील टास्क फोर्सची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संघटित गुन्हेगारी, गुंडागर्दी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, संवेदनशील व गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि शोध तसेच मोठ्या प्रमाणातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. याशिवाय गणपती, दुर्गाष्टमी, मिलाद-उन-नबी, मोहरम आणि बोनालूसारख्या मोठ्या धार्मिक व संवेदनशील कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, सुरक्षा बंदोबस्ताचे नियोजन करणे आणि संभाव्य धोके टाळणे ही महत्त्वाची जबाबदारीही टास्क फोर्सकडे असते.
        टास्क फोर्सच्या जबाबदारीसोबतच वैभव गायकवाड हे हैदराबाद शहर अंमली पदार्थ, मादक द्रव्य विरोधी पथकचे प्रभारी आहेत. याचबरोबर मार्च २०२६ मध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात हैदराबाद अन्न भेसळ पाळत ठेवणे (सर्वेक्षण) पथक (एच-फास्ट) हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात अन्नभेसळ, अन्नसुरक्षेशी संबंधित तक्रारी आणि अन्न विषबाधा (फुड पायझनिंग) च्या घटना सातत्याने समोर येत होत्या. अन्न सुरक्षा (फूड सेफ्टी) विभागाकडे मनुष्यबळ आणि इतर संसाधने मर्यादित असल्याने शहरातील मोठ्या प्रमाणावरील अन्नभेसळीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक होते. ही बाब लक्षात घेऊन हैदराबाद शहर पोलीसच्या माध्यमातून हैदराबाद अन्न भेसळ पाळत ठेवणे (सर्वेक्षण) पथक (एच-फास्ट) या स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली. पोलिसांकडील गुप्त माहिती, क्षेत्रीय माहिती संकलन, तपास आणि अंमलबजावणीची क्षमता अन्न सुरक्षा (फूड सेफ्टी) विभागाच्या तांत्रिक कौशल्यासोबत जोडण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी (एफएसओ) आणि महानगरपालिका अधिका-यांच्या समन्वयाने संयुक्त छापे, नमुने संकलन, पुरावे गोळा करणे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
       मार्च २०२६ पासून हैदराबाद अन्न भेसळ पाळत ठेवणे (सर्वेक्षण) पथक (एच-फास्ट) ने अन्नभेसळीविरोधात बुद्धिमत्ता-आधारित कारवाई सुरू केली. विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले. मार्च २०२६ पासून आतापर्यंत २०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून २३२ प्रकरणे अन्न सुरक्षा अधिका-याकडे सोपविण्यात आली आहेत. या कारवाईदरम्यान तब्बल २ लाख ९२ हजार २९८ किलो म्हणजेच सुमारे २९२ टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने, आलं-लसूण पेस्ट यांसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तपासादरम्यान खाद्यपदार्थांमध्ये कपडे रंगवण्याचे रंग, कृत्रिम रंग, हानिकारक रसायने, पाम तेल,  वनस्पती, पिष्ट (स्टार्च) तसेच इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले.
       हैदराबाद अन्न भेसळ पाळत ठेवणे (सर्वेक्षण) पथक (एच-फास्ट) चे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एखाद्या दुकानावर छापा टाकून कारवाई करण्याऐवजी भेसळीचा स्रोत आणि संपूर्ण पुरवठा साखळी शोधण्यावर भर दिला जात आहे. तक्रारी, गुप्त माहिती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील माहितीच्या आधारे संशयित व्यवसायांची ओळख केली जाते. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) अधिका-यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली जाते. नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचे मूळ ठिकाण शोधणे, पुरवठा साखळीचा मागोवा घेणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करणे अशा पद्धतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न भेसळी विरोधात पोलिस यंत्रणेचा थेट सहभाग घेऊन स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून काम करण्याचा हा अभिनव प्रयोग असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
       हैदराबाद शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील आठ महिन्यांत अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या कालावधीत ४०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एका मोठ्या कारवाईत सुमारे ३ कोटी रुपये किमतीचे गांजाचे तेल (हॅश ऑईल) जप्त करण्यात आले. तसेच एका महत्त्वपूर्ण प्रकरणात झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. हे आरोपी स्पीड पोस्टच्या माध्यमातून जवळपास २२ राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले. मुंबईत लोकल ट्रेनच्या माध्यमातून घरपोच गांजाची डिलिव्हरी केली जात असल्याचेही तपासातून उघड झाले. या कारवाईत जवळपास ५ कोटी रुपयांचे संपूर्ण ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणा-या ३५ विदेशी नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्यांना भारतात पुन्हा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
       अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दृष्टिकोन केवळ अमली पदार्थांचा पुरवठा करणा-यांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. तेलंगणा सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणा-या व्यक्तींना या केंद्रांमध्ये उपचार, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी पाठविले जात आहे. हैदराबाद शहरात अलीकडच्या काळात जवळपास २ हजार व्यक्तींची अंमली पदार्थ तपासणी (ड्रग टेस्टिंग) करण्यात आली. त्यापैकी सुमारे ८०० व्यक्ती 
ड्रग पॉझिटिव्ह आढळल्या. या सर्वांना पुढील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा राऊडीशीटर्सच नव्हे, तर गुंडागर्दीत सहभागी व्यक्ती, रस्त्यावरील गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेले तसेच सुशिक्षित आयटी आणि इतर क्षेत्रात नोकरी करणा-या व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आले.
       अमली पदार्थ विरोधातील लढा केवळ तस्कर आणि पुरवठादारांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याची मागणी कमी करण्यावरही भर दिला जात आहे. व्यसनाधीन व्यक्तींना उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हैदराबाद शहर पोलिसांकडून पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित केले जात आहे. अमली पदार्थांचा गैरवापर रोखणे, तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजाचे भविष्य सुरक्षित करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
       अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव रघुनाथ गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदा-या समर्थपणे सांभाळत आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टास्क फोर्स, अमली पदार्थ विरोधी पथक आणि हैदराबाद अन्न भेसळ पाळत ठेवणे (सर्वेक्षण) पथक (एच-फास्ट) सारख्या महत्त्वाच्या जबाबदा-यांमधून त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईसोबतच गुप्त माहितीच्या आधारे तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर दिला आहे. अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणा-यांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईमुळे हैदराबादमध्ये कायदा मोडणा-यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी तेलंगणात कर्तव्य बजावत असताना आपल्या कार्यक्षमतेने राज्याचे आणि विशेषतः अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. 'चलो कुछ तूफानी करते हैं' या अभूतपूर्व कार्याने दोन मोठ्या अधिका-यांनी लाखों ह्रदयांमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केलेली आहेत.


           सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७४९८८८५०६१
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर