हाय व्होल्टेज तार तुटून केक शॉपला आग; ५ ते ६ लाखांचे नुकसान
आष्टी | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील आंबेडकर चौक परिसरात असलेल्या एका केक शॉपमध्ये महावितरणच्या हाय व्होल्टेज लाईनमधील जंपर वायर तुटून पडल्याने भीषण नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि. १५ जून २०२६) सकाळी घडली. या दुर्घटनेत दुकानातील फ्रिज, एसी, इन्व्हर्टर, मायक्रोवेव्हसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली असून सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कडा येथील आंबेडकर चौकाजवळील गांधी हॉस्पिटल शेजारी असलेल्या "डिमलँड केक शॉप"चे मालक दीपक बबन पवळ (वय ३४) हे २०२१ पासून व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दुकानावरून महावितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज वीजवाहिन्या गेल्या आहेत. या तारांवर जंपर वायर बसविण्यात आली होती.
सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हाय व्होल्टेज लाईनवरील जंपर वायर तुटून केक शॉपमध्ये जाणाऱ्या मुख्य केबलवर पडली. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह गेल्याने दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून गेले.
या दुर्घटनेत पाच फ्रिज, दोन एसी, ३.५ केव्ही क्षमतेचा इन्व्हर्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, दोन स्टॅबिलायझर, दोन पंखे, सर्व लाईट फिटिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच डिजिटल डिस्प्ले बोर्ड यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे दुकानाचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहावरही परिणाम झाल्याचे दीपक पवळ यांनी सांगितले.
घटनेनंतर संबंधितांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन पंचनामा करण्याची तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणने अशा धोकादायक वीजवाहिन्यांची तात्काळ तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



stay connected