कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये तरुणीशी गैरवर्तनाचा आरोप; डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये तरुणीशी गैरवर्तनाचा आरोप; डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल



कडा | प्रतिनिधी

कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीशी डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणी कडा परिसरातील रहिवासी असून ती १९ वर्षांची आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २९ ऑगस्ट २०२६ रोजी ती आई-वडिलांसोबत उपचारासाठी पटवा हॉस्पिटलमध्ये गेली होती. यावेळी तिला सलाईन व इंजेक्शन देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तरुणी आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तपासणी करून सलाईन लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

केबिनमध्ये बोलावून गैरवर्तन केल्याचा आरोप

उपचार सुरू असताना डॉक्टरांनी संबंधित तरुणीला काही कारण सांगून केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर तिच्या आईला बाहेर जाण्यास सांगून केबिनचा दरवाजा बंद केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, डॉक्टरांनी तरुणीशी अश्लील स्वरूपाचे बोलणे करून तिच्या इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श केल्याचा आरोप आहे. तरुणीने विरोध केला असता, तिला या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नये, अन्यथा तिची बदनामी होईल, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने घरी परतल्यानंतर आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

आष्टी पोलिस ठाण्यात FIR दाखल

घटनेनंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणीने आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी FIR क्रमांक ०३६९/२०२६ दाखल केल्याचे तक्रारीच्या माहितीत नमूद आहे.

या प्रकरणात डॉक्टर महेंद्र पटवा व पटवा हॉस्पिटल, कडा यांचा संशयित/आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५(१) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून प्रकरणाची सत्यता पडताळून सत्य समोर आणावे व दोषी आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर