अल्पवयीन मातेसह बाळाची प्रकृती ठणठणीत; पण नात्यातील तरुणच निघाला 'गैरकृत्या'चा वाटेकरी !

 अल्पवयीन मातेसह बाळाची प्रकृती ठणठणीत; पण नात्यातील तरुणच निघाला 'गैरकृत्या'चा वाटेकरी !



अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत अखेर नात्यातीलच एका तरुणाला अटक केली आहे. सध्या अल्पवयीन माता आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १५ वर्षीय मुलीला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर काही वेळातच तिने बाळाला जन्म दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मुलीकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलगी, कौटुंबिक वातावरण आणि घटनेतील संवेदनशील बाबी लक्षात घेता पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते.


तपासादरम्यान पोलिसांनी विविध बाजूंनी चौकशी सुरू ठेवली. अखेर या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलीच्या नात्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी उशिरा रात्री पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत अटक केली.


या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत तावरे आणि बाबासाहेब गर्जे यांनी केला. पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.