सोयाबीन पिकातील कीड-रोग व्यवस्थापनासह सिंचन, पर्जन्यमानाचा ताण व सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन
आष्टी | प्रतिनिधी :पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी (पिंपरखेड) आणि चिंचोली येथे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सोयाबीन पिकाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणाला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कुंभारवाडी, पिंपरखेड येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी आष्टी श्री. गोरख तरटे, मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रमोद खुटाळे, उपकृषी अधिकारी श्री. संदीप चाकणे, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती रेश्मा अनभुले, तसेच गावचे सरपंच श्री. खेत्रे, ज्ञानेश्वर ढोबळे, गव्हाणे यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. गोरख तरटे यांनी सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, लांबलेल्या अथवा अनियमित पर्जन्यमानामुळे पिकावर निर्माण झालेला ताण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणासोबतच प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सोयाबीन तसेच संत्रा पिकांच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट देण्यात आली. श्री. वैभव चव्हाण यांच्या संत्रा प्लॉटमध्ये वापरण्यात येणाऱ्या जीवामृत घटकाची पाहणी करून संत्रा पिकामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याचा शेती व्यवस्थापनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सागर चव्हाण , काकासाहेब कापसे , कुमार तात्या घोडके , तुकाराम चव्हाण , पोपट चव्हाण , दादासाहे गव्हाणे , सागर गव्हाणे ,वैभव चव्हाण , भरत चव्हाण , दता चव्हाण , विक्रम चव्हाण , कैलास गव्हाणे आदी शेतकरी उपस्थित होते .
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी भविष्यात कांदा पिकाविषयी सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी श्री. तरटे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. तरटे यांनी भविष्यात कांदा पिकावर एकदिवसीय सविस्तर प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
चिंचोली येथेही सोयाबीन पिकाचे प्रशिक्षण
याच दिवशी चिंचोली येथे खाद्यतेल तेलबिया अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित सोयाबीन पिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. गोरख तरटे, मंडळ कृषी अधिकारी धानोरा श्री. प्रमोद खुटाळे, उपकृषी अधिकारी श्री. संदीप चाकणे, आत्मा बीटीएम श्री. राज धोंडे तसेच चिंचोली गावचे सरपंच श्री. हनुमंत अडागळे उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, अन्यद्रव्य व्यवस्थापन, लांबलेल्या पर्जन्यमानामुळे पिकावर करावयाच्या उपाययोजना, सिंचन व्यवस्थापन, सामूहिक व वैयक्तिक शेततळी तसेच फळबाग लागवड योजना या विविध विषयांवर श्री. गोरख तरटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अनियमित पावसामुळे पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार योग्य व्यवस्थापन करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव वेळेत ओळखून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि विविध कृषी योजनांची माहिती मिळाली. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.संत्रा बागेमध्ये जीवामृत या सेंद्रिय घटकाचा केलेला वापर व येणाऱ्या काळात कांदा पिकाविषयी सविस्तर चर्चासत्र घेण्याविषयीचे सुतोवाच कृषीअधीकारी तरटे साहेबांनी केले .







stay connected