भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त दिले; तरी आज आम्हालाच परके ठरवले जाते!
“जब गुलिस्ताँ-ए-वतन को लहू की ज़रूरत पड़ी, हमने अपना लहू दिया; आज आज़ादी की बहार आई तो हमीं से कहा जाता है—इस चमन की तामीर में तुम्हारा कोई किरदार नहीं!”
माहिती संकलन व शब्दरचना
शाकीर शेख
मोबाईल : ९८२२५५००२३
भारताचे स्वातंत्र्य कोणत्याही एका धर्माने, जातीने अथवा समाजाने मिळविलेले नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, आदिवासी, दलित आणि बहुजन समाजातील असंख्य स्त्री-पुरुषांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. कुणाच्या हातात तलवार होती, तर कुणाच्या हातात लेखणी; कुणी रणांगणात प्राण दिले, कुणी फासावर हसत मृत्यू स्वीकारला, तर कुणी अंदमानच्या काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगली.
आज धर्माच्या आधारावर देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटली जात असताना स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम समाजाचे योगदान नव्या पिढीसमोर आणणे आवश्यक आहे. हा इतिहास कोणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नाही; तर मुस्लिम समाजानेही भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले रक्त, सहन केलेल्या यातना आणि केलेला त्याग इतिहासाच्या पानांवर सन्मानाने नोंदविण्यासाठी आहे.
भारताचे स्वातंत्र्य सर्वांच्या सामूहिक बलिदानातून मिळाले आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य हीच देशाची खरी शक्ती आहे, हा या इतिहासाचा मूलभूत संदेश आहे.
१८५७ च्या महासंग्रामातील मुस्लिम नेतृत्व
१० मे १८५७ रोजी मेरठ येथे सुरू झालेला सैनिक उठाव ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या व्यापक जनक्रांतीत बदलला. दिल्लीमध्ये शेवटचे मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांना क्रांतीचे प्रतीकात्मक नेतृत्व देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू आणि मुस्लिम सैनिक एकत्र लढले.
बहादूरशाह जफर हे वृद्ध होते; तरी क्रांतिकारकांनी त्यांना भारताच्या सामूहिक प्रतिकाराचे प्रतीक मानले. दिल्लीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी त्यांनी आदेश काढले. क्रांती अपयशी ठरल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या पुत्रांची हत्या केली, त्यांच्यावर खटला चालविला आणि त्यांना रंगून येथे निर्वासित केले. मातृभूमीपासून दूर असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अवधमध्ये बेगम हजरत महल यांनी आपले पुत्र बिरजिस कादर यांना गादीवर बसवून राज्यकारभार आणि युद्धाचे नेतृत्व केले. ब्रिटिशांनी दिलेली प्रलोभने नाकारून त्यांनी अखेरपर्यंत स्वाभिमानाने संघर्ष केला. लखनौच्या संरक्षणात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पराभवानंतरही त्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली नाही.
मौलवी अहमदुल्लाह शाह फैजाबादी यांनी अवधमध्ये ब्रिटिशांविरुद्ध व्यापक लढा उभारला. त्यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांनी ब्रिटिश सैन्याचे मोठे नुकसान केले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या शिरावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. युद्धभूमीवर त्यांना पराभूत करता न आल्यामुळे विश्वासघाताने त्यांची हत्या करण्यात आली.
मौलवी लियाकत अली यांनी अलाहाबादमध्ये क्रांतिकारी प्रशासन उभारले. बख्त खान यांनी दिल्लीतील क्रांतिकारी सैन्याचे नेतृत्व केले. खान बहादूर खान रोहिला यांनी बरेली आणि रोहिलखंडात, तर मौलवी सरफराज अली यांनी दिल्लीतील क्रांतिकारकांना मार्गदर्शन करून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष उभारला.
पीर अली खान यांनी पाटणा येथे ब्रिटिशविरोधी क्रांतिकारकांना संघटित केले. अटक झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली. मौलवी किफायत अली काफी यांनी मुरादाबाद परिसरात स्वातंत्र्ययुद्धाचा प्रचार आणि नेतृत्व केले. त्यांनाही ब्रिटिशांनी फाशी दिली.
शेषराव मोरे यांच्या ‘१८५७ चा जिहाद’मधील महत्त्वपूर्ण मांडणी
इतिहास-अभ्यासक शेषराव मोरे यांनी १८५७ चा जिहाद या मराठी ग्रंथात १८५७ च्या संघर्षातील मुस्लिम धार्मिक नेतृत्व, वहाबी प्रवाह, मौलवींचे ब्रिटिशविरोधी आवाहन आणि स्वातंत्र्ययुद्धातील त्यांच्या व्यापक सहभागाचा सविस्तर अभ्यास केला आहे.
१८५७ चा संघर्ष केवळ काही असंतुष्ट सैनिकांचे बंड नव्हते. त्यामध्ये सैनिक, शेतकरी, कारागीर, जमीनदार, संस्थानिक, धार्मिक नेते आणि सामान्य जनता सहभागी झाली होती. दिल्ली, अवध, रोहिलखंड, अलाहाबाद, बरेली, पाटणा, शामली, मुरादाबाद आणि हैदराबादसह अनेक भागांमध्ये मुस्लिम मौलवी आणि योद्ध्यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष उभारला.
मौलाना फजले हक खैराबादी, मौलवी अहमदुल्लाह शाह फैजाबादी, मौलवी लियाकत अली, मौलवी सरफराज अली, हाजी इमदादुल्लाह, मौलाना मुहम्मद कासिम नानौतवी आणि मौलाना रशीद अहमद गंगोही यांसारख्या विद्वानांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृती केली. शामली परिसरातील संघर्षात धार्मिक विद्वानांनी केवळ आवाहने केली नाहीत, तर प्रत्यक्ष रणांगणात उतरून नेतृत्व केले.
१८५७ च्या युद्धानंतर ब्रिटिशांनी मुस्लिम मौलवी, विद्वान आणि धार्मिक संस्थांकडे संशयाने पाहिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने ‘मौलवी’ आणि ‘बंडखोर’ हे शब्द जवळजवळ समानार्थी बनले. परिणामी अनेक मौलवींना फाशी, जन्मठेप, हद्दपारी, मालमत्ता जप्ती आणि काळ्या पाण्याच्या शिक्षा देण्यात आल्या.
शेषराव मोरे यांचा ग्रंथ १८५७ मधील मुस्लिम सहभागाचा स्वतंत्र मराठी संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वाचा आहे. त्यामुळे १८५७ च्या इतिहासाचे मूल्यमापन करताना मुस्लिम धार्मिक नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या सशस्त्र प्रतिकाराकडे दुर्लक्ष करता येत नाही.
दिल्लीतील संघर्ष आणि ब्रिटिशांचा रक्तरंजित सूड
१८५७ मध्ये दिल्ली हे ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या क्रांतीचे प्रमुख केंद्र बनले होते. मेरठहून आलेल्या सैनिकांसह देशाच्या विविध भागांतील हजारो क्रांतिकारक दिल्लीमध्ये एकत्र झाले. बख्त खान यांच्या नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लिम सैनिकांनी बहादूरशाह जफर यांच्या नावाने ब्रिटिश सैन्याविरुद्ध प्रखर लढा दिला.
दिल्ली पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश सैन्याने क्रांतिकारकांबरोबरच त्यांना मदत केल्याचा संशय असलेल्या सामान्य नागरिकांवरही अमानुष दडपशाही केली. अनेकांना नियमित न्यायालयीन प्रक्रिया न करता गोळ्या घालण्यात आल्या, फाशी देण्यात आली किंवा तोफेच्या तोंडी बांधून उडविण्यात आले.
शहरातील घरे आणि दुकाने लुटण्यात आली, वस्त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि हजारो नागरिकांना दिल्लीबाहेर हाकलण्यात आले. मुस्लिम विद्वान, मौलवी, सैनिक, कारागीर आणि सामान्य नागरिकांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले. अनेकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
दिल्लीतील हा रक्तरंजित अध्याय ब्रिटिशांनी १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध दडपण्यासाठी केलेल्या अमानुष अत्याचारांची साक्ष देतो.
राणी लक्ष्मीबाईंसोबत लढणारे मुस्लिम योद्धे
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात विविध धर्मांतील सैनिक होते. त्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व गुलाम गौस खान यांच्याकडे होते. खुदाबख्श खान यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे संरक्षण केले, तर गुल मुहम्मद पठाण यांनी राणीसोबत शेवटपर्यंत लढा दिला.
ब्रिटिश प्रतिनिधी रॉबर्ट हॅमिल्टन यांच्या ३० ऑक्टोबर १८५८ रोजीच्या अहवालात अंतिम लढ्याच्या वेळी राणी लक्ष्मीबाईंसोबत घोड्यावर स्वार असलेल्या एका मुस्लिम महिला सहकाऱ्याचा उल्लेख आहे. मुंदर नावाने ओळखली जाणारी ही विश्वासू सोबती राणीसोबत रणांगणात धारातीर्थी पडली.
मोतीबाईने तोफखान्यातून ब्रिटिशांना प्रत्युत्तर दिले, तर जुहीने महिलांच्या लढाऊ तुकडीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. झाशीचा लढा हा स्त्रीशक्ती आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा तेजस्वी अध्याय आहे.
जवळपास दहा हजार देशभक्त फासावर आणि तोफेच्या तोंडी
स्वातंत्र्यसैनिक शांतिमय राय यांच्या Freedom Movement and Indian Muslims आणि त्याच्या हिंदी आवृत्तीतील आजादी का आंदोलन और भारतीय मुसलमान या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये १८५७ नंतरच्या ब्रिटिश दडपशाहीचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.
शांतिमय राय यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात हजारो देशभक्त ब्रिटिश सैन्याशी प्रत्यक्ष लढताना शहीद झाले; तर जवळपास १०,००० देशभक्तांना फाशी देण्यात आली किंवा तोफेच्या तोंडी बांधून उडविण्यात आले. त्यांच्यामध्ये मुस्लिम समाजातील मौलवी, शेतकरी, सैनिक, कारागीर आणि सामान्य नागरिकांची संख्या मोठी होती.
ग्रंथाच्या चाळीसपेक्षा अधिक पृष्ठांच्या परिशिष्टामध्ये स्वातंत्र्य आंदोलनात शहीद झालेल्या मुस्लिम क्रांतिकारकांची विस्तृत, परंतु अपूर्ण यादी देण्यात आली आहे. या यादीत वहाबी आंदोलन, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, रौलट कायद्याविरोधी आंदोलन, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन, कामगार-किसान संघर्ष, आझाद हिंद सेना आणि १९४६ च्या नौदल उठावातील मुस्लिम शहिदांचा समावेश आहे.
परिशिष्टातील १८५७ च्या पुरवणी यादीमध्ये अबिदुद्दीन अब्बास मिर्झा, मिर्झा अबू बकर, अहमदुल्लाह खान, मौलवी अहमदुल्लाह शाह फैजाबादी, नवाब अहमद अली खान, अमानतुल्लाह खान शेख, सय्यद अमीर अली, नवाब अमीर खान, असद अली खान, असगर अली, असगर यार खान, असगरी बेगम, सय्यद अताउल्लाह खान, पीर अली खान, मौलवी किफायत अली काफी, मौलाना फजले हक खैराबादी, मौलवी लियाकत अली, मौलवी सरफराज अली, मौलवी सय्यद अलाउद्दीन, तुर्रेबाज खान, सय्यद अहमद, सय्यद दाद खान, शफाअत अली, शहाबुद्दीन, शहादत पठाण, शेख भिखन, शेख करीम, शेख सादत, सिराजुद्दीन खान, वारिस अली आणि इतर अनेक क्रांतिकारकांची नावे व त्यांच्या बलिदानाचा तपशील नोंदविण्यात आला आहे.
बरेलीमध्ये सय्यद अहमद मुफ्ती यांना फाशी देण्यात आली. शांतिमय राय यांच्या परिशिष्टातील नोंदीनुसार त्याच दिवशी त्यांच्यासह इतर २१३ देशभक्तांनाही वडाच्या झाडावर फाशी देण्यात आली.
हैदराबादमध्ये मौलवी सय्यद अलाउद्दीन आणि तुर्रेबाज खान यांनी सुमारे पाचशे रोहिले व अरब सैनिकांची सशस्त्र तुकडी उभी करून १७ जुलै १८५७ रोजी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला केला. मौलवी अलाउद्दीन यांना जन्मठेप देऊन अंदमानला पाठविण्यात आले. तुर्रेबाज खान यांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्यांचे पार्थिव साखळदंडांनी बांधून सार्वजनिक ठिकाणी टांगण्यात आले.
दिल्लीतील दिल्ली उर्दू अखबारमधून ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत करणारे मौलवी मुहम्मद बाकीर यांना सप्टेंबर १८५७ मध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले. ते भारतीय पत्रकारितेतील पहिल्या शहीद पत्रकारांपैकी एक मानले जातात.
शांतिमय राय यांनी ही यादी अपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नोंद झालेल्या नावांव्यतिरिक्तही हजारो मुस्लिम क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. हा विस्तृत परिशिष्ट मुस्लिम समाजाच्या देशव्यापी सहभागाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
मुस्लिम महिला क्रांतिकारकांचे बलिदान
स्वातंत्र्याच्या लढ्यात मुस्लिम महिलाही मागे नव्हत्या. बेगम हजरत महल, अझीजन बाई, असगरी बेगम, हबीबा, रहीमी, जमीला खान, उमदा, आबादी बानो बेगम, अमजदी बेगम आणि निशात-उन-निसा बेगम यांसारख्या अनेक महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला.
मुझफ्फरनगरमधील पंचवीस वर्षांच्या हबीबाने अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांनी तिला अन्य अकरा महिला क्रांतिकारकांसोबत फाशी दिली. त्या विविध धर्म आणि समाजांतील एकूण बारा महिला होत्या; मात्र त्यांचे ध्येय एकच होते—भारताचे स्वातंत्र्य.
रहीमीने महिलांना संघटित करून शस्त्रप्रशिक्षण दिले आणि स्वतःही युद्ध केले. तिलाही फाशी देण्यात आली. जमीला खान आणि उमदा यांनी ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढून बलिदान दिले. असगरी बेगम यांनी थाना भवन परिसरात महिलांना संघटित केले; ब्रिटिशांनी त्यांना जिवंत जाळले.
अझीजन बाई यांनी कानपूरमध्ये महिलांची लढाऊ तुकडी उभी करून नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या सैन्याला शस्त्रे, दारूगोळा, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरविली. उपलब्ध चरित्रात्मक लेखनानुसार १८५७ च्या संघर्षात सुमारे २२५ मुस्लिम महिलांनी प्राणांचे बलिदान दिले. काही रणांगणात शहीद झाल्या, काहींना फाशी देण्यात आली, तर काहींना जिवंत जाळण्यात आले.
न्यायालयातही लढला गेला स्वातंत्र्याचा लढा
स्वातंत्र्याचा संघर्ष केवळ रणांगणातच नव्हे, तर न्यायालयातही लढला गेला. १९१६ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल केला. त्यांची बाजू बॅरिस्टर मुहम्मद अली जिना यांनी मांडली. टिळकांची भाषणे राजकीय अधिकार आणि सुधारणांची मागणी करणारी असल्याचा प्रभावी युक्तिवाद करून त्यांनी टिळकांची निर्दोष मुक्तता घडवून आणली.
८ एप्रिल १९२९ रोजी शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत निषेधात्मक बॉम्ब टाकून स्वतःला अटक करून घेतली. त्यांची कायदेशीर बाजू मुस्लिम राष्ट्रवादी नेते बॅरिस्टर आसफ अली यांनी मांडली. ६ जून १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचे ऐतिहासिक निवेदनही त्यांनी न्यायालयात वाचले.
बॅरिस्टर आसफ अली यांच्या पत्नी अरुणा आसफ अली यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकविला.
अशफाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल
काकोरी रेल्वे कारवाईतील अशफाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री भारताच्या सामायिक संस्कृतीचे अमर प्रतीक आहे. त्यांचे धर्म वेगळे होते; परंतु मातृभूमी आणि ध्येय एकच होते.
१९ डिसेंबर १९२७ रोजी अशफाकउल्ला खान यांना फैजाबाद, रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर आणि रोशनसिंह यांना अलाहाबाद तुरुंगात फाशी देण्यात आली. राजेंद्रनाथ लाहिरी यांना १७ डिसेंबर रोजी गोंडा तुरुंगात फाशी दिली गेली.
ब्रिटिशांनी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगांत फाशी दिली; परंतु इतिहासाने त्यांचे बलिदान कायमचे एकत्र जोडले.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक
अनेक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. सेल्युलर कारागृह पोर्ट ब्लेअर, दक्षिण अंदमान येथे आहे. त्याच्या उभारणीपूर्वीही अंदमानमध्ये ब्रिटिशांची दंडवसाहत होती.
मौलाना फजले हक खैराबादी यांना जन्मठेप देऊन अंदमानला पाठविण्यात आले. कठोर कारावासात १८६१ मध्ये त्यांचे तेथेच निधन झाले.
मौलाना मुहम्मद जाफर थानेसरी यांना प्रथम फाशीची शिक्षा सुनावण्यात आली; नंतर ती जन्मठेप आणि अंदमानला हद्दपारी अशी करण्यात आली. अंदमानमधील सक्तमजुरी आणि अत्याचारांचे अनुभव त्यांनी काला पानी या ग्रंथात नोंदविले.
याह्या अली, अहमदुल्लाह, अब्दुल रहीम सादिकपुरी, अब्दुल गफूर, अमीर खान, अमीरुद्दीन, इब्राहिम मंडल, हशमत खान, मुहम्मद शफी हुसैन, मुहम्मद शफी लाहोरी, अल्लाउद्दीन, अली अहमद सिद्दीकी आणि मुजतबा हुसैन यांच्यासह अनेक मुस्लिम क्रांतिकारकांना अंदमानमध्ये पाठविण्यात आले.
त्यांना तेलाचा घाणा ओढणे, नारळाच्या काथ्यापासून दोर तयार करणे, जंगलतोड, उपासमार, बेड्या, एकांतवास आणि अमानुष मारहाण सहन करावी लागली. काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या कोठड्यांमध्ये त्यांनी भोगलेल्या यातना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अविस्मरणीय बलिदान आहेत.
पत्रकारिता, रेशमी रुमाल चळवळ आणि हसरत मोहानी
ब्रिटिशांविरुद्धची लढाई पत्रकारितेतूनही लढली गेली. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अल-हिलाल आणि अल-बलाग, मौलाना मुहम्मद अली जौहर यांनी कॉम्रेड आणि हमदर्द, तर मौलाना हसरत मोहानी यांनी उर्दू-ए-मुअल्लामधून ब्रिटिश साम्राज्यवादावर प्रहार केला.
मौलाना महमूद हसन आणि मौलाना उबैदुल्लाह सिंधी यांनी ‘रेशमी रुमाल चळवळी’द्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटिशांविरुद्ध प्रयत्न केले. मौलाना महमूद हसन यांना माल्टा येथे कैद करण्यात आले.
राजा महेंद्रप्रताप यांच्या नेतृत्वाखाली काबूलमध्ये स्थापन झालेल्या भारताच्या हंगामी सरकारमध्ये मौलवी बरकतुल्लाह भोपाळी पंतप्रधान होते.
मौलाना हसरत मोहानी यांचे मूळ नाव सय्यद फज्लुल हसन होते. ते सूफी विचारांचे कवी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि श्रीकृष्णाचे निस्सीम प्रेमी होते. त्यांनी १९२१ मध्ये स्वामी कुमारानंद यांच्यासोबत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. “इन्कलाब जिंदाबाद” या घोषणेच्या निर्मिती आणि प्रसाराशी त्यांचे नाव जोडलेले आहे.
त्यांच्या कुल्लियात-ए-हसरत मोहानीमध्ये श्रीकृष्णाच्या प्रेम आणि सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या रचना आहेत. ते मथुरा-वृंदावनला जात आणि जन्माष्टमीमध्ये सहभागी होत. श्रद्धावान मुस्लिम असूनही त्यांनी श्रीकृष्णाविषयीचे प्रेम जपले. त्यांनी फाळणीला विरोध करून भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.
मुस्लिम महिला नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रवाद
आबादी बानो बेगम अर्थात ‘बी अम्मा’ यांनी पडदा पद्धतीचे बंधन झुगारून देशभर ब्रिटिशविरोधी भाषणे केली. अमजदी बेगम यांनी मौलाना मुहम्मद अली जौहर तुरुंगात असतानाही आंदोलन सुरू ठेवले. निशात-उन-निसा बेगम यांनी मौलाना हसरत मोहानी यांच्या संघर्षाला साथ दिली.
बदरुद्दीन तय्यबजी १८८७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. खान अब्दुल गफार खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’ चळवळीने अहिंसक संघर्ष उभारला.
मौलाना हुसैन अहमद मदनी, मौलाना किफायतुल्लाह देहलवी, मौलाना हिफजुर रहमान सेओहारवी आणि मौलाना अहमद सईद देहलवी यांच्यासह जमियत उलेमा-ए-हिंदच्या अनेक नेत्यांनी संयुक्त भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केला.
फाळणीविरोधी देशभक्त मुस्लिमांचा संघर्ष
इतिहास-अभ्यासक शमसुल इस्लाम यांनी Muslims Against Partition of India: Revisiting the Legacy of Allah Bakhsh and Other Patriotic Muslims या ग्रंथातून फाळणीला विरोध करणाऱ्या देशभक्त मुस्लिमांचा दुर्लक्षित इतिहास समोर आणला आहे.
मुस्लिम लीगने मार्च १९४० मध्ये लाहोर ठरावाद्वारे स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मांडल्यानंतर अवघ्या पाच आठवड्यांत २७ ते ३० एप्रिल १९४० दरम्यान दिल्लीतील क्वीन्स पार्क येथे ‘आझाद मुस्लिम कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली.
सिंधचे तत्कालीन पंतप्रधान अल्लाह बख्श सूमरो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत भारताच्या विविध प्रांतांतील सुमारे १,४०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
जमियत उलेमा-ए-हिंद, मजलिस-ए-अहरार-ए-इस्लाम, ऑल इंडिया मोमिन कॉन्फरन्स, ऑल इंडिया शिया पॉलिटिकल कॉन्फरन्स, खुदाई खिदमतगार, बंगाल कृषक प्रजा पक्ष, अंजुमन-ए-वतन बलुचिस्तान, ऑल इंडिया मुस्लिम मजलिस आणि जमियत अहले हदीस यांसारख्या विविध मुस्लिम संघटना या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
परिषदेने धर्माच्या आधारावर भारताचे विभाजन करण्याची योजना अव्यवहार्य, देशहितविरोधी आणि मुस्लिम समाजाच्या हितालाही बाधक असल्याचे घोषित केले. भारतातील मुस्लिम हे या देशाचे समान नागरिक असून इतर भारतीयांसोबत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष आणि बलिदान करण्याची त्यांचीही समान जबाबदारी आहे, अशी भूमिका परिषदेत घेण्यात आली.
अल्लाह बख्श सूमरो यांनी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या भारतविरोधी वक्तव्याचा निषेध करून ब्रिटिश सरकारने दिलेले किताब परत केले. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांचे सरकार बडतर्फ केले. १४ मे १९४३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली.
शमसुल इस्लाम यांच्या संशोधनातून मुस्लिम लीग ही भारतातील सर्व मुस्लिमांची एकमेव प्रतिनिधी संस्था होती आणि संपूर्ण मुस्लिम समाजाने फाळणीला पाठिंबा दिला होता, हा प्रचार ऐतिहासिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.
अल्लाह बख्श सूमरो, खान अब्दुल गफार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना हुसैन अहमद मदनी, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी, शौकतुल्लाह अन्सारी, मौलाना हिफजुर रहमान सेओहारवी आणि अनेक मुस्लिम संघटनांनी संयुक्त, धर्मनिरपेक्ष आणि अखंड भारताचा पुरस्कार केला.
अहमदनगरच्या किल्ल्यापासून जामा मशिदीपर्यंत
मौलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होते. १९४० ते १९४६ या निर्णायक काळात त्यांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व केले.
भारत छोडो आंदोलनानंतर ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या इतर नेत्यांसोबत अटक करून अहमदनगरच्या ऐतिहासिक किल्ल्यात कैद करण्यात आले.
या कारावासात त्यांनी आपल्या मित्राला उद्देशून अनेक चिंतनशील पत्रे लिहिली. ती प्रत्यक्ष पाठविण्याची परवानगी नसल्यामुळे कारावासातून सुटल्यानंतर त्यांचे संकलन गुबार-ए-खातिर या नावाने प्रसिद्ध झाले.
पत्नीच्या अंतिम दर्शनालाही मुकले मौलाना आझाद
मौलाना आझाद यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यागाची अत्यंत वेदनादायक घटना त्यांच्या अहमदनगर किल्ल्यातील कारावासात घडली.
आझाद यांच्या पत्नी जुलैखा बेगम यांची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती. ९ ऑगस्ट १९४२ रोजी आझाद यांना अटक झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर अधिक परिणाम झाला. आझाद यांना कारावासात पत्नीची प्रकृती सातत्याने खालावत असल्याच्या बातम्या मिळत होत्या.
प्रकृती गंभीर झाल्यानंतर जुलैखा बेगम यांच्या डॉक्टरांनी स्वतः ब्रिटिश सरकारला पत्र लिहून आझाद यांना पत्नीचे अंतिम दर्शन घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यांच्या जगण्याची आशा अत्यंत कमी असल्याचेही डॉक्टरांनी कळविले; परंतु ब्रिटिश सरकारने त्या पत्राकडे दुर्लक्ष केले.
मौलाना आझाद यांनीही व्हाइसरॉयला पत्र लिहिले; मात्र पत्रव्यवहारातून कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. एके दिवशी अहमदनगर किल्ल्यातील अधिकारी चीता खान नेहमीपेक्षा वेगळ्या वेळी आझाद यांच्याकडे आले. त्यांनी कोणतेही शब्द न बोलता एक तार आझाद यांच्या हातात दिली. ती कलकत्त्याहून आलेली होती आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याची बातमी होती.
९ एप्रिल १९४३ रोजी जुलैखा बेगम यांचे निधन झाले. स्वातंत्र्यलढ्यासाठी कारावास भोगत असलेल्या आझाद यांना पत्नीचे अंतिम दर्शन घेता आले नाही आणि त्यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आले नाही.
आझाद यांनी व्हाइसरॉयला लिहिले की, ब्रिटिश सरकारला त्यांची तात्पुरती कलकत्त्याला बदली करून पत्नीची शेवटची भेट घडविणे सहज शक्य होते; परंतु सरकारने तसे केले नाही. त्यांच्या या पत्रालाही उत्तर देण्यात आले नाही.
तीन महिन्यांनंतर त्यांच्या भगिनी आब्रू बेगम यांचेही निधन झाले. एकामागून एक दोन वैयक्तिक आघात सहन करूनही आझाद यांनी ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष आणि अखंड भारतावरील आपली निष्ठा सोडली नाही.
ही घटना मौलाना आझाद यांच्या राजकीय संघर्षाबरोबरच त्यांच्या कुटुंबानेही स्वातंत्र्यासाठी मोजलेल्या वैयक्तिक किमतीची साक्ष देते. या घटनेचे वर्णन आझाद यांनी स्वतः India Wins Freedomमध्ये केले आहे.
मौलाना आझाद यांचा फाळणीविरोध
मौलाना आझाद यांनी द्विराष्ट्रवाद आणि भारताच्या फाळणीला अखेरपर्यंत विरोध केला. मुस्लिम आणि हिंदू हे हजारो वर्षांच्या सहजीवनातून एक संयुक्त भारतीय राष्ट्र बनले आहेत, अशी त्यांची ठाम भूमिका होती.
फाळणीनंतर अनेक मुस्लिम कुटुंबे पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत असताना २३ ऑक्टोबर १९४७ रोजी त्यांनी दिल्लीच्या जामा मशिदीतून ऐतिहासिक आवाहन केले.
दिल्ली आणि भारत ही आपली मातृभूमी असून ती आपल्या पूर्वजांच्या रक्तानेही पोसली गेली आहे; भीतीपोटी देश सोडू नका, सत्ताधाऱ्यांकडून देशभक्तीची प्रमाणपत्रे मागू नका आणि स्वतंत्र भारताचे स्वाभिमानी नागरिक म्हणून उभे राहा, असा त्यांनी संदेश दिला.
“परत या; हे तुमचे घर आहे, हा तुमचा देश आहे. हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या आवाहनानंतर पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेक मुस्लिम कुटुंबांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून मौलाना आझाद यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मुस्लिमांना भारत सोडू नका असे सांगणाऱ्या, स्वतःच्या पत्नीच्या अंतिम दर्शनालाही मुकून कारावास भोगणाऱ्या आणि देशाच्या शिक्षणव्यवस्थेचा पाया उभारणाऱ्या व्यक्तीच्या देशभक्तीवर संशय घेणे म्हणजे इतिहासालाच नाकारणे होय.
आझाद हिंद सेनेतील मुस्लिम सैनिक आणि दानशूर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये कर्नल शाहनवाज खान, कर्नल हबीबुर रहमान, कर्नल अझीझ अहमद आणि कर्नल मुहम्मद इनायत कियानी यांच्यासह असंख्य मुस्लिम सैनिक होते.
आझाद हिंद सेनेच्या खटल्यातील कर्नल शाहनवाज खान, कर्नल प्रेमकुमार सहगल आणि कर्नल गुरबक्षसिंह ढिल्लन यांच्या सुटकेसाठी धर्मभेद विसरून संपूर्ण भारत एकवटला.
रंगूनमधील व्यापारी अब्दुल हबीब युसुफ मारफानी यांनी रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेसह आपली मोठी संपत्ती आझाद हिंद सरकारला अर्पण केली. नेताजींनी त्यांना ‘सेवक-ए-हिंद’ हा सन्मान दिला.
रक्त आणि बलिदानाने लिहिलेला इतिहास
बहादूरशाह जफर यांनी निर्वासित जीवनात प्राण सोडले. बेगम हजरत महल यांनी शरणागती पत्करली नाही. अशफाकउल्ला खान फासावर गेले. मौलवी मुहम्मद बाकीर यांनी निर्भय पत्रकारितेसाठी प्राण दिला. मौलाना फजले हक खैराबादी यांचा अंदमानमध्ये मृत्यू झाला. गुलाम गौस खान आणि मुंदर यांनी राणी लक्ष्मीबाईंसोबत रक्त सांडले.
मुहम्मद अली जिना यांनी लोकमान्य टिळकांची, तर आसफ अली यांनी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची कायदेशीर बाजू मांडली. हसरत मोहानी यांनी इस्लामी श्रद्धा आणि कृष्णप्रेमाचा संगम घडविला. अल्लाह बख्श सूमरो यांनी फाळणीला विरोध करताना प्राण गमावले, तर मौलाना आझाद यांनी पत्नीच्या अंतिम दर्शनालाही मुकून ब्रिटिशांचा कारावास सहन केला आणि भारतीय मुस्लिमांना याच देशात स्वाभिमानाने राहण्याचा संदेश दिला.
“जब ज़रूरत पड़ी गुलिस्ताँ को लहू, हमने अपना लहू दे दिया;
आज चमन में बहार आई तो कहते हो—तुम्हारा कोई किरदार नहीं!”
जेव्हा देशरूपी बागेला रक्ताची गरज होती, तेव्हा मुस्लिम समाजातील असंख्य देशभक्तांनी आपले रक्त दिले. आज स्वातंत्र्याची बहार आली असताना त्यांच्या वंशजांना परके ठरविणे आणि त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा इतिहासावरील अन्याय आहे.
हा देश सर्वांचा आहे. त्याचे स्वातंत्र्य सर्वांच्या बलिदानातून मिळाले आहे आणि त्याच्या भविष्यावर प्रत्येक भारतीयाचा समान अधिकार आहे. धर्माधारित विभागणी भारताला कमकुवत करते; तर हिंदू-मुस्लिम ऐक्य भारताला सामर्थ्यवान बनविते.
संदर्भ
शांतिमय राय—Freedom Movement and Indian Muslims, विशेषतः पृष्ठ २१ आणि “An Incomplete List of Muslim Martyrs in the Freedom Movement” हा परिशिष्ट; हिंदी आवृत्ती—आजादी का आंदोलन और भारतीय मुसलमान, नॅशनल बुक ट्रस्ट;
शेषराव मोरे—१८५७ चा जिहाद, पहिली आवृत्ती एप्रिल २००७;
जी. डी. चिटणीस—भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुसलमानांचा कार्यभाग;
शमसुल इस्लाम—Muslims Against Partition of India: Revisiting the Legacy of Allah Bakhsh and Other Patriotic Muslims;
शमसुल इस्लाम—Indian Freedom Movement and RSS: A Story of Betrayal;
मासूम मुरादाबादी—१८५७ की क्रांति और उर्दू पत्रकारिता;
एस. एन. सेन—Eighteen Fifty-Seven;
ताराचंद—History of the Freedom Movement in India;
विल्यम डॅलरिम्पल—The Last Mughal;
मौलाना अबुल कलाम आझाद—India Wins Freedom, गुबार-ए-खातिर आणि २३ ऑक्टोबर १९४७ रोजीचे जामा मशिदीतील भाषण;
ए. जी. नूरानी—The Muslims of India: A Documentary Record, Jinnah and Tilak व The Trial of Bhagat Singh;
वृंदावनलाल वर्मा—झांसी की रानी;
रॉबर्ट हॅमिल्टन यांचा ३० ऑक्टोबर १८५८ रोजीचा अहवाल;
मौलाना मुहम्मद जाफर थानेसरी—काला पानी;
एस. एन. अग्रवाल—The Heroes of Cellular Jail;
आर. सी. मजुमदार—Penal Settlement in Andamans;
भारत सरकार व भारतीय इतिहास संशोधन परिषद—Dictionary of Martyrs: India’s Freedom Struggle, 1857–1947;
मौलाना हसरत मोहानी—कुल्लियात-ए-हसरत मोहानी;
नुरुल ऐन लारी—हसरत मोहानी : हयात और कारनामे;
सी. एम. नईम—The Maulana Who Loved Krishna;
अंदमान-निकोबार प्रशासन आणि सेल्युलर कारागृह राष्ट्रीय स्मारकातील अधिकृत नोंदी.
दृकश्राव्य संदर्भ : मौलाना सय्यद मुहम्मद वली रहमानी—स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम समाजाच्या योगदानावरील व्याख्यान. सदर व्याख्यानात १८५७ च्या दिल्लीतील संघर्षात सुमारे तीस हजार क्रांतिकारक शहीद झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

.jpg)

stay connected