Maharashtra Voter List Revision 2026 | 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा; 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी

 

महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरणे बंधनकारक

17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नाव नसल्यास 16 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी, अंतिम यादी 19 ऑक्टोबरला



मुंबई | तेजवार्ता प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियान सुरू असून, सध्या मतदार यादीत नाव असलेल्या सर्व मतदारांनी दि. 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी केले आहे.

गृहभेटीदरम्यान BLO यांच्याकडे स्वाक्षरीसह गणना अर्ज सादर करणाऱ्या मतदारांची नावे दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

प्रारूप यादीत नाव नसेल तर काय कराल?

ज्या पात्र नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीत आढळणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील, त्यांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नमुना क्र. 6 भरून (आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. संबंधित अर्जांची पडताळणी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

दावे, हरकती आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध सुविधा

दावे व हरकतीच्या कालावधीत नागरिकांना खालीलप्रमाणे अर्ज करता येतील:

  • नमुना क्र. 6 – नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी
  • नमुना क्र. 8 – नाव, पत्ता किंवा इतर नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी
  • नमुना क्र. 7 – अपात्र किंवा चुकीची नोंद वगळण्यासाठी हरकत नोंदविण्यासाठी

खोटी माहिती दिल्यास कारवाई अटळ

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना खोटी घोषणा अथवा चुकीची माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिला आहे.

19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी

सर्व दावे व हरकतींची छाननी पूर्ण झाल्यानंतर दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम यादीनंतरही नाव समाविष्ट करण्याची संधी

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 नुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना नमुना क्र. 6 द्वारे नाव समाविष्ट करता येणार आहे. तसेच Continuous Updation प्रक्रियेनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या करता येतात.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज भरून आपल्या मताधिकाराची नोंद सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर