सीना मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची आ. सुरेश धस यांची मागणी; अधिकाऱ्यांनी तातडीच्या निर्णयाचे दिले आश्वासन Suresh dhas

 सीना मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची आ. सुरेश धस यांची मागणी; अधिकाऱ्यांनी तातडीच्या निर्णयाचे दिले आश्वासन



आष्टी | प्रतिनिधी


दुष्काळी परिस्थितीमुळे आणि पुरेसा पाऊस न झाल्याने सेना मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा मृतसाठा (डेड स्टोरेज) पातळीखाली गेल्याने आष्टी व कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सेना मध्यम प्रकल्पातून तातडीने भोसे खंडीबांध येथे पाणी सोडण्याची मागणी आष्टी-पाटोदा-शिरूर (का.) मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.


यासंदर्भात आमदार धस यांनी कुकडी सिंचन मंडळाचे कार्यकारी संचालक, पुणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुकडी पाटबंधारे विभागांतर्गत येणारा सेना मध्यम प्रकल्प आष्टी, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यांच्या सीमेवर असून या प्रकल्पाचा लाभ परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी होत आहे.


मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, आष्टी व कर्जत तालुक्यातील अनेक गावे सध्या टँकरवर अवलंबून आहेत. प्रकल्पात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यातही प्रशासनाला अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



यासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी कार्यकारी संचालक श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता श्रीमती अहिरकर आणि कार्यकारी अभियंता श्री. धायगुडे यांच्याशी पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सेना मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत विनंती केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कालवा सल्लागार समितीच्या परवानगीनुसार तातडीने निर्णय घेऊन भोसे खंडीबांध येथे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत विश्वास व्यक्त केला, अशी माहिती आमदार धस यांनी दिली.


यामुळे आष्टी व कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, पाणी सोडण्याच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर