मराठवाडीतील वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल Crime News Tejwarta

 मराठवाडीतील वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल

मराठवाडीतील वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल


आष्टी | प्रतिनिधी


आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात खून, चोरी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विश्वजित वसंत खुले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालनाबाई भाऊराव घाटविसावे (वय ७५) या ३ जुलै रोजी मराठवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांच्या नाक व तोंडातून रक्त येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले असून, प्राथमिक वैद्यकीय अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.


या प्रकरणी मिलिंद अनिल घाटविसावे (रा. चेंबूर, मुंबई) यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घरावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता २ जुलैच्या सायंकाळी दोन संशयित इसम मालनाबाई यांच्या घराकडे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.



तसेच, मालनाबाई यांच्या कानातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा अन्य कारणातून त्यांच्यावर हल्ला करून खून करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर कानातील सोन्याचे दागिनेही गायब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३११, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


सध्या पोलीसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे तसेच अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू असून, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित वसंत खुले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.