*घुंगराच्या तालापासून टाळ मृदंगाच्या गजरापर्यंत Jamkhed Yatra

 *घुंगराच्या तालापासून टाळ मृदंगाच्या गजरापर्यंत* 








 

*नासीर पठाण / नागपंचमी उत्सव* 


  भारत देश म्हणजे सणावारांचा देश. विविध धर्म, विविध जाती, विविध प्रांत यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. काही सणावारांना त्या-त्या शहरांच्या नावानेही ओळख मिळाली आहे. जसे मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहमदनगरचे मोहरम आणि जामखेडची नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जामखेडची पंचमी म्हटलं की लोकांच्या कानांत घुंगराचा आवाज घुमायला लागतो.


   जामखेड म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतं ते एक गजबजलेलं बाजारपेठेचा शहर. नगर आणि मराठवाड्याला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा. पण जामखेडची ओळख केवळ बाजारपेठे पुरती मर्यादित नाही या शहराच्या मातीला एक वेगळी सांस्कृतिक चव आहे इथल्या उत्सवांना परंपरेची किनार आहे. करमणुकीला लोकजीवनाचा स्पर्श आहे आणि काळाच्या ओघात बदलत गेलेल्या या परंपरांच्या मागे अनेक पिढ्यांच्या आठवणी दडलेल्या आहेत. याच संस्कृती ओळखीचा सर्वात ठळक अध्याय म्हणजे जामखेडची पंचमी. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये नागपंचमी धार्मिक श्रद्धेने साजरी होते मात्र जामखेडची नागपंचमी या परंपरेपेक्षा काहीशी वेगळी होती. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला जामखेड मध्ये रंगणारी नृत्य पंचमी एकेकाळी पंचक्रोशीतील रसिकांसाठी मोठे आकर्षण होती. नृत्यांगणीच्या पायातील घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस पडत नाही अशी लोकमान्यता या उत्सवाशी जोडली गेली होती. 


एका काळात सुरू झालेली ही प्रथा हळूहळू संपूर्ण गावाच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनली.


 जामखेड मध्ये पंचमीच्या उत्सवासाठी विविध ठिकाणी मंडळ असत. वर्गणी गोळा करण्यापासून चौकांची सजावट, मंडप,रंगमंच रोषणाई, ध्वनिक्षेपक आणि नृत्यांगणांना निमंत्रण देण्यापर्यंतची सारी धुरा ही मंडळ सांभाळत. नागपंचमीच्या दिवशी नागेश्वराचे दर्शन घेऊन उत्सवाला सुरुवात होत असे पण खरी रंगत चढत असे ती दुसऱ्या रात्री..

 संध्याकाळ होता जामखेडच्या रस्त्यावर गर्दी वाढू लागते.. पंचक्रोशीतील रसिक तर येतच पण पुणे -मुंबई सारख्या शहरातून अनेक जण या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी दाखल होत. बॅंड, ऑर्केस्ट्राचा सूर आणि विद्युत दिव्यांच्या माळांनी सजलेला चौक वातावरणाला एक वेगळीच झिंग देत. नऊवारी साडीतील नृत्यांगणा रंगमंचावर आली आणि पायातील घुंगरांनी पहिला ठेका धरला की जणू रात्र जागी होत असे. ढोलकी वर थाप पडताच पदन्यास सुरू होत आणि मग ताल लय अदाकारी आणि रसिकांचा उत्साह यांचा एक विलक्षण संगम घडत असे. कधी नोटांची बरसात होत असे कधी आवडत्या गाण्याची फर्माईश केली जाई. तर कधी एका नृत्यांगणीच्या प्रत्येक पदन्यायासावर रसिकाकडून दौलतजादा होत असे. 


एका मंडळातून दुसऱ्या मंडळाकडे फिरत रात्र जागवणारे रसिक पावसाची पर्वा न करता उत्सवाचा आनंद घेत पहाट पर्यंत चालणाऱ्या सोहळ्याचा शेवट जुन्या कचेरी समोरील पटांगणात होत असे. विविध मंडळ तिथे एकत्र येत. कला सादर करत सवाल-जबाब रंगत आणि मोठ्या रिंगणात बसलेले रसिक त्या कलाविष्काराचा आस्वाद घेत. एकेकाळी जामखेडचे नागपंचमी नाच गाण्यामुळे राज्यभर परिचित होती.


 मात्र धार्मिक परंपरेचा विसर पडू नये या भावनेतून काही धार्मिक वृत्तीच्या नागरिकांनी या उत्सवाला नव स्वरूप देण्याचा प्रयत्न केला यातून जन्माला आली टाळाची पंचमी.

हा नवा अध्याय संतोष बारगजे  1994 मध्ये जामखेड मध्ये आले. आणि त्यांनी नागेश्वर देवस्थानकडे होत असलेलं दुर्लक्ष पाहिलं. ती खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. एक ऑगस्ट 2003 ला श्री नागेश्वर यात्रेला धार्मिक स्वरूप देण्याची गरज आहे असं  त्यांनी मत मांडलं या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. श्री नागेश्वर सेवा मंडळातील कार्यकर्ते देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्या चार ऑगस्ट 2003 रोजी झालेल्या बैठकीत पुढील वर्षापासून श्री नागेश्वर पालखी सोहळा सुरू करण्याचा निर्णय झाला आणि 20 ऑगस्ट 2004 रोजी श्रावण शुद्ध पंचमीला श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचा शुभारंभ सुरू झाला. या दिवशी पूजा होम हवन आणि भजनाच्या वातावरणात श्री नागेश्वराची पालखी टाळ मृदंगाच्या गजरात निघाली हर हर महादेवाच्या जयघोषाने जामखेडमध्ये रस्ते दुमदुमले खर्डा रस्ता, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनि मारुती मंदिर , जय हिंद चौक, कचेरी रोड, महादेव गल्ली असा पालखीचा मार्ग निश्चित झाला. आजही तो कायम आहे.


 2006 मध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत वामनभाऊ महाराजांचा अखंड हरिनामाच्या सप्ताहाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तननांनी या उत्सवाला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उंची मिळाली. पालखीचा उत्सव केवळ एक दिवसापुरता न राहता त्याला भक्ती कीर्तनाने सामूहिक आध्यात्मिक जोड मिळाली काळानुसार खांद्यावर मिरवली जाणारी पालखी ही रथात आली. 2011 पासून रथातून मिरवणूक काढली जाऊ लागली. 2016 पासून या यात्रेनिमित्त पुन्हा सप्ताह सुरू झाला. या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांचा योगदान मोलाच आहे. कुणी आयोजनाची जबाबदारी घेतली, कुणी धार्मिक विधीची, कुणी मिरवणुकीची तर कोणी मंदिराच्या सजावटीची त्यामुळे हा उत्सव एखाद्या व्यक्तीचा न राहता हळूहळू सामाजिक श्रद्धेचा असा उत्सव सुरू झाला. फारसं कुणाचं लक्ष नसेल मात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिर आणि परिसराचा कायापालट झाला. तरुणांनी स्वखर्चाने, फुलांनी, मंदिराची सजावट करण्याची परंपरा सुरू केली. नेहमी दर्शन सोमवारी महापूजा सांप्रदायिक भजन शिवरात्रीचे पारायण, महाशिवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम यामुळे मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झाला. पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी नदी ओलांडावी लागायची, चांगला रस्ताही नव्हता नंतर परिस्थिती बदलली रस्ता ही तयार झाला पुढे पक्का सिमेंट काँक्रीटचा  मार्ग झाला आणि लोक वर्गणीतून प्रवेशद्वार उभे राहिले. हा मार्ग पुढे पालखी मार्ग ओळखला जाऊ लागला पुलापासून नदीच्या दोन्ही बाजूंनी रस्ता आणि पथदिव्यांची व्यवस्था झाल्याने परिसराला नवरूप मिळाले म्हणजेच एका उत्सवान केवळ धार्मिक वातावरण बदललं नाही तर मंदिर रस्ता आणि परिसर यांच्या जोडलेल्या सार्वजनिक जीवनालाही नवी दिशा मिळाली 


  काळ बदलला करमुणीकीची साधने बदलली व्हिडिओ पार्लर वाले गावात कायमस्वरूपी सिनेमागृह उभे राहिलं रोज चित्रपटांचे शो सुरु झाले. तमाशाच्या फडाला मिळणारी गर्दी कमी झाली. शनिवारचा नियमित तमाशा हळूहळू जत्रा यात्रा पुरता मर्यादित झाला. पण जिथे  मावळते तिथे दुसऱ्या स्वरूपात तिचा पुनर्जन्म होतो तमाशाच्या जागी लोकनाट्य कला केंद्रांचे संस्कृती विस्तार होवू  लागला. दिवानखान्यातील बैठकीपासून थिएटरमधील नृत्यांपर्यंत या कलेने नवे रुप धारण केलं. तिकीट काढून नृत्य पहाण्याची व्यवस्था झाली. विविध गावांमधून कलाकारांचे संच येऊ लागले नृत्यांगणा,गायिका आणि वादक यांचे संच काळानुसार बदलत गेले लोकप्रिय चित्रपट गीतावर नृत्य सादर करण्याची चढाओढ सुरू झाली. ढोलकी आणि पेटीबाजांच्या कौशल्याला रसिकाकडून दाद मिळू लागली. जामखेडची बाजारपेठ आणि भौगोलिक स्थान यामुळे कला केंद्रांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळालं. साखर कारणे संबंधित मंडळी धनाढ्यव्यक्ती, चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचाही या कलाकार कला केंद्रांना भेट वाढू लागली. यातूनच जामखेडच्या सांस्कृतिक प्रवासातील एक विलक्षण विरोधाभास समोर येतो कधी कधी वर्षभराच्या प्रतीक्षा नंतर पंचमीच्या एका रात्री नाचगाण्याचा जल्लोष अनुभव मिळत असे आज मात्र कला केंद्रांमुळे नृत्यकलेला वर्षभर व्यासपीठ मिळालय म्हणूनच जामखेडची पंचमी केवळ उत्सवाची कथा नाही ती बदलत्या ग्रामीण महाराष्ट्रातील करमणूक संस्कृतीची कहाणी आहे. घुंगराचा आवाज बदलला रंगमंच बदलला तंबू गेले टुरिंग टॉकीज गेली. सिनेमा आला, व्हिडिओ आला, आणि कला केंद्र उभी राहिली पण रसिकतेची नाळ मात्र तुटली नाही एका बाजूला श्री नागेश्वराच्या पालखीचा टाळ मृदंगाचा गजर आहे तर दुसऱ्या बाजूला रंगपंचावर थिरकणाऱ्या घुंगराचा नाद एका बाजूला हरिनाम सप्ताहातील अभंग कीर्तन आहे तर दुसऱ्या बाजूला तमाशाच्या वर्गातील रंगत ही दोन्ही टोक जामखेडच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्वात एकाच वेळी नांदतांना दिसतात. काळान जामखेडची पंचमी बदलली पण त्याच्या आठवणी मात्र पुसल्या नाहीत परंपरा म्हणजे काळाच्या कपाटात बंद करून ठेवलेली वस्तू नाही ती काळाबरोबर रूप बदलते कधी तिच्या पायात घुंगरू असतात तर कधी हातात टाळ असतात, कधी ती तंबूत रंगते तर कधी प्रकाश झोतातल्या रंगमंचावर जामखेडच्या पंचमीची कहाणी अशीच आहे एकेकाळी घुंगराच्या तालावर रात्र जागवणाऱ्या जामखेड ने पुढे टाळ मृदंगाच्या घरात नागेश्वराची पालखी मिरवली.

 दुर्लक्षित मंदिरांमध्ये श्रद्धेच वर्तुळ निर्माण झालं जुन्या टूरिंग टॉकीजच्या पडद्यापासून तमाशाच्या तंबू पर्यंत तिथून लोकनाट्य कला केंद्रापर्यंत करमणुकीचा प्रवास झाला या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली जामखेडची रसिकता कारण उत्सव बदलतात रंगमंच बदलतात कलाकार बदलतात काळ बदलतो पण एखाद्या गावाच्या मनात आणि उत्सवाबदल असली ओढ सहज बदलत नाही. कदाचित म्हणूनच जामखेडची पंचमी आजही पंचांगातील एक तारीख नाही ती एका शहराच्या सांस्कृतीक स्मृतीचं पान आहे जिथे कधीकाळी घुंगरू वाजले टाळ मृदंग दुमदुमले तंबू उभे राहिले पडद्यावर चित्र नाचली आणि हजारो रसिकांच्याहे त्यांच्या टाळ्यांनी रात्र उजळून निघाली.  जामखेडच्या मातीने अनेक सूर ऐकले पण प्रत्येक सुरात तिच्या लोक जीवनाचा ठेका दडलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर