Chhatrapati Shivaji Maharaj maharajasva Abhiyan छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शासकीय कामांना मिळाली गती – Suresh Dhas

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शासकीय कामांना मिळाली गती 
– आ. सुरेश धस

*********************

समाधान शिबिरात एका छताखाली हजारो प्रमाणपत्रे, सनदा व विविध योजनांचा लाभ






*******************

आष्टी (प्रतिनिधी)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत 'समाधान शिबिर – टप्पा क्र. १' उत्साहात पार पडले. महसूल, कृषी, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य तसेच विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज महा महसूल अभियानामुळे प्रशासन अधिक गतिमान झाले असून लोकाभिमुख कारभारामुळे नागरिकांची शासकीय कामे जलदगतीने होत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या अभियानातून होत आहे."


ते पुढे म्हणाले की, जमिनीच्या मोजणीची बहुतांश प्रकरणे निकाली निघाली असून घरकुल लाभार्थ्यांना वाळू सहज उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळत असल्याने नागरिकांचे कार्यालयांतील हेलपाटे कमी झाले आहेत. संजय गांधी स्वावलंबन योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा व अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


तसेच ६ ऑगस्ट रोजी आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


या समाधान शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८अ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, पीएम किसान नोंदणी, अकृषिक (एन.ए.) प्रकरणांबाबत मार्गदर्शन, नवीन सनद प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप, अॅग्रीस्टॅक योजना, ई-मोजणी अर्ज, रेशन कार्ड वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना आदींसह महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी देण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी वसिमा शेख होत्या. व्यासपीठावर शिक्षणमहर्षी माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार साहेबराव दरेकर उपस्थित होते.


यावेळी भीमराव धोंडे यांनी महसूल अभियानाची यशस्विता मोजण्यासाठी मागील शिबिरांतील निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलाठी व ग्रामसेवकांनी सज्जावर राहून काम करावे तसेच शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक विमा मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी मांडले.


साहेबराव दरेकर यांनी काही ठिकाणी तलाठ्यांच्या नावावर त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.



उपविभागीय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितले की, या अभियानाअंतर्गत महसूल विभागासह सर्व विभागांच्या माध्यमातून सुमारे १० हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि १५ हजार सनदांचे वितरण करण्यात येणार असून आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी उत्कृष्ट समन्वय साधला आहे.


ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे यांनी फार्मर आयडीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा व अनुदान मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगून प्रत्येक गावात विशेष शिबिरे घेऊन फार्मर आयडी अद्ययावत करण्याची मागणी केली.


तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व योजना पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविल्या जात असल्याचे सांगितले. आष्टी व पाटोदा तालुक्यातील २,३०० शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी सुमारे १,५०० शेतकऱ्यांना १३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरूर (कासार) तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले. आभार पाटोदा तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी मानले, तर सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले.


या कार्यक्रमास आष्टी तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी प्रयाग ढमाळ, संतोष माने, भरत नागरे, तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे, ओमकार शेळके, अमृत गांगर्डे, मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजानशेठ तांबोळी, नगराध्यक्ष राजू जाधव, तसेच आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) येथील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर