जामखेड तालुक्यात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त!
डीजेच्या कर्कश आवाजाला ‘ब्रेक’, वन प्लस वन बेसला परवानगी, आज १२ वाजेपर्यंत सर्व गणेश मंडळांचे विसर्जन पूर्ण होणार : दशरश चौधरी
नासीर पठाण । जामखेड
जामखेड - जामखेड तालुक्यात गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कर्कश डीजेच्या आवाजाला मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, पारंपरिक वाद्यांसह नियंत्रित ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी एक डीवायएसपी, एक पोलीस निरीक्षक (पीआय), दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि पाच पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांच्यासह ४५ पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
बाहेरून ७० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.
तालुक्यात यंदा ‘एक गाव, एक गणपती’चे २६ मंडळे असून, एकूण १२४ गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग आहे. यामध्ये ५५ मोठी तर ६८ लहान गणेश मंडळे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबतही नियोजन करण्यात आले असून, १० व्या दिवशी ३०, ११ व्या दिवशी २५ आणि १२ व्या दिवशी ४३ मंडळांचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे आज रात्री १२ वाजेपर्यंत तालुक्यातील संपूर्ण गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
डीजेच्या कर्कश आवाजाला यंदा लगाम!
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवले आहे. वन प्लस वन बेसला परवानगी देण्यात आल्याने मोठ्या आवाजातील डीजेवर नियंत्रण आले असून, यंदा विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाज कमी झाल्याचे चित्र आहे.
पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्याची अपेक्षा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले आहे.




stay connected