दलित वस्तीतील सौर दिवा तीन महिन्यांपासून बंद; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका
भादलवाडीतील ओढ्यालगत अंधाराचे साम्राज्य; तातडीने दिवा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
इंदापूर | प्रतिनिधी (जयश खरात)
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील दलित वस्तीमध्ये बसविण्यात आलेला सौर पथदिवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे या सौर दिव्याजवळून पाण्याचा ओढा वाहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दलित वस्तीतील हा सौर दिवा बंद पडल्यापासून अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत दिवा दुरुस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजच्या ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सौर दिव्यालगत असलेल्या ओढ्यामुळे अंधारात पाय घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांमधून सार्वजनिक सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले सौर दिवे वेळेवर देखभाल आणि दुरुस्तीअभावी निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे अशा सुविधांचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि ग्रामपंचायतीला इशारा देत, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट न पाहता सदर सौर दिवा तातडीने दुरुस्त करून परिसरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा भादलवाडीतील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

.jpg)
stay connected