Hindu muslim unity : उरूस, वारी आणि समतेची पंगत… मुस्लिम संतांनी जोडला महाराष्ट्र! वारकरी, सूफी आणि भक्ती परंपरेतून दिला शांतता, समता व बंधुभावाचा संदेश

 उरूस, वारी आणि समतेची पंगत… मुस्लिम संतांनी जोडला महाराष्ट्र!
वारकरी, सूफी आणि भक्ती परंपरेतून दिला शांतता, समता व बंधुभावाचा संदेश

Hindu muslim unity

Hindu muslim


माहिती संकलन व शब्दरचना : शाकीर शेख
मोबाईल : ९८२२५५००२३


महाराष्ट्राची संतपरंपरा कोणत्याही एका धर्माची, जातीची किंवा संप्रदायाची मक्तेदारी नव्हती. वारकरी, नाथ, महानुभाव, नागेश, दत्त, कादरी आणि चिश्ती सूफी अशा विविध आध्यात्मिक प्रवाहांच्या संगमातून महाराष्ट्राचे संतसाहित्य आणि लोकसंस्कृती घडली. या विशाल परंपरेमध्ये मुस्लिम संतगुरू आणि संतकवींनी मराठी भाषा, भक्ती चळवळ, सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभाव समृद्ध करण्याचे ऐतिहासिक कार्य केले.


मृत्युंजय ऊर्फ शहा मुंतोजी ब्रह्मणी, हुसेन अंबरखान, आलमखान, चांदसाहेब कादरी ऊर्फ चांद बोधले, शेख महंमद श्रीगोंदेकर, वाजीद पठाण, शहाबेग, शहा मुनी, शेख सुलतान, लतीफशहा, शकरगंज, शहा नवरंग, जंगली फकीर, जमाल फकीर आणि बंदा फकीर अशा अनेक मुस्लिम संतांनी मराठी भाषेतून गुरुभक्ती, आत्मज्ञान, योगसाधना, वैराग्य, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश दिला.


या संतांचा उद्देश स्वतःच्या धर्माचा प्रचार करून दुसऱ्या धर्माला कमी लेखणे नव्हता. महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांचे लोक प्रेमाने एकत्र राहावेत, समाजात शांतता व बंधुभाव नांदावा, जातिवाद आणि धार्मिक द्वेष नष्ट व्हावा तसेच प्रत्येक माणसाला समान सन्मान मिळावा, हा त्यांच्या साधना व समाजप्रबोधनामागील मुख्य उद्देश होता.


कादरी परंपरेने जोडलेल्या दोन संतशाखा


महाराष्ट्रातील मुस्लिम संतपरंपरेत सूफींच्या कादरी परंपरेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या परंपरेत बाह्य कर्मकांडापेक्षा अंतःकरणाची शुद्धी, गुरूवरील निष्ठा, अहंकाराचा नाश, ईश्वरप्रेम आणि मानवसेवेला सर्वोच्च महत्त्व दिले गेले.


महंमद गौस ग्वाल्हेरी–राजे महंमद–चांदसाहेब कादरी ऊर्फ चांद बोधले–शेख महंमद अशी ही आध्यात्मिक गुरुपरंपरा महाराष्ट्रात विकसित झाली. शेख महंमदांचे वडील राजे महंमद हे कादरी सूफी परंपरेतील साधक होते. त्यांचे शिष्य चांदसाहेब कादरी ऊर्फ चांद बोधले यांनी जनार्दन स्वामी आणि शेख महंमद या दोन्ही महान साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले.


यातून चांद बोधले–जनार्दन स्वामी–संत एकनाथ महाराज आणि चांद बोधले–शेख महंमद अशा दोन संतशाखा निर्माण झाल्या. एका मुस्लिम सूफी सद्गुरूच्या ज्ञानपरंपरेतून जनार्दन स्वामी घडले; त्यांच्याकडून संत एकनाथ महाराजांना उपदेश मिळाला आणि त्याच सद्गुरूच्या मार्गदर्शनातून शेख महंमदांसारखा महान मुस्लिम मराठी संतकवी घडला.


ही गुरुपरंपरा सांगताना शेख महंमदांनी लिहिले आहे—


> “ॐ नमोजी श्री सद्गुरू चांद बोधले ।

त्यांनी जानोपंता अंगीकारिले ।

जानोपंताने एका उपदेशिले ।

दास्यत्वगुणे ॥”




येथील ‘जानोपंत’ म्हणजे जनार्दन स्वामी आणि ‘एका’ म्हणजे संत एकनाथ महाराज. त्या काळातील संतांनी गुरूचा धर्म पाहिला नाही; त्यांनी गुरूमधील ज्ञानाचा प्रकाश पाहिला. मुस्लिम परंपरेतील ‘पीर’ आणि मराठी भक्तिपरंपरेतील ‘सद्गुरू’ ही नावे वेगळी असली, तरी गुरुतत्त्व एकच होते.


संत तुकाराम, शेख महंमद आणि अनगडशाह फकीर


जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि शेख महंमद बाबा यांच्यातील आध्यात्मिक स्नेह महाराष्ट्राच्या सर्वधर्मसमभावाचा सुंदर वारसा आहे. बडगाव येथे जयराम स्वामींच्या समाधी सोहळ्यात अनेक संत एकत्र आले होते. तेथे संत तुकाराम महाराजांनी शेख महंमद बाबांचा सन्मान करून त्यांच्या संतत्वाची उपस्थितांना जाणीव करून दिली.


देहूतील हजरत सय्यद अनगडशाह फकीर यांचे संत तुकाराम महाराजांशी असलेले नातेही सामाजिक ऐक्याचे जिवंत उदाहरण आहे. अनगडशाह बाबा संत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहत आणि त्यांच्यासोबत कीर्तनासाठी जात असत. आजही संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाल्यानंतर अनगडशाह बाबांच्या दर्ग्याजवळ पहिला विसावा घेते. तेथे आरती, कीर्तन आणि दर्ग्याला अभिवादन केले जाते.


एका मुस्लिम फकिराचा दर्गा, त्याची सेवा करणारे हिंदू कुटुंब आणि तेथे विसावणारी संत तुकाराम महाराजांची पालखी—हे महाराष्ट्राच्या सर्वधर्मसमभावाचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्र आहे.


मुस्लिम संतकवींनी समृद्ध केले मराठी साहित्य


मृत्युंजय ऊर्फ शहा मुंतोजी ब्रह्मणी यांनी अद्वैत, आत्मज्ञान आणि गुरुभक्तीवर मराठीत विपुल लेखन केले. त्यांनी हिंदू आणि इस्लामी तत्त्वज्ञानातील संज्ञांचा परस्पर अर्थ स्पष्ट करून दोन ज्ञानपरंपरांना जोडले. त्यांच्या लेखनात जीव, ब्रह्म, ईश्वर, माया, गुरू आणि आत्मज्ञानाचे विवेचन आढळते.


हुसेन अंबरखान यांनी भगवद्गीतेवर मराठीत ओवीबद्ध भाष्य केले. मुस्लिम संताने संस्कृत गीतेतील आत्मज्ञान, कर्तव्य आणि मुक्तीचा विचार मराठी समाजापर्यंत पोहोचविणे ही धार्मिक सीमा ओलांडणारी महान सांस्कृतिक घटना होती.


आलमखान हे नागेश-नाथ परंपरेतील प्रमुख मुस्लिम संतकवी होते. त्यांच्या पदांमध्ये गुरुभक्ती, मनोनिग्रह, वैराग्य आणि आत्मचिंतन दिसते. त्यांनी स्वतःची धार्मिक ओळख कायम ठेवून नाथ-नागेश साधनापरंपरेतील श्रेष्ठ विचारांचा स्वीकार केला.


वाजीद पठाण आणि शहाबेग हे केशवस्वामी भागानगरकरांचे मुस्लिम शिष्य आणि गुरुबंधू होते. त्यांच्या रचनांमध्ये गुरुभक्ती, संसाराची क्षणभंगुरता आणि आत्मज्ञानाचा संदेश आढळतो.


शहा मुनी हे महानुभाव परंपरेतील प्रभावशाली मुस्लिम संतकवी होते. त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथातून श्रीकृष्णभक्ती, गुरुनिष्ठा, महानुभाव तत्त्वज्ञान आणि समाजप्रबोधनाचा विचार व्यक्त झाला. या ग्रंथाच्या मूळ तीस अध्यायांमधून शहा मुनींची स्वतंत्र तत्त्वभूमिका स्पष्ट होते.


लतीफशहा यांनी आपली इस्लामी ओळख कायम ठेवून वारकरी भक्तिपरंपरेशी एकरूपता साधली. त्यांचे जीवन धर्मत्यागाचे नव्हे, तर मनातील धार्मिक भेद त्यागण्याचे तेजस्वी उदाहरण होते.


शेख सुलतान यांनी नाथ आणि सूफी विचारांबरोबरच मराठी कीर्तन, आरती आणि आख्यानपरंपरेला महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुस्लिम कीर्तनकाराने पुराणकथा आणि संतविचार मराठीतून सांगणे ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील समन्वयाची विलक्षण घटना होती.


शकरगंज, शहा नवरंग, जंगली फकीर ऊर्फ सय्यद हुसेन, जमाल फकीर आणि बंदा फकीर यांच्या उपलब्ध रचनांमधूनही गुरुभक्ती, आत्मशोध, समता आणि मानवतेचे विचार व्यक्त झाले. यांपैकी काही संतांच्या रचना हस्तलिखित बाडे, संतगाथा आणि विविध सांप्रदायिक ग्रंथांमधून उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या विखुरलेल्या साहित्याचा अधिक संशोधनपूर्वक शोध घेण्याची आवश्यकता आहे.


खुलताबादच्या दर्ग्यात वारकऱ्यांचा सन्मान


खुलताबाद ही महाराष्ट्राच्या सूफी परंपरेतील महत्त्वाची संतभूमी आहे. हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांनी दख्खनच्या भूमीत प्रेम, बंधुत्व, अन्नदान आणि मानवसेवेची परंपरा रुजविली. ते चिश्ती सूफी परंपरेतील महान संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो साधकांसह दख्खनमध्ये आले.


त्यांच्या परंपरेत जात, धर्म अथवा सामाजिक स्थान न पाहता गरजू, प्रवासी आणि भाविकांची सेवा करण्यात आली. सर्वांना सन्मानाने भोजन देणे ही सूफी खानकाह आणि दर्ग्यांची मानवतावादी ओळख बनली.


ही सेवा आजही खुलताबादच्या दर्ग्यात जिवंत आहे. तेथे आलेल्या वारकऱ्यांचे दर्ग्याच्या सेवेकऱ्यांनी आपुलकीने स्वागत व सन्मान करून त्यांच्यासाठी भंडाऱ्याची पंगत बसविली. वारकरी आणि दर्ग्याचे सेवेकरी एकाच पंगतीत बसले आणि प्रत्येकाला प्रेमाने भोजन वाढण्यात आले.


टाळ-मृदंग घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करणारे वारकरी आणि अल्लाहची बंदगी करणारे दर्ग्याचे सेवेकरी भंडाऱ्याच्या एकाच पंगतीत एकत्र आले—हे दृश्य महाराष्ट्राच्या सामायिक संस्कृतीचा जिवंत पुरावा आहे. तेथील अन्नदान हा केवळ भोजन देण्याचा कार्यक्रम नव्हता; तो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान आणि माणुसकीचा उत्सव होता.


सूफींचा उरूस आणि वारकऱ्यांची वारी एकमेकांच्या विरोधात नाहीत. दोन्ही परंपरांच्या केंद्रस्थानी प्रेम, सेवा, त्याग आणि ईश्वरभक्ती आहे. एका ठिकाणी ‘जिक्र’ होतो, तर दुसऱ्या ठिकाणी ‘हरिनाम’; परंतु दोन्हींच्या हृदयात मानवकल्याणाचीच प्रार्थना असते.


शांतता, समता आणि बंधुभाव हाच संतांचा उद्देश


मठ, दर्गे, खानकाह, कीर्तन, उरूस, वारी आणि भंडारा ही केवळ धार्मिक माध्यमे नव्हती; ती समाजाला एकत्र आणणारी मानवतेची केंद्रे होती. या ठिकाणी भुकेल्याला अन्न, प्रवाशाला आसरा, दुःखी माणसाला आधार आणि समाजाला शांततेचा संदेश मिळत होता.


या संतांनी जातिवाद, उच्च-नीचता, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा आणि दांभिकतेला विरोध केला. सर्व समाजांनी एकत्र राहावे, परस्परांच्या श्रद्धेचा सन्मान करावा आणि महाराष्ट्रात शांतता व बंधुभाव नांदावा, हा त्यांच्या कार्यामागील मुख्य उद्देश होता.


मुस्लिम संतकवींनी मराठी भाषेलाही धर्माची सीमा घातली नाही. त्यांनी सूफी परंपरेतील ‘पीर’, ‘मुरीद’, ‘हक’ आणि ‘बंदगी’; नाथांची योगसाधना; वारकऱ्यांचे नामस्मरण; महानुभावांचे तत्त्वचिंतन; वेदान्ताचे आत्मज्ञान आणि विठ्ठलभक्तीचा प्रेमभाव एकाच साहित्यिक आकाशाखाली आणला.


या संतांनी महाराष्ट्राला धर्मांच्या भिंती दिल्या नाहीत; त्यांनी प्रेमाचे पूल दिले. जातींच्या उतरंडी दिल्या नाहीत; त्यांनी समतेची पंगत दिली. द्वेषाची भाषा दिली नाही; त्यांनी शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा अमर संदेश दिला.


उरूसातील जिक्र, वारीतील हरिनाम आणि भंडाऱ्यातील समतेची पंगत—हाच सर्व समाजाला जोडणाऱ्या महाराष्ट्राचा खरा संतवारसा आहे!


संदर्भग्रंथ व साधने


१. पठाण, डॉ. यू. म. — मुसलमान (सूफी) संतांचे मराठी साहित्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई; पृ. १५–२२, २४–५४, ६६–७७, ७८–१५५ व १७५–२१६.


२. ढेरे, डॉ. रा. चिं. — मुसलमान मराठी संतकवी आणि एकात्मतेचे शिल्पकार.


३. शेख महंमद श्रीगोंदेकर — योगसंग्राम, प्रसंग १५.


४. वानखडे गुरुजी, कृष्ण गोपाल — हमारे मुस्लिम संत कवि, प्रकाशन विभाग, भारत सरकार, १९८४; पृ. ५५–६४ व ८९–९६.


५. बेंद्रे, वा. सी. — शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर यांचा कवितासंग्रह, भाग १ व २; तुकाराम महाराजांचे संतसांगाती, पृ. ५८–६१.


६. महिपती — भक्तविजय आणि संतविजय.


७. देशपांडे, अ. ना. — प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भाग २.


८. संत तुकाराम महाराज — श्री तुकाराम महाराजांची गाथा.


९. देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी आणि हजरत अनगडशाह बाबा दर्ग्याची परंपरा.


१०. हजरत मुंतजबोद्दीन जर जरी जर बक्ष दुल्हा, खुलताबाद — महाराष्ट्र सूफीज निर्मित दृकश्राव्य माहितीपट.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर